Sunday, October 16, 2011

मॅगी आणि शेवयांची खीर - ९




दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करताना गेल्या शनिवारी ऊर्जा आणि धातू कंपन्यांचा विचार झाला. गुंतवणुकीचा एक भाग पॉवर कंपनीत, दुसरा भाग पोलाद आणि धातू कंपनीत तर तिसरा भाग अन्न आणि अन्न प्रक्रियेसाठी...

अन्न आणि अन्नपदार्थ प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांचा विचार करताना या विषयाचा आवाका किती मोठा आहे ते समजून घेणे जरुरीचे आहे. अन्न पदार्थ म्हणजे त्यात खाद्य आणि पेय असे दोन्ही पदार्थ आले. (दारूच्या कंपन्यांचा यात समावेश नाही.)
अगदी चहाच्या कंपन्यांचा विचार करायचा झाला तरी निवडक निवडक म्हणताना वीस कंपन्यांचा अभ्यास करावा लागेल. शक्तीवर्धक पेयांचा विचार करायचा तर काही औषध कंपन्यांचा पण विचार करावा लागेल. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा विचार करावा तर या क्षेत्रातील सगळ्यात मोठी कंपनी ‘अमूल’ जी बाजारात नोंदणीकृत नाही. (ती एक सहकारी संस्था आहे.) खाद्य पदार्थांचा विचार करावा तर यादी फार मोठी होईल म्हणून थोडा इतिहास आणि थोडेसे समाजकारण आणि आजचे राहणीमान याचा विचार करून दोन किंवा तीन कंपन्यांचा समावेश आपल्या गुंतवणुकीत करावा असे माझे मत आहे. १९६९ ते १९७२ चा काळ.

अन्नासाठी दाही दिशा । फिरवीशी आम्हा जगदीशा। अशी आपली स्थिती होती. लागोपाठ आलेल्या अवर्षणाच्या मोसमाने आणि एका युध्दाने (१९७१ हिंदुस्था-पाकिस्तान) देशातील अन्नधान्य परीस्थिती केविलवाणी झाली होती. अमेरिकेच्या पीएल ४८० कलमांचा लाल गहू आणि मका खाण्याचे दिवस होते. त्यामुळे या कंपन्यांना चांगले दिवस येण्याची शक्यता नव्हतीच पण त्यानंतरच्या काळात आलेल्या काही क्रांतिकारक बदलांनी या कंपन्यांना सोन्याचे दिवस आले. ते बदल म्हणजे

* हरीतक्रांतीचे आणि त्यापाठोपाठ श्‍वेतक्रांतीचे फायदे

* सहकारीक्षेत्रात साखर-दूध यांचे वाढते उत्पादन (अमूलने पोल्सनची मक्तेदारी संपवली)

* इंदिरा गांधींनी वाहतुकीसाठी नॅशनल परमीटची पद्धत सुरू केली. अन्नधान्य एका राज्यातून दुसर्‍या राज्यात सहज जाऊ लागले. आपण आता ज्याला लॉजिस्टीक्स म्हणतो त्या जमान्याची सुरुवात.

* आयात केलेल्या पाम तेलासारख्या स्वस्त तेलांना खाद्यपदार्थ म्हणून समाजाने दिलेली मान्यता.

* पॅकेजिंगच्या तंत्रज्ञानात आलेला आमूलाग्र बदल. उदाहरणार्थ: टेट्रापॅकचे तंत्रज्ञान. आतापर्यंत फक्त दोन दिवस शुध्द राहणारे दूध सहा महिने ताजे राहायला लागले.

या सगळ्याच्या जोडीला एकत्र कुटुंबपद्धतीचे विकेंद्रिकरण -सामाजिक स्थलांतरण - गावांचे शहरीकरण हे पण बदल येत गेले आणि त्यामुळे तयार अन्नपदार्थांची मागणी वाढत गेली. या परिवर्तनाचा विचार करून ज्या कंपन्यांनी व्यूहरचना केली त्या कंपन्या म्हणजे त्यांचे समभागधारक दीर्घकाळ नफ्यात राहतील म्हणून मूल्यांकनाच्या अनेक निकषांपैकी एकच निकष वापरून आजची गुंतवणूक ठरवणार आहेत. हा निकष म्हणजे ब्रँड. बाजारात ज्या कंपन्यांची मोठी उलाढाल करणारे यशस्वी ब्रँड असतील त्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. हे ब्रँड तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते समाजाच्या राहणीमानाची गरज भागवतात. जे ब्रँड राहणीमानाची गरज पूर्ण करत नाहीत ते नाहीसे होतात .उदाहरणार्थ- सफल हा हिंदुस्थान लिव्हरचा ब्रँड अवेळी आला म्हणून विस्मरणात गेला. गरज उभी राहिल्यावर ज्याची आठवण होते तो ब्रँड. या मानांकनात दोनच कंपन्या अग्रगण्य आहेत त्या म्हणजे नेसले इंडिया आणि ब्रिटानिया. सामाजिक राहणीमान आणि गरजा यामुळे या दोन्हींचा अभ्यास करून ब्रँड बनवल्यामुळे केवळ शहरातच नाही तर खेड्यापर्यंत या कंपन्या पोहोचल्या आहेत. खाण्यासाठी हातात तयार -आरोग्यदायी -लज्जतदार -स्वस्त आणि मस्त -बराच काळ टिकणारे —ही गुणवत्ता डोळ्यांसमोर ठेवल्याने दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनात दरवर्षी वाढ होते आहे. थोडासा खोलवर तपास केला तर हातात येणारे आकडे थक्क करणारे आहेत. ब्रिटानियाची उत्पादने तीस कोटी घरांमध्ये -ज्यापैकी चाळीस टक्के खेड्यात आहेत -खपतात. एकूण साठ कोटी बिस्किटांची पाकिटे दरवर्षी खपतात. टायगर हा त्यांचा अग्रेसर ब्रँड.
आता विचार करू या नेसलेचा .असे एकही घर आता दिसत नाही जेथे मॅगीने शिरकाव केला नाही. मॅगी हा नेसलेचा जास्तीत जास्त खपाचा ब्रँड. सोबत मॅगीचा सॉस .या एका ब्रँडमध्ये चौदा व्हेरीअंटस् आहेत. जेवणाची वेळ टळली, रोमान्सचा मूड आहे? सोबत किटकॅटचा ब्रेक आहे. चॉकलेटस्मध्ये नेसलेची बारा प्रकारची व्हेरीअंटस् आहेत. जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर असा मोठा ताफा असलेल्या कंपनीत करावी. मग बाकी कंपन्या टाकाऊ आहेत का? नाही .असा निष्कर्ष काढणे फार चुकीचे ठरेल. यशस्वी ब्रँड म्हणजे गुंतवणूक योग्य कंपनी हा निकष महत्त्वाचा.

* काही वेळा केवळ एका ब्रँडवर कंपनी चांगला नफा करू शकते .बँबीनो ऍग्री फूडस् या कंपनीकडे बघा. वर्मिसेली किंवा ज्याला आपण शेवया म्हणतो. या एका ब्रँडवर कंपनी भरघोस नफा दाखवू शकते आहे. आजच्या तारखेस या कंपनीचे समभाग फक्त बत्तीस रुपयांत मिळत आहेत. नेसलेचा भाव आहे तीन हजार दोनशे रुपये तर ब्रिटानियाचा भाव आहे तीनशे तीस रुपये. ज्यांना मोठ्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी मॅगी आहे -छोट्या कंपनीत गुंतवणूक करायची असेल त्यांच्या बँबीनोच्या शेवयांची खीर आहे.

* वि.सू. : अन्न आणि त्यावरील प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी वर लिहिलेला हा एकच निकष आहे आणि हा लेख सर्वसमावेशक आहे असे नाही. ज्यांना दीर्घ मुदतीसाठी जी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा अतिशय सोपा निकष आहे.


- रामदास

(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)


No comments: