Sunday, October 02, 2011

कॉर्पोरेट मंत्र - दिल चाहता है

जगात काही लोक मानतात की आपणच आपले जीवन कसे असेल ते ठरवतो. काही पत्रिका आणि ग्रह पाहून आयुष्याची दिशा ठरवतात आणि काहींना स्वत:च्या जीवनाशीही काही देणेघणे नसते. खूप मेहनत करूनही एखादे काम लटकले की पटते ‘नशीबाचा खेळ आहे. आपल्या हातात काही नसते.’ मेहनतीचे फळ पदरी पडले की मन सांगतं ‘‘आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार. जोर लावला की नशीब बदलते.’’ शेवटी हे सर्व मानण्यावर असते. पाहिले तर आपण मानू ते आपल्यासाठी बरोबर ठरते. पण तरीही ‘इच्छा’ हा माणसाचा गुणधर्मच आहे. असे म्हणतात की ‘‘इच्छा ही सर्व दु:खांचे मूळ आहे.’’ पण मला वाटते ‘‘मी इच्छा करणार नाही’’ हीदेखील एक इच्छाच आहे. भिकार्‍यासारखे देवासमोर लाळ पाडत राहणे. गाडी, बंगला, सोने यांची हाव पुरवण्यासाठी नवसाची लाच देणे म्हणजे मूर्खपणाच. पण याचा अर्थ असा नाही की इच्छांचा गळा दाबून टाकावा. मनाला पटेल व समाजात किंवा कुणाला त्याचा त्रास नसेल अशी इच्छा नक्कीच करा.


एकदा एक भटजी होता. गावातील सर्वांच्या कार्यांना त्यालाच बोलावले जायचे. गुंड्या भटजींच्या हातून घडलेल्या कार्याला यश प्राप्ती होणारच असे त्यांना ओळखले जाते. मोठी मोठी लोक त्यांचे पाय धरत व आदराने त्यांना आपल्या घरी निमंत्रित करत. अत्यंत सुरेख आयुष्य जगल्यानंतर वयाच्या 90व्या वर्षी ते मरण पावले. थेट स्वर्गात एण्ट्री झाली. भटजीबुवा देवासमोर उभे राहिले. देव म्हणाला,, ‘‘या भटजी! आपण अनेकांच्या कार्यांना पूर्ततेचे स्वरूप देऊन माझी कामगिरी केलीत. शाब्बास! तुमचे आयुष्य सार्थकी लागले.’’ त्यावर भटजी म्हणाले, ‘‘देवा, मी सर्वांसाठी पूजा घातल्या, आशीर्वाद दिले. पण माझे नशीब कसले भंगार. ते लिहिताना तू जरा चांगले लिहायला हवे होते. सगळं तूच ठरवतोस, ग्रह घडवतात. आम्ही काय बाबा नुसते तुझ्या लिहिलेल्या गोष्टीतले जोकर.’’ हे ऐकून देव हसला व म्हणाला, ‘‘तुमचा जन्म कोणत्या घरात व परिस्थितीत होतो हे मीच ठरवतो. तुमच्यावर कसे संस्कार होतात हेही माझे लिखित. मिळेल त्या परिस्थितीत तुम्ही स्वत:ला कसे घडवता ही तुमची कारीगिरी. अरे! पण मी मधे मधे गाळलेल्या जागा ठेवल्या आहेत तुमच्या इच्छा भरण्यासाठी. त्यावर मी तथास्तू म्हणतो. तू त्या गाळलेल्या जागा रिकाम्याच ठेवल्यास. त्यात तुझ्या इच्छा भरल्याच नाहीस.’’

इच्छा करणे सोडू नका. कोणत्या इच्छेला तथास्तू हा प्रतिसाद मिळेल हे सांगता येणार नाही. मन मारण्याचा गुन्हा करू नका. आनंदाने हक्काने आणि विश्‍वासाने म्हणा ‘दिल चाहता है..!’

- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- फुलोरा, सामना ०११०२०११

No comments: