Friday, October 21, 2011

डे ट्रेडिंग - १८

 डे ट्रेडिंग म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा खेळ आहे. मागणी जास्त म्हणजे बाजार तेज आणि पुरवठा जास्त म्हणजे बाजार मंद. डे ट्रेडिंग करून सतत नफा कमवत राहावा हे बाजारात येणार्‍या प्रत्येकाचे ध्येय असते.

डे ट्रेडिंग म्हणजे बाजारात दिवसभरात होणार्‍या चढउताराचा फायदा घेऊन पैसे कमावणे. या सौद्यांना कालमर्यादा असते सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीनची. एकूण पाच तासांच्या मर्यादेत सौदा हुकमी आपल्या बाजूने पडणे हे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आवश्यकता असते योग्य निर्णयाची. हे निर्णय घेण्यासाठी बाजाराचा कल जोखणे -विचारात चपळता असणे आणि भावनिक गुंतवणुकीचा पूर्ण अभाव असणे जरुरीचे आहे. जर बाजाराचा कल तेजीकडे असेल तर सकाळी खरेदी करून बाजार बंद होण्याआधी विक्री करणे आणि जर कल मंदीचा दिसला तर आधी विक्री करून मग खरेदी करायची. आधी खरेदी म्हणजे लॉंग पोझिशन आणि आधी विक्री करणे म्हणजे शॉर्ट पोझिशन. पोझिशन कशीही असली तरी दुपारी बाजार बंद होण्याआधी खातेपोते एकसारखे झाले पाहिजे. डे ट्रेडिंग म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा खेळ आहे. मागणी जास्त बाजार तेज आणि पुरवठा जास्त म्हणजे बाजार मंद. डे ट्रेडिंग करून सतत नफा कमवत राहावा हे बाजारात येणार्‍या प्रत्येकाचे ध्येय असते. जशी कॉलेजात जावे आणि प्रेमात पडावे -कविता लिहाव्या -विरह व्हावा -मग सुस्कारे सोडावे ही जशी रोमँटिक कल्पना आहे तशीच बाजारात जावे, चार सौदे करावे -सकाळी करावे आणि दुपारी ते परतावे-संध्याकाळी कूल नफा घेऊन घरी जावे ही पण रोमँटिक कल्पना आहे. परंतु हे साम्य इथेच थांबते. बाजारात खरेदी-विक्री करून जर नफा करायचा असेल तर छातीच्या डाव्या बाजूची धडकन आहे तेथे ग्रॅनाइटचा तुकडा असावा लागतो.

सर्दी-बध्दकोष्ठ -दाढदुखीसारख्या आजारांनी यांची तब्येत नाजूक मिजाज होत असेल त्यांच्यासाठी डे ट्रेडिंग नाही. एखाद्या स्थितप्रज्ञासारखे तटस्थ राहून इतरांच्या भावनाकल्लोळाच्या खेळाचा फायदा घेणे हे डे ट्रेडरचे काम आहे. डे ट्रेडिंग करून नफा कसा कमावतात ते बघूया. या प्रकारच्या व्यवहारात दोन ते अडीच टक्क्यांचा फरक म्हणजे मोठा फरक. उदाहरणार्थ ऍक्सीस बँकेचा खुलता भाव 1320 आहे. यावर 0.10 टक्के दलाली. भाव समजा दोन टक्क्यानी वाढला तर प्रत्येक समभागापाठी 1.90 टक्के फायदा. दिवसभरात 500 समभागाचा व्यवहार पार पाडला तरी 12000चा फायदा. मग हे जर असे सोपे असेल तर....... असा मनात विचार येतो. पण प्रत्यक्षात असे होईल असे नाही. भाव 2.0 टक्के खाली पण जाऊ शकतो किंवा एक टक्का कमी झाल्यावर घाबरलेला खेळाडू विक्री करू शकतो आणि थोड्या वेळाने भाव पुन्हा एक टक्का वाढू शकतो. एकाच दिवसात दोन टक्क्यांची वाढ प्रत्येक दिवशी होते असे नाही. साधारण एक टक्क्याची वाढ झाली तरी नफा मिळतो. म्हणून डे ट्रेडिंगमध्ये व्हॉल्यूम महत्त्वाचा. दलाली जितकी कमी तितका फायदा जास्त. आता बघू या डे

ट्रेडिंगसाठी काही महत्त्वाचे नियम.

