Sunday, October 16, 2011

अग्निशमन जवानांसाठी ‘कमांडिंग सेंटर’ उभारणारी मुंबई महापालिका देशात पहिली













उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी


अग्निशमन दलाचे जवान हे मुंबईचे खर्‍या अर्थाने रक्षक आहेत. जीवाची बाजी लावून ते मुंबईचे रक्षण करतात. या जवानांसाठी कमांडिंग सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक सर्व सोयीसुविधा देणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका आहे, असे गौरवोद्गार शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले.

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वडाळा येथील अग्निशमन दलाच्या कमांडिंग सेंटरची आणि वरळी येथील पालिकेच्या इंजिनीयरिंग हबची तब्बल तीन तास पाहणी केली. त्यांनी या दोन्ही कामांचा आढावा घेऊन पालिका अधिकारी व अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.

ते म्हणाले की, कमांडिंग सेंटर असो की इंजिनीयरिंग हब, या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबईचा कारभार सुरळीत चालणार आहे ही
अभिमानाची गोष्ट आहे.




कर्मचार्‍यांची उणीव पूर्ण करू!


अग्निशमन दलात निधड्या छातीचे जवान आहेत. अग्निशमन दलात आग विझविण्यासाठीची उपकरणे मुबलक प्रमाणात आहेत. पण कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. कर्मचार्‍यांची ही उणीव लवकरच पूर्ण करू, असे आश्‍वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी महापौर श्रद्धा जाधव, पालिका सभागृह नेते सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि अग्मिशमन दल प्रमुख उदय तटकरे उपस्थित होते. वडाळ्याच्या कमांडिंग सेंटरची दीड तास पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वरळीच्या इंजिनीयरिंग हबची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

कमांडिंग सेंटरचे वैशिष्ट्ये


अग्निशमन दलाच्या वतीने मुंबईत वडाळा, मानखुर्द, विक्रोळी, भायखळा, मरोळ आणि बोरिवली या सहा ठिकाणी कमांडिंग सेंटर उभारायला सुरुवात केली आहे. यापैकी वडाळा, विक्रोळी आणि भायखळा येथील कमांडिंग सेंटरचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या कमांडिंग सेंटरमुळे आगीच्या घटनास्थळी तत्काळ पोहोचणे शक्य होणार आहे. या कमांडिंग सेंटरमध्ये स्वीमिंग पूल, चेंगिंग रूम, प्रशिक्षण केंद्र, सभागृह, कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे निवासस्थान असणार आहेत.

हायटेक इंजिनीयरिंग हब


पालिकेने वरळी येथे इंजिनीयरिंग हबच्या माध्यमातून पालिकेच्या सर्व अभियंत्यांचे एकाच छत्राखाली केंद्रीकरण केले आहे. वरळी येथे उभारलेल्या चार मजली इमारतीत पालिकेचे सर्वच्या सर्व ११५० अभियंते बसणार आहेत. येत्या तीन महिन्यांत हे इंजिनीयरिंग हब सुरू होईल. या हबमध्ये प्रत्येक मजल्यावर डेटारूम असेल. ग्रंथालय असणार आहे. याशिवाय अभियांत्रिकीशी संबंधित प्रदर्शनासाठी नेहरू तारांगणासमोर प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

Saujanya :- Samana

No comments: