Sunday, August 25, 2013

जी जनरल के नॉलेज

- संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
- ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
- महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, 
जि. नाशिक.
- पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
- कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
- आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
- मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
- यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास ‘प्रीतीसंगम’ असे म्हणतात.
- महाराष्ट्र पोलीस ऍकॅडमी नाशिक येथे आहे.
- नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
- महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
- शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्ध आहे.
- महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
- शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
- ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
- तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
- हिंदुस्थानातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
- रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
- कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
- बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.

सौजन्य :- फुलोरा, सामना २५०८१३

सुंदरवाडीतील मालवणी चव

‘माडाच्या झावळ्यांचे हॉटेल’ म्हणजे सुंदरवाडीतील मालवणी ‘चव’ भालेकरांचे ‘श्री महालक्ष्मी भोजनालय!’ शाकाहारी जेवणाबरोबर मांसाहार आणि मनसोक्त मासे खाण्यासाठी गोव्यातील ही खवय्ये या हॉटेलमध्ये येतात. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांच्या पसंतीला उतरलेल्या या ‘भालेकरांच्या खानावळी’तील स्वच्छता आणि घरगुती पद्धतीच्या जेवणाला खवय्ये पसंत करतात. 
फिश थाली, बांगडा थाली, प्रोन्स फ्राय, पापलेट थाली, तिसरे जेवण, मोरी मटण, बकरा मटण याशिवाय शुद्ध शाकाहारी जेवणात बटाटा अथवा वांग्यांची फ्राय काप शाकाहारींच्या पसंतीला उतरते. शाकाहारीत तर पालेभाजीसाठी आधी आर्डर द्यावी लागते. फॅमिलीसह मनसोक्त पेटपूजा करण्यासाठी या हॉटेलमध्ये गर्दी होते. 
सावंतवाडी-बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील हे महालक्ष्मी भोजनालय दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत फुल्ल असते. चपाती-मटण सोबत सोलकढीचे ग्लास घेऊन खवय्यांना ‘मिनी लंच’ घेता येते. आवडेल ते खाण्यासाठी ‘महालक्ष्मी भोजनालय’मध्ये पार्सलची सोय आहे. पावसाळ्यात जून ते ऑगस्टमध्ये खाडीचे फिश-सुखा, शेतकं तांबोशी, काळुत्रे आदी मासे मिळतात. 
बिसलरी पाण्याच्या तोडीचे विहिरीचे पाणीही या हॉटेलमध्ये मिळते. रविवार, बुधवार, शुक्रवारी ही जेवण थालीचा दर तोच असतो. ६० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत फिश थाली मिळते. ३०० रुपयांच्या थालीत फिशला किमान ६ जणांना तृप्त होता येते.

सौजन्य:- हरिश्‍चंद्र पवार, फुलोरा, सामना २४०८१३

ब्युटिफूल वर्ल्ड!

महिन्यांमागून महिने जातात तसे निरनिराळे ऋतुसोहळे निसर्गाच्या अंगणात रंगतात. फुलपाखरे स्वच्छंदीपणाने उडताना-बागडताना दिसू लागतात, तेव्हा आपले मनही आनंदभराने नाचू लागतं. ऑक्टोबर टू डिसेंबर हे दिवस फुलपाखरांचेच. सध्या हवेवर स्वार होऊन भिरभिरणार्‍या नाजूक-कोमल फुलपाखरांमुळे सृष्टीचे सौंदर्य अधिकाधिक खुललेय. वेस्टर्न घाटात हे फन्टॅस्टिक ‘ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ बटरफ्लाईज्’ दिसू लागलेय! अगदी नॅचरल ब्युटी! 
वास्तविक हा कीटक प्रदेशनिष्ठ आहे. विशिष्ट ठिकाणीच तो सापडतो. कलर, आकार यात व्हरायटी दिसते. वेस्टर्न घाटात नैसर्गिक सहजीवन अजून बर्‍यापैकी शाबूत असल्याने फुलपाखरांची संख्या येथे बर्‍यापैकी दिसते. वाइल्ड फ्लॉवर्सच्या जोडीने सह्याद्रीच्या कुशीत कलरफुल्ल बटरफ्लाईज दिसू लागलीत. म्हणूनच निसर्गवेड्यांचे आणि अभ्यासकांचे पाय आता त्या दिशेने पडताहेत. अंडी-अळी-कोष-फुलपाखरू...आणि पुन्हा अंडी...असे त्यांचे लाइफ सायकल सुरूच राहते. फुलपाखरे ‘स्ट्रॉ’सारख्या लवचिक सोंडेने निरनिराळ्या फुलांतील मधुरस शोषून घेतात. चार पंख असलेल्या फुलपाखरांच्या डोक्यावर स्पर्श सूत्रांची जोडी असते. त्याला गमतीने ‘अँटिना’ही म्हणतात. या ‘अँटिना’मुळेच त्यांना गंध, स्पर्श आणि दिशा याची माहिती कळते. जगभर फुलपाखरांच्या पंचवीस हजारांवर जाती आहेत. ग्रास ज्यूवेल हे हिंदुस्थानातील सर्वात लहान फुलपाखरू असून, ते हाताच्या करंगळीच्या बोटाच्या नखाएवढे असते. सदर्न बर्डविंग हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरू मोठ्या माणसाच्या हाताच्या पंजाएवढे असते. 
ब्लू ऑफ लीफ, सदर्न बर्डविंग, मलबार ट्री निम्फ, तामिळ योहमन ही फक्त वेस्टर्न घाटात आढळणारी फुलपाखरे आहेत. गंधार किंवा घाणेरीजवळ फुलपाखरे पिंगा घालताना दिसताहेत. त्यांच्यासोबत पतंग, मधमाश्या, पाकोळ्या आहेत. तालिमखाना, रुई, वाघाटी, कडीपत्ता, चित्रक, सोनचाफा, बेल, बहावा, एरंड, बांडगूळ, पितवेल, लिंबू, माकड लिंबू, संत्री या झाडांवर निरनिराळी पाखरे उतरलीत. यातली काही पॅरट, पिकॉक, आऊल अशा पक्ष्यांच्या नावाने ओळखली जातात. त्यातली कॉमनक्रो, इनिग्रंट ही वर्षभर नजरेस पडणारी. लहान फुलपाखरे निळ्या रंगाची असतात. पांढर्‍या-पिवळ्यासोबत नारिंगी रंगाची फुलपाखरे सूर्यपूजक मानली जातात. सकाळी पंख पसरून ती खुशाल उन्हाला बसतात. सकाळी आठपर्यंत आणि सायंकाळी पाचनंतर फुलपाखरे पाहायची योग्य वेळ असते. हा पर्यावरणातील अत्यंत संवेदनशील घटक आहे. परागीकरणात फुलपाखरांबरोबरच मधमाश्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. एका कवीने फुलपाखरांना देवाची मुले म्हटलेय. देवाच्या या सुंदर मुलांकडे कवी किती तरलतेने, संवेदनशीलतेने पाहतोय. आणि आपण? डोळ्यांना सुखावणारी देखणी लगबग भविष्यातही दिसायची तर यांच्या जतन-संवर्धनासाठी जागरुकता हवीये.