1) वर्तमानपत्रातील मथळे वाचून सौदे करू नयेत. आजचा मथळा हा बाजारात कालचा झालेला असतो.
2) जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा दुसरे कोणीतरी विक्री करत असणार. याचा अर्थ असा की खरेदी करण्याचा निर्णय ज्या तर्काच्या आधारे घेतला आहे तो तर्क विक्रीच्या तर्कापेक्षा बळकट असायला पाहिजे.
3) जर खरेदी केली तर आपण गृहीत धरलेला भाव मिळेलच असे नाही. त्यामुळे बाजाराचा कल बदलताना दिसला तर हट्ट न धरता सौदा पूर्ण करून वायद्याच्या बाहेर पडावे.
4) बर्‍याच वेळा नफ्याऐवजी नुकसान होते अशावेळी किती नुकसानीत सौद्याच्या बाहेर पडायचे हे आधीच ठरवलेले फायद्याचे असते. नुकसान नंतर कधीतरी भरून काढता येते, पण भांडवल जर नाहीसे झाले तर नफा कमावण्याचा रस्ताच बंद पडतो. किती नुकसानीची तयारी ठेवायची याची जी मर्यादा आहे त्याला स्टॉपलॉस असे म्हणतात. सुरुवातीला कॉंप्युटराइज्ड स्टॉपलॉसचा वापर करावा. पण हळूहळू या यांत्रिक अवलंबितेच्या बाहेर पडून मानसिक स्टॉपलॉस ठेवण्याची सवय करावी.
5) नफ्याचे प्रमाण मनाशी निश्चित ठरवूनच सौदा करावा. जर जास्त नफा दिसायला लागला तर वाट बघण्यापेक्षा आहे तो नफा पदरात घेण्याची सवय लावून घ्यावी.

प्रत्येकाला आपापल्या पायरीवरती नफा कमावण्याची संधी मिळते. असा विचार करत सौदा केला तर नफा छोट्या छोट्या प्रमाणात गोळा होतो. ही सवय लागली की अनेक छोट्या नफ्याचे रूपांतर छोटा नफा आणि मोठा सौदा असे होते. हे संक्रमण पार पाडणे ज्याला जमते तो यशस्वी. या आणि अशा अनेक नियमांचे सार असे की प्रत्येकाने आपल्या सौद्याची एक व्यवस्था बनवून घ्यावी. त्या व्यवस्थेप्रमाणे जेवढा नफा करता येईल तेवढेच सौदे करावेत. एक सोपे उदाहरण बघा. ऍक्सीस बँकेचा 1247 ते 1327 हा टप्पा माझ्या ओळखीचा आहे. व्यवस्थेप्रमाणे यादरम्यान भाव असेल तरच मी खरेदी-विक्री करतो. या टप्प्याच्या बाहेर भाव गेला तर मी बाजूला राहतो. ही शिस्त लागली की यशाचे प्रमाण वाढते. डे ट्रेडिंग कोणत्या समभागात करावे याचे नियम असे नाहीत, परंतु ज्या समभागात जास्तीत जास्त खरेदी-विक्री होत असेल त्या समभागातच खेळावे. नियम असे अनेक आहेत, परंतु या नियमासोबत जोपर्यंत टेक्निकल ऍनालिसिस येत नाही तोपर्यंत सगळे काही जुगार खेळण्यासारखे आहे. टेक्निकल ऍनालिसिस आणि डे ट्रेडिंग दोन्हीचा अभ्यास एकसोबत होईल अशा पध्दतीने पुढचे लेख लिहिता येतील.

पसंती-नापसंती

मुळात प्रश्‍न आहे तो भाव खालीवर होण्याचा. भाव वधारणे म्हणजे दिसेल त्या किमतीत एक विशिष्ट समभाग हवाहवासा वाटणे आणि मंदी म्हणजे काय तर मिळेल त्या भावात एखादा किंवा कुठलाही समभाग नकोनकोसा वाटणे. पण हे भाव खाली-वर कसे जातात हे कळले की बाजार आपलाच. चला तर बघू या हा भाव वर-खाली जाण्याचा गेम.

यासाठी एक कल्पना करा की, एका हॉलमध्ये पन्नास विवाहोत्सुक तरुणींचा मेळावा बसला आहे. प्रत्येक तरुणीला विवाहास योग्य अशा तरुणाची माहिती संचालकांमार्फत दिली जाते आहे. पसंती-नापसंती दर्शवण्यासाठी तरुणींच्या हातात एक फ्लॅग दिला आहे. आता ज्या युवकाची माहिती सांगणार आहेत त्याचा नंबर 911 पुकारला गेला. जन्म एशियात आणि निवास अमेरिकेत. पन्नासपैकी पंचवीस फ्लॅग हलवले जातात. उंची 6फूट 2 इंच. अर्धे फ्लॅग खाली जातात. रंग काळा आणखी काही फ्लॅग खाली जातात. डावखुरा -चेनस्मोकर. सगळे फ्लॅग खाली. उत्पन्न दहा लाख डॉलर ‘अय्या म्हणजे आपले पाच कोटी.जाऊ दे बाई रंगाचे काय ते आपल्या हातात थोडेच असते’ या विचारांनी पुन्हा एकदा वीस फ्लॅग वर येतात. एकेकाळी गव्हर्नर -आणखी पाच फ्लॅग वर. वय बावन्न -उंचावलेले अर्धे फ्लॅग खाली. कदाचित या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार. सगळे फ्लॅग वरती. बघा प्रत्येक विधानासोबत या घटनेत भाग घेणार्‍यांचे विचार कसे हेलकावे घेत होते. हे अगदी असेच डे ट्रेडिंगमध्ये होत असते आणि म्हणून सव्वा नऊ ते साडेतीन वाजेपर्यंत भाव वरखाली होत असतात. या नाट्यात तुम्ही भाग घेतला तर तुमचे नुकसान नक्की. पण विंगेत उभे राहून या नाट्याचा फायदा करून घेतला तर तुम्ही नफ्यात. परंतु मानवी मनाच्या लीला कधी विंगेतल्या माणसाला मंचावर आणतील, तर मंचावरील माणसाला विंगेत नेतील हे सांगता येत नाही .म्हणून डे ट्रेडिंग करणार्‍यासाठी योजना ठरलेली असली पाहिजे.

shreemant2011@gmail.com
लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत
सौजन्य :- फुलोरा, सामना ०८०५२०११

पुढचे काही महिने - १७

गुप्तधनाचे योग आणि स्वस्त किमतीचे समभाग या विषयाची चर्चा करताना आणखी काही माहिती या अंकात देण्याचे गेल्या शनिवारी ठरले होते. त्यानुसार आज अशा एका कंपनीची माहिती तुमच्यासमोर ठेवत आहे. या कंपनीने गेली कित्येक वर्षे सतत नफा कमावला आहे. लाभांश वर्षानुवर्षे भागधारकांना देण्याचे औदार्यही या कंपनीत आहे. पुस्तकी किंमत रुपये ७७.११-एका समभागामागे कमावलेला नफा रुपये ६.५२. या वर्षीचा लाभांश २०ज्ञ् आहे. तरीही या समभागाचा भाव केवळ रुपये ४८.०० आहे. जेव्हा पुस्तकी मूल्यापेक्षा बाजारभाव बराच कमी असतो तेव्हा व्यवस्थापनाविषयी मनात संशय येतो. पण या कंपनीचे व्यवस्थापन संशयातीत आहे. एकूण समभागांपैकी ६० टक्के समभाग प्रवर्तकांकडे आहेत आणि त्यांना बाजारभावात रस नाही. त्यामुळे हा समभाग स्वस्तात उपलब्ध आहे. याच प्रवर्तकांच्या इतर कंपन्याही अशीच चांगली कामगिरी करीत आहेत. स्पेशालिटी केमिकल बनवणार्‍या या कंपनीचे नाव आहे दाई-इची-कर्कारीया. उत्सुक गुंतवणूकदारांनी अधिक माहिती जमा करावी.

फ्रीकॉनॉमिक्स

* मान्सून मनासारखा चांगला झाला तर बाजारात एक मोठी तेजीची लाट येईल.
* जर मान्सून वेळेवर आणि हवा तितका पुरेसा झाला नाही तर हिंदुस्थानचा जीडीपी कमी होईल. व्याजाचे दर वाढतील. विकासाचे दर कमी होतील. बँकाचे समभाग स्वस्त होतील. अशावेळी मायक्रो फायनान्स कंपन्या भरपूर नफा करतील. त्यातल्या त्यात सोने तारण ठेवून पैसे देतात त्यांना सोन्याचे दिवस येतील. नाव घेण्यासारख्या दोनच कंपन्या या क्षेत्रात आहेत एक मन्नपूरम आणि दुसरी मुथूत फायनान्स. या क्षेत्रातील इतर कंपन्यांकडे लक्ष देऊ नये.

एप्रिल महिन्याच्या या शेवटच्या शनिवारी ‘पैसा कसा कमवाल’? या मालिकेचा एक टप्पा संपत आला आहे. पुढच्या टप्प्यात टेक्निकल ऍनॅलिसिसचे आणि डे ट्रेडिंगचे सोपे धडे आपण गिरवणार आहोत.

 या वर्षीचा मान्सून व्यवस्थित पार पडला तर अन्नधान्याच्या तुटीमुळे वाढणारी भाववाढ कमी होईल. परंतु वेगवेगळ्या राज्यांतील निवडणुका संपल्यावर कदाचित डिझेलवरील सरकारी नियंत्रण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाववाढीची एक नवी लाट येण्याची शक्यता आहे. 

saujanya :- fulora, samana.

जरा जपून... १६

गेल्या पंधरवड्यातल्या बाजाराच्या हालचालीवरून काही निश्‍चित असा तर्क बांधणे कठीण आहे. लागोपाठ येणार्‍या सार्वजनीक सुट्ट्यांमुळे बाजार कभी हा कभी ना या पध्दतीने पुढे मागे सरकत होता. या पंधरवड्याच्या शेवटी इन्फोसीस या अग्रगण्य कंपनीचे निकाल आले आणि शेवटच्या दिवशी बाजार घसरला. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत जपून पैसे गुंतवावे असा माझा सल्ला राहील. इन्फोसीसचा बाजारभाव घसरून पुन्हा स्थिरावेल आणि त्यासोबत याच क्षेत्रातील इतर कंपन्यांचेही भाव खाली येऊन स्थिरावतील अशी अपेक्षा आहे. या निमित्ताने दोन मुद्दे समोर आले ते असे की सॉफ्टवेअर कंपन्यांतील पगार की आता काळजी करण्याची बाब होणार आहे. इन्फोसीसच्या प्रत्येक तासासाठी मिळणारे मूल्य प्रत्येक कंपनीला मिळत नाही. त्यामुळे इतर कंपन्यांना आपल्या कामाचे दर कमी जास्त करावे लागतील. दुसरा मुद्दा कंत्राटी कामाची मुदत आतापर्यंत लांबलचक असायची परंतु यानंतर ही मुदत कमी होत जाणार आहे .याचा परिणाम या क्षेत्रातील कंपन्यांना पण भासणार आहे. पुढच्या वर्षी एका शेअर पाठीमागचा नफा (ईपीएस) यामुळे कमी राहील, अशी शक्यता आहे. सौ बात की एक बात अशी की सॉफ्टवेअर कंपन्यांचे भाव स्थिरावेपर्यंत गुंतवणूक करू नये.
लागोपाठ येणार्‍या सार्वजनीक सुट्ट्यांमुळे बाजार कभी हा कभी ना या पध्दतीने पुढे मागे सरकत होता. या पंधरवड्याच्या शेवटी इन्फोसीस या अग्रगण्य कंपनीचे निकाल आले आणि शेवटच्या दिवशी बाजार घसरला. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत जपून पैसे गुंतवावे

इतर आर्थिक ढोबळ कारणांमुळे बाजार तेजी पकडेल असे आता वाटत नाही. मंदीचे वातावरण तयार होण्यासाठी एक दोन दिवस परदेशी वित्तसंस्थांनी विक्री केली तर बाजाराचा मूड बदलतो. उदाहरणार्थ १५एप्रिल रोजी या संस्थांनी विक्री केली आणि बाजार घसरला. याच महिन्यात सतत सात दिवस याच संस्था खरेदी करीत असताना बाजार तेजीचे संकेत देत होता. अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे भाव वाढताना दिसले की या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. गुंतवणुकीसाठी गॅमन इंडिया हा समभाग लक्ष देण्यासारखा वाटतो.

