Friday, February 04, 2011

त्रास दुर्गंधीचा


तुमच्याशी बोलताना लोकं नाक मुरडतात का किंवा नाकावर हात घेऊन ऐकतात का? याचं उत्तर हो असेल तर त्वरित तोंडाची तपासणी करा. कदाचित तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असावी. तोंडाला येणारी दुर्गंधी हे एक असं कारण आहे ज्याने तुम्हाला वारंवार लाजिरवाणं व्हावं लागेल व कालांतराने तुमच्यात न्यूनगंडही निर्माण होईल. इतकेच नव्हे तर तोंडाला येणारी दुर्गंधी एखाद्या आजाराचं कारण असू शकतं किंवा ठरू शकतं म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


वास्तविक आपलं तोंड अनेक जिवाणूंचं माहेरघर आहे. त्यातीलच काही जीवाणूंमुळे श्‍वासाच्या किंवा तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास होतो. हे जीवाणू दात, जीभ, हिरड्यांमध्ये अडकलेल्या अन्नावर जगतात. तोंड, दातांची सफाई काळजीपूर्वक न केल्यास अडकलेले अन्नपदार्थ जीवाणू तयार करतात. जीवाणू सल्फर निर्माण करत असल्यामुळे तोंड दुर्गंधीयुक्त होते व परिणामी श्‍वासालाही दुर्गंध येऊ लागतो. साईनसमुळे नाक बंद होते व तोंडाने श्‍वास घ्यावा लागतो. त्यामुळे तोंड सुकते व दुर्गंधी येऊ लागते.



अन्य कारणे

* तोंडातल्या लाळेमध्ये जीवाणूनाशक शक्ती असते. कुठल्या कारणाने जर लाळेचा प्रवाह कमी झाला किंवा तोंड सुकू लागले की तोंडाला दुर्गंधी येते.

* लसूण, कांदा यासारखे उग्र वास असलेले पदार्थ खाल्ल्याने, तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही दुर्गंधीचा त्रास होतो.

* धूम्रपान, तंबाखूमुळे तोंडाला दुर्गंधी येते.

* नाक, कान, गळ्याचे आजार उदाहरणार्थ तोंेड येणे, टॉन्सिल, पायरिया इत्यादीमुळे तोंडातल्या जीवाणूंची संख्या वाढते व परिणामी त्रास उद्भवतो.



उपाय

* नियमित दात सफाई व तोंडाची स्वच्छता हे या समस्येवर प्रभावी उपचार आहेत. विशेषत: जीभ, गाल, हिरड्यांच्या स्वच्छतेवर खास लक्ष दिले पाहिजे.

* अनेकजण दुर्गंधी घालवण्यासाठी माऊथवॉशचा वापर करतात. तोंड स्वच्छ करण्यासाठी माऊथवॉशचा पर्याय ठीक आहे, पण दुर्गंधीचा त्रास असणार्‍यांनी कुठल्याही प्रकारचा माऊथवॉश वापरणे टाळावे. माऊथवॉश जीवाणूनाशक आहे, पण त्याच्या वापराने तोंड सुकते व काही वेळाने पुन्हा त्रास उद्भवतो.

* काहीही खाल्ल्यानंतर शक्य तितक्या वेळा चूळ भरा. त्यामुळे हिरड्या, दातांमध्ये अडकलेले पदार्थ निघून जातील.

* टंग क्लिनरने जीभ अवश्य साफ करा.

* धूम्रपान, तंबाखू, पान, गुटखा यासारख्या व्यसनांपासून दूर राहा.



(सौजन्य :- एक मराठी दैनिक वृत्तपत्र.  मला हा लेख 'माहितीचा' वाटतो.)

No comments: