रोज इको वाचून, चॅनेलवरच्या चर्चा ऐकून अभ्यास करून समभागाची खरेदी करणार्या गुंतवणूकदारांपेक्षा दीर्घ मुदतीत आळशी गुंतवणूकदार जास्त फायद्यात राहतात. याचे कारण एकच ते (म्हणजे त्यांची गुंतवणूक) चांगल्या संगतीत राहतात. इंग्रजीत म्हणायचे तर असे की दे आर इन द कंपनी ऑफ गुड कंपनीज.
तुम्ही जपानी लेझी फार्मिंगबद्दल कधी वाचले आहे काय? या आळशी शेतीत शेतकरी निंदणी-खुरपणी वगैरे करण्याचे काम न करता नैसर्गिक तणाचा उपयोग खत म्हणून करतो आणि त्याचे कृषी उत्पन्न कृत्रीम खत घालून मशागत करणार्या शेतकर्यांपेक्षा चांगले येते. या शेतकर्यांसारखी एक आळशी गुंतवणूकदारांची जमात असते. ही मंडळी बरेचसे समभाग घेऊन बरीच वर्षे काहीच न करता गप्प बसून राहतात. बाकीचा हवाला कंपनीवर टाकून मोकळे होतात. आश्चर्य म्हणजे रोज इको वाचून, चॅनेलवरच्या चर्चा ऐकून अभ्यास करून समभागाची खरेदी करणार्या गुंतवणूकदारांपेक्षा दीर्घ मुदतीत हे आळशी शेतकरी जास्त फायद्यात राहतात. याचे कारण एकच ते (म्हणजे त्यांची गुंतवणूक ) चांगल्या संगतीत राहतात. इंग्रजीत म्हणायचे तर असे की दे आर इन द कंपनी ऑफ गुड कंपनीज.
या सुसंगतीचा आज आपण अभ्यास करूया. यासाठी निवड करायची ती उदयोन्मुख धंद्याला सामोरे जाणार्या कंपन्यांशी. विप्रोचे उदाहरण घ्या - तेल, साबण, ट्युबलाईट, बल्ब बनवणार्या कंपनीने संगणकाच्या उद्योगात ते क्षेत्र नवीन असताना प्रवेश केला आणि आज विप्रो हिंदुस्थानात संगणक क्षेत्रात अग्रगण्य कंपनी आहे. ज्या आळशी गुंतवणूकदारांनी पन्नास समभाग सप्टेंबर १९९२ साली घेतले असतील त्यांच्याकडे आजच्या तारखेस कमीतकमी पंधराशे समभाग असतील आणि आजची समभागाची किंमत चारशे चाळीस. चारशे चाळीस गुणीले पंधराशे ...गणित तुम्हीच मांडा, म्हणजे आळशी शेतकरी कसा फायदा करून घेतो ते कळेल, पण अट एकच यु शुड बी इन द कंपनी ऑफ गुड कंपनी.
शिकेकाई साबण असू देत किंवा संतूर साबण किंवा संगणक क्षेत्र असू देत विप्रो आघाडीवरच राहिली आणि सोबत गुंतवणूकदारही कायम फायद्यात राहिले. एक फरक मात्र लक्षात घेण्यासारखा असा आहे की गुंतवणूकदारांनी जी एकनिष्ठा दाखवली त्याचा फायदा त्यांना मिळाला. कंपनी एकनिष्ठेचे बक्षीस देते, बाजार नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण इतिहासाचा अभ्यास करण्यापेक्षा वर्तमानात येऊन विचार करूया की आळशी गुंतवणूकदारांनी या पडत्या बाजारात कोणत्या समभागात गुंतवणूक करावी. लार्सन अँड टूब्रो या कंपनीच्या समभागात गुंतवणूक केल्यास आळशी शेती करण्याचे पुण्य नक्कीच गाठीला बांधता येईल. इंजिनीअरिंग, बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत ही कंपनी सध्या अग्रेसर आहे. अर्थातच लेझी फार्मिंगसाठी एक चांगली संधी आहे.
‘कासवछाप’ गुंतवणूक
बाजारात सट्टा करून पैसे मिळवणे हे रक्तातच असावे लागते अशी अजूनही समजूत आहे. त्यांच्यासाठी टर्टलची कथा आज सांगणार आहे. १९८३ च्या दरम्यान रिचर्ड डेनीस आणि विल्यम एखार्ट या दोन सटोडियांनी यशस्वी केलेल्या एका प्रयोगाची ही कथा आहे. पाच हजार डॉलरच्या भांडवलातून दहा कोटींचे भांडवल नफ्यातून उभे करणार्या डेनीसचा आणि त्याच्या भागीदाराचा वादाचा विषय नेहमी एकच असायचा की यशस्वी सटोडिये जन्मत:च तसे असतात की सट्टा करणे हे कोणालाही जमण्यासारखे आहे.
डेनीसच्या मते सट्टा करणे शिकावे लागते. मिळालेली शिकवण जर शिस्तीने अमलात आणली तर यश हमखास मिळते. हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी या जोडगोळीने पेपरात जाहिरात देऊन तेरा जणांची निवड केली. यापैकी कोणालाही सट्टा करण्याचा अनुभव नव्हता. किंबहुना बरेच जण बाजारात अगदी नवागत होते. एकजण हेअर ड्रेसर तर एकजण बँकेचा वॉचमन अशा प्रकारची ही जमवाजमव होती. दोन आठवड्यांच्या ट्रेनिंगनंतर प्रत्येकाला पन्नास लाखांचे भांडवल सट्टा करण्यासाठी दिले गेले. अट एकच- जे नियम शिकवले आहेत त्याचाच आणि फक्त त्याचाच वापर सट्टा करताना करायचा. या बछड्या सट्टेबाजांना ‘टर्टल’ म्हणून संबोधण्यात यायचे.
नंतरच्या पाच वर्षांत या टर्टलच्या टिमनी साडेसतरा कोटी डॉलरची कमाई केली होती. तात्पर्य- सट्टा करून पैसे कमावणे हे अवगत करण्याचे कौशल्य आहे. भविष्यकाळात या प्रकारच्या ट्रेडिंगचा अभ्यास आणि टर्टलची काही तत्त्वे आपणही अभ्यासणार आहोत.
आपत्ती आणि संधी
गेल्या आठवडयात शेअर बाजारात झालेली रक्तहीन उलथापालथ ही इजिप्तमधल्या रक्तरंजीत चळवळीचा परिणाम आहे असे म्हटल्यास ते फारसे वावगे ठरू नये. आधीच भाववाढीच्या - लाचखोरीच्या प्रश्नाने बाजार डळमळीत होत असताना इजिप्तची बातमी आणि जीम रॉजर्स या तज्ञाने केलेली टिकाटिप्पणी म्हणजे पादर्याला पावट्याचे निमीत्त असा काहीसा प्रकार झाला. सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी यापासून बोध घ्यायचा आहे. धसका नाही. बोध एव्हढाच घ्यायचा आहे की आपला शेअर बाजार जगातील घटनांकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून बघू शकत नाही. इतरत्र जे काही घडत असेल त्याचा पडसाद आपल्याकडे उमटणार हे नक्की.. आपले चलन अजून पूर्णपणे परीवर्तनीय नसल्यामुळे झळ कमी बसेल. इजिप्तमध्ये पेटलेला वणवा आपल्या उंबरठयाशी येऊन थांबेल. जर आखाती देशात जर तो पसरला तर... पुढे काय या विचारांनी त्रस्त असलेल्या विदेशी गुंतवणूक कंपन्या हातातील जोखीम कमी करीत आहेत. देशी गुंतवणूक कंपन्या हा मंदीचा मारा अंगावर घेण्याइतक्या सशक्त नाहीत. छोटया गुंतवणूकदारांना समभागांचा बस्ता बांधण्याची ही उत्तम संधी आहे.
- रामदास
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.
No comments:
Post a Comment