Saturday, April 19, 2014

पेलिगन



लाल डोळे, लांब चोच आणि चोचेखाली पिशवीसारखी जागा हे वैशिष्ट्य आहे पेलिगन पक्ष्याचे. मुख्यत्वेकरून भरतपूर पक्षी अभयारण्यात आढळणार्‍या या पक्ष्याच्या आकारावरून तो इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा ठरतो. पाणी असणार्‍या ठिकाणीच या पक्ष्याचे अधिक वास्तव्य असते. खोल पाण्यातून माशांना कमी पाण्याकडे ढकलून त्यांची शिकार तो करत असतो. पेलिगनचा बहुतांश वेळ पाण्यात जातो आणि विश्रांती घेण्यासाठी मात्र तो किनार्‍यावर येतो. भरतपूर अभयारण्यातील या पक्ष्यांना रोजी पेलिगन असेही म्हटले जाते. रोजी पेलिगनला न्याहाळण्यासाठी किंवा त्याचे फोटो काढण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारीचा काळ सर्वोत्तम. या पक्ष्याचे फोटो काढण्यासाठी कमीत कमी ३०० एमएम लेन्स, ५००, ६०० एमएम टेलिलेन्सेसची गरज भासते. पेलिगनचे जवळून फोटो काढणेही शक्य आहे, पण जेव्हा तो प्रवास करून येतो आणि विश्रांती करण्याच्या तयारीत असतो तेव्हा तो माणसांना जवळ येऊ देतो अन्यथा तो बर्‍याचदा अंतर ठेवून राहत असतो. 
दुसर्‍या पक्ष्याने मासा पडकला असेल तर पेलिगन त्याच्यावर नजर ठेवतो आणि जलदगतीने उडत जाऊन तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. बर्‍याच वेळा त्याला यशही मिळते. जे पक्षी खोल पाण्यात बुडून मासे घेऊन बाहेर येतात त्यांच्यावरही तो चार्ज करतो. अनेकदा तो इतर पक्षी व माशांना चोचीच्या पिशवीत धरून ठेवतो आणि काही वेळानंतर सोडून देतो. पेलिगनचे चांगले फोटो घेण्यासाठी दरवेळी त्याच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवावे लागते. या पक्ष्याची सतत हालचाल सुरू राहते. त्यामुळे त्याचे फोटो काढताना बिलकूलही कंटाळा येत नाही.
- बैजू पाटील

सौजन्य :- फुलोरा, सामना १९०४१४

दमा - आयुर्वेद आरोग्य

दमामरणाच्या दारातून परत येण्याचा अनुभव अनेक दमेकर्‍यांकडून ऐकायला मिळतो. प्रत्येकाची स्टोरी वेगळी, परंतु शेवट मात्र सारखाच.
संदीप एका राजकीय पक्षाचा खासगी कार्यवाह. केईएममध्ये ईसीजी, एक्स-रे, ब्लड टेस्ट सर्व केलं. अगदी नॉर्मल होतं. त्यामुळे औषध तर दिलीच नाहीत. आराम करण्याचा सल्ला दिला. तरीसुद्धा दम काही कमी नाही. अशाच अवस्थेत संध्याकाळी दवाखान्यात आला. नाडीवर बोट ठेवताच अजीर्ण जाणवलं. विचारपूस केल्यावर मांसाहार खाणे, जागरण आणि पोट साफ न होणे हे महत्त्वाचे हेतू मिळाले. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी उलटीचे औषध, दिवसभर फक्त गरम पाणी आणि रात्री जुलाबाचे औषध दिले. एवढंच केलं. पोट साफ झाल्याने दमा कमी झाला. हलकं वाटायला लागलं.
लालबागमध्ये राहणारे साबळे नावाचे गृहस्थ प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला. पावसाळ्यात ढग जमा झाल्यावर दमा वाढतो, अस्वस्थ वाटते हा त्यांना त्रास होता. त्यांना सहा वर्षांपूर्वी कलरच्या रिऍक्शनमुळे ऍलर्जी झाली होती. औषध घेऊन ती दाबण्यात आली होती. शास्त्रानुसार त्वचेमधून निघणारी घाण जर औषधाने दाबली तर फुफ्फुसाद्वारे दम्याच्या स्वरूपात त्रास देते. मुख्य कारण लक्षात येताच उलटीचे आणि जुलाबाचे औषध दिले व रक्तातील घाण पचवणारी औषधे सुरू केली. इतक्या वर्षांचा दमा २२ दिवसांमध्ये पूर्णपणे बरा झाला. भूक वाढली. फ्रेश वाटायला लागलं आणि पावसाळ्यात दमसुद्धा लागत नाही.
गुरुवर्य जमदग्नी सरांचा
यशस्वी कानमंत्र
- एक भुक्त : आंघोळीपूर्वी सर्वांगाला तेल लावणे, सकाळी नाश्त्याला मिठ नसलेली भाताची पेज, दुपारी पोटभर पथ्याचे जेवण, रात्री भाजके अन्न (उपमा, थालीपीठ, डाएट चिवडा, दूध) खाणे. 
- उलटी, जुलाबाचे औषध घेऊन दम्याची औषधे सुरू करावी.
- दीर्घश्‍वसन अनुलोम-विलोम इ. फुफ्फुसाचे व्यायाम.
- दम्याचे चाटण (दालचिनी + अद्रक रस मनुका खडीसाखर)
आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने एवढं फक्त करा. मग स्टोरी कोणतीही असू द्या. शेवट मात्र गोड होईल एवढं मात्र नक्की.
- डॉ. दीपक केसरकर

सौजन्य :- फुलोरा, सामना १९०४१४