Friday, October 21, 2011

जरा जपून... १६

गेल्या पंधरवड्यातल्या बाजाराच्या हालचालीवरून काही निश्‍चित असा तर्क बांधणे कठीण आहे. लागोपाठ येणार्‍या सार्वजनीक सुट्ट्यांमुळे बाजार कभी हा कभी ना या पध्दतीने पुढे मागे सरकत होता. या पंधरवड्याच्या शेवटी इन्फोसीस या अग्रगण्य कंपनीचे निकाल आले आणि शेवटच्या दिवशी बाजार घसरला. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत जपून पैसे गुंतवावे असा माझा सल्ला राहील. इन्फोसीसचा बाजारभाव घसरून पुन्हा स्थिरावेल आणि त्यासोबत याच क्षेत्रातील इतर कंपन्यांचेही भाव खाली येऊन स्थिरावतील अशी अपेक्षा आहे. या निमित्ताने दोन मुद्दे समोर आले ते असे की सॉफ्टवेअर कंपन्यांतील पगार की आता काळजी करण्याची बाब होणार आहे. इन्फोसीसच्या प्रत्येक तासासाठी मिळणारे मूल्य प्रत्येक कंपनीला मिळत नाही. त्यामुळे इतर कंपन्यांना आपल्या कामाचे दर कमी जास्त करावे लागतील. दुसरा मुद्दा कंत्राटी कामाची मुदत आतापर्यंत लांबलचक असायची परंतु यानंतर ही मुदत कमी होत जाणार आहे .याचा परिणाम या क्षेत्रातील कंपन्यांना पण भासणार आहे. पुढच्या वर्षी एका शेअर पाठीमागचा नफा (ईपीएस) यामुळे कमी राहील, अशी शक्यता आहे. सौ बात की एक बात अशी की सॉफ्टवेअर कंपन्यांचे भाव स्थिरावेपर्यंत गुंतवणूक करू नये.
लागोपाठ येणार्‍या सार्वजनीक सुट्ट्यांमुळे बाजार कभी हा कभी ना या पध्दतीने पुढे मागे सरकत होता. या पंधरवड्याच्या शेवटी इन्फोसीस या अग्रगण्य कंपनीचे निकाल आले आणि शेवटच्या दिवशी बाजार घसरला. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत जपून पैसे गुंतवावे

इतर आर्थिक ढोबळ कारणांमुळे बाजार तेजी पकडेल असे आता वाटत नाही. मंदीचे वातावरण तयार होण्यासाठी एक दोन दिवस परदेशी वित्तसंस्थांनी विक्री केली तर बाजाराचा मूड बदलतो. उदाहरणार्थ १५एप्रिल रोजी या संस्थांनी विक्री केली आणि बाजार घसरला. याच महिन्यात सतत सात दिवस याच संस्था खरेदी करीत असताना बाजार तेजीचे संकेत देत होता. अशावेळी गुंतवणूकदारांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे भाव वाढताना दिसले की या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. गुंतवणुकीसाठी गॅमन इंडिया हा समभाग लक्ष देण्यासारखा वाटतो.

शेअर बाजारात गुप्तधन शोधणार्‍यांची एक जातकुळी असते. गुप्तधन म्हटल्यावर डोळ्यांसमोर लिंबू-गुलाल-कोहळा- उलट्या पिसाची कोंबडी असे काही नाही. गुप्तधन म्हणजे बाजाराच्या रोजच्या धबडग्यामुळे बर्‍याच गुंतवणूकदारांच्या नजरेआड झालेले समभाग . या अंकात आपण अशा प्रकारच्या समभागाची दोन उदाहरणे बघू या.

गुप्तधनाचे योग

पहिल्या समभागाचे नाव आहे नॅशनल पॅरॅक्सॉईड. सायन उद्योगात असलेली ही कंपनी बॉंबे डाइंग या सुप्रसिध्द उद्योगसमूहाच्या मालकीची कंपनी आहे. कंपनीचे प्रत्येक समभागापाठीमागचे