सौजन्य:- भाऊसाहेब चासकर, फुलोरा, सामना २४०८१३

Sunday, August 18, 2013

झटपटीत चिकन पकोडा

‘‘का य छान पाऊस कोसळतोय. अगदी भजी खाण्याचं वातावरण झालंय, पण जरा काहीतरी वेगळं पाहिजे. तीच ती नेहमीची कांदा-बटाटा भजी खाऊन कंटाळा आलाय. काय करशी, आरती?’’ प्रतापची फर्माईश!
‘‘नो प्रॉब्लेम! आज चिकन पकोडा करूया.’’ ‘‘पण तो होईपर्यंत पाऊस थांबायचा.’’
‘‘अरे नाही, पटकन होतो. अर्धा किलो बोनलेस चिकन आहे घरात. त्याचे साधारण बोटभर लांबीचे तुकडे करणार. त्याला १ टीस्पून आलं-लसणाची पेस्ट चोळून ठेवणार. मग भजीचं पीठ बनवायचं. १ वाटी बेसनमध्ये अर्धा टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक टीस्पून लाल मिरची पावडर घालणार. जरासा १ चिमूटभर सोडा घालून बटाटा भजीप्रमाणेच पीठ बनवायचे आणि चिकनचे तुकडे एकेक करून या पिठात घोळवून डीप फ्राय करायचे.
गरम-गरम चिकन पकोडे, हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो स्केचपबरोबर सर्व्ह करायचे... आणि मस्त पावसाची मजा घेत फस्त करायचे. चल आता जितक्या पटकन रेसिपी सांगितलीस तेवढीच पटकन बनव म्हणजे झालं. ‘‘प्रताप प्रोटीन या अन्नघटकाची आवश्यकता केवळ वाढत्या वयाच्या मुलांसाठीच नाही तर सर्वांनाच असते. शरीराची झीज भरून काढण्याचे काम प्रोटीन करते. चिकन हा प्रोटीनचा सगळ्यात चांगला स्रोत आहे. यात सॅच्युरेटेड फॅटस्चे प्रमाण रेड मीटपेक्षा खूप कमी असते. तसेच त्यात पोटॅशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. कर्बोदके कमी प्रमाणात असतात. त्यामुळे सर्व स्तरांतील लोकांनी मुबलक प्रमाणात खाण्यासारखा हा एक पौष्टिक पदार्थ आहे.

आरती मांजरेकर
सौजन्य - फुलोरा, सामना १७०८१३

जी जनरल के नॉलेज

- हिंदुस्थानाात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
- हिंदुस्थानात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
- महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा नगर.
- हिंदुस्थानातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
- महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
- पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
- गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
- प्रवरा नदीच्या खोर्‍यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
- गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
- जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
- संभाजीनगर शहर ‘बावन्न दरवाजांचे शहर’ म्हणून ओळखले जाते.
- पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
- महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
- कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची ‘भाग्य लक्ष्मी’ असे म्हणतात.
- कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
- विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
- विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
- महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
- विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
- संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
- संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

सौजन्य :- फुलोरा, सामना १७०८१३