शेअर बाजारात गुप्तधन शोधणार्‍यांची एक जातकुळी असते. गुप्तधन म्हटल्यावर डोळ्यांसमोर लिंबू-गुलाल-कोहळा- उलट्या पिसाची कोंबडी असे काही नाही. गुप्तधन म्हणजे बाजाराच्या रोजच्या धबडग्यामुळे बर्‍याच गुंतवणूकदारांच्या नजरेआड झालेले समभाग . या अंकात आपण अशा प्रकारच्या समभागाची दोन उदाहरणे बघू या.

गुप्तधनाचे योग

पहिल्या समभागाचे नाव आहे नॅशनल पॅरॅक्सॉईड. सायन उद्योगात असलेली ही कंपनी बॉंबे डाइंग या सुप्रसिध्द उद्योगसमूहाच्या मालकीची कंपनी आहे. कंपनीचे प्रत्येक समभागापाठीमागचे उत्पन्न ८३ रुपये आहे. समभागाचे पुस्तकी मूल्य १३६ रुपये तर पीई रेशिओ ७.१५ आहे. याच क्षेत्रात काम करणार्‍या इतर कंपन्यांचे पीई रेशिओ १३.१५ आहे. कंपनी अत्यंत आकर्षक असा लाभांशपण वर्षानुवर्षे देत आहे. म्हणजे या कंपनीच्या भाववाढीला अजूनही जागा आहे. तर अशा सर्वगुणसंपन्न समभागाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष का नाही? कारण एकच की हा समभाग लोकप्रिय समभागाच्या यादीत नाही. कंपनीचे भागभांडवल फार छोटे असल्यामुळे बाजारात मागणी केली तरी समभाग मिळतील याची खात्री नाही. समभाग न मिळण्याचे महत्त्वाचे कारण असे की कंपनीच्या प्रवर्तकांकडे ५५ टक्के भाग भांडवल आहे. म्हणजे ते बाजारात विक्रीस उपलब्ध नाही. २५ टक्के भागभांडवल सॉल्व्हे या अग्रगण्य विदेशी रसायन कंपनीकडे आहे. (अभ्यासू वाचकांनी सॉल्व्हेच्या संस्थळाला जरूर भेट द्यावी.) सॉल्व्हेच्या मालकीचे समभागही बाजारात विक्रीस येण्याची शक्यता नाही. उरलेले ३० टक्के समभाग विखुरले असल्यामुळे तरंगते समभाग बाजारात कमी आहेत. जर हे समभाग गेल्या वर्षी तुम्ही घेतले असते तर या वर्षी दामदुप्पट झाली असती. ५६० ते ६०० रुपयांच्या दरम्यान हे समभाग मिळाले तर घ्यायला हरकत नाही. दुसरे उदाहरण रेवथी सीपी या कंपनीचे घ्या. कॉम्प्रेसर बनवणारी कॉन्सोलिडेटेड न्युमॅटिक या कंपनीचे प्रवर्तक होती. ती कंपनीनंतर ऍटलास कॉपको या कंपनीत विलीन झाली आणि रेवथीचे भाग भांडवल ऍटलास कॉपकोनी डालमिया उद्योगसमूहाला विकले. आजच्या तारखेस ५० टक्के समभाग त्यांच्या कडेच आहेत. उरलेले समभाग विखुरलेले असल्याने समभागाची खरेदी एका ऑर्डरमध्ये होत नाही. ट्रक माउंटॅड बोरिंंग कॉंप्रेसर हे या कंपनीचे उत्पादन आहे. या क्षेत्रात स्पर्धेत फारसे कोणीही नाही. हे समभाग ४४५-४५५ यादरम्यान मिळाल्यास सहा महिन्यांच्या गुंतवणुकीसाठी घ्यावयास हरकत नाही. ही फक्त दोन उदाहरणे झाली .या व्यतिरिक्त अनेक अशा कंपन्या आहेत.गुंतवणूकदारांना या आठवड्याचा गृहपाठ हाच की अशा आणखी दोन कंपन्या गुंतवणुकीसाठी शोधाव्या. या कोड्याचे उत्तर अर्थात नंतरच्या एखाद्या भागात दिले जाईल.

दीडदमडीचे समभाग अर्थात पेनी स्टॉक

शांती नावाच्या एका सीरिअलमध्ये काम करणारी मंदिरा बेदी आठवा किंवा उत्सव मधला शाहीद कपूर आठवा.एकेकाळी क्षुल्लक भूमिका करणारे हे कलाकार हळूहळू स्टार कधी बनले हे कोणालाच कळले नाही. फिल्मी दुनियेत असे स्टार हाताच्या बोटावर मोजण्यासारखे तयार होतात परंतु आपल्या शेअर बाजारात असे अनेक स्टार दरवर्षी येत असतात. एखादा समभाग स्टार बनण्याच्या आधीच जे गुंतवणूकदार खरेदी करतात त्यांना तो समभाग स्टार झाल्यावर एखादा हिंदी नाही पण मराठी चित्रपट काढण्याइतकी रक्कम मिळवून देऊ शकतो. हा श्रीमंतीचा मार्ग दिसतो तसा सोपा नाही. स्टार म्हणून कच्ची धूपमधली भाग्यश्री निवडावी - ‘मैने प्यार किया’ सारखा चित्रपट आल्यानंतर स्टार म्हणून अपेक्षा ठेवाव्या आणि तिने संन्यास घ्यावा .असेही प्रकार या उगवत्या स्टारमध्ये (उगवत्या समभागात)होऊ शकतात. इरा इन्फ्रा इंजीनिअरिंंग-अबान ऑफशोअर-श्रीराम ट्रान्सपोर्ट-प्राज इंडस्ट्रीज-पँटालून रीटेल-कल्पतरू पॉवर-हॅवेल इंडिया मदरसुन सुमी- ऍमटेक ऑटो या एकेकाळच्या लुकलुकणार्‍या चांदण्या आता तळपणारे तारे झाले आहेत. सोबत अशाही चांदण्या दिसतात की ज्या अपेक्षेपेक्षा लवकर ’तारे जमींपर’ झाल्या आहेत. एखादा कमी किमतीचा -ज्याला बाजारात पेनी स्टॉक -समभाग घेऊन पाच ते दहा वर्षे वाट बघितल्यावर स्टार समभाग जन्माला येतो. संयम आणि सतत निरीक्षण -अभ्यास -चिकाटी असणार्‍यांसाठी हे क्षेत्र उपलब्ध आहे .या क्षेत्राची गुण विशेषता पुढच्या अंकात बघू या? परंतु तोपर्यंत गुंतवणूकदारांनी स्वत:च्या तार्‍यांची यादी बनवायला हरकत नाही.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना

Sunday, October 16, 2011

भारनियमन शुल्क बीलातून वगळणार

लोडशेडिंगने नागरिक हैराण झाले असताना भारनियमन शुल्कही बिलातून माथी मारणार्‍या वीज मंडळ अधिकार्‍यांना आज शिवसेनेने जोरदार झटका दिला. वीजपुरवठा खंडित करता मग शुल्क कसले आकारता, असा जाब शिवसैनिकांनी विचारताच ताळ्यावर आलेल्या अधिकार्‍यांनी बिलातून भारनियमन शुल्क वगळण्याचे लेखी आश्‍वासन दिले.
नवी मुुंबईला भारनियमनमुक्त करण्यासाठी शहरातील वीजग्राहकांकडून ३७.४० पैसे भारनियमन शुल्क म्हणून जास्त घेतले जातात. असे असूनही सध्या नवी मुंबईत विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोहर गायखे, के. एन. म्हात्रे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, विजय माने, विरोधी पक्षनेते मनोज हळदणकर, भाविसेचे जिल्हासंघटक सोमनाथ वास्कर, नगरसेवक विजयानंद माने, दिलीप घोडेकर, सतीश रामाणे, उपशहरप्रमुख प्रफुल्ल म्हात्रे, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, परशुराम ठाकूर, विभागप्रमुख श्रीकांत हिंदळकर, ज्योतिराम भालेकर, दर्शन भणगे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी आज वाशी येथील वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर धास्तावलेल्या वीज मंडळ प्रशासनाने जुलै २०११ पासून ग्राहकांच्या बिलात भारनियमन शुल्क बंद केले जाईल असे लेखी आश्वासन दिले.
... तर तीव्र आंदोलन छेडू
सध्या ऑक्टोबर महिना असल्याने तापमान वाढले आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. त्यामुळे नवी मुंबईतील लोडशेडिंग लवकरात लवकर बंद करण्यात यावे, अन्यथा जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहरप्रमुख विजय माने यांनी यावेळी दिला.
 सौजन्य :- सामना १३१०२०११.

ही घ्या जमीन, द्या गिरणी कामगारांना घरे - शिवसेनेने दाखविला मुख्यमंत्र्यांना मार्ग



गिरणी कामगारांना मोफत घरे देण्यासाठी मुंबईत जमीन आणि पुरेसा पैसा नसल्याची बतावणी करणार्‍या आघाडी सरकारच्या सर्व पळवाटा शिवसेनेने बंद करून टाकल्या आहेत. १ लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी २०० एकर जमीन आणि त्यासाठी १० हजार कोटी कसे उभारता येतील याची माहिती देणारी ‘चातकांचे वारसदार’ ही मार्गदर्शक पुस्तिका शिवसेनेने तयार केली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई व विधान परिषद गटनेते दिवाकर रावते यांनी आज ही पुस्तिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देत ‘ही घ्या जमीन आणि द्या घरे’ असे आव्हानच सरकारला दिले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना मोफत घरे मिळवून देणारच अशी ग्वाही दिली. त्याच वेळी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी गिरणी कामगारांना मोफत घरे कशी देता येतील याबाबतची ‘चातकांचे वारसदार’ ही पुस्तिका शिवसेनाप्रमुखांना दिला होती. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी आज सायंकाळी विधान भवनात मुख्यमंत्र्यांना ही पुस्तिका देताना गिरणी कामगारांना मोफत घरे कशी देता येतील हे समजावून सांगितले. कामगारांच्या घरांसाठी १९८ एकर जमीन कशी उपलब्ध करता येईल, किंबहुना ही जमीन उपलब्ध आहे याची आकडेवारी देसाई-रावते यांनी दाखवून दिली.
- चार्ल्स कोरिया कमिटाच्यो अहवालानुसार एनटीसीची १३३ एकर जमीन मिळू शकते
- १०८५ हेक्टर जमीन यूएलसी कायद्यांतर्गत विविध कारखानदारांकडे पडून आहे.
- यूएलसीची २००० हेक्टर जमीन शासनाच्या हातात होती त्यापैकी ५० हेक्टर जमीन वेगवेगळ्या सोसायट्यांना दिली होती. ५० हेक्टर जमिनीवर आरक्षण होते. ८५ हेक्टर जमीन अतिक्रमित आहे ती म्हाडाकडे पडून आहे. त्यावर २५ हजार गिरणी कामगारांना घरे देऊ शकतात.
- बोरिवलीच्या खटाव मिलची ३४ एकर जागा
- सिम्प्लेक्सची भाडेपट्टी संपलेली अर्धा एकर जागा, मफतलालची ७ एकर जागा, बॉम्बे डाइंगची प्रभादेवीतील २० एकर जागा तर मालवणी-मालाड येथील २२ एकर जमीन
- गिरणीमालकांना टीडीआर दिला. त्यातून सुमारे ४ हजार कोटी उभे राहू शकतात.
- गिरणी कामगार घरांची चातकासारखी वाट पाहत असल्याने ‘चातकांचे वारसदार’ हे नाव पुस्तिकेला दिले आहे.


सौजन्य:- सामना १३१०२०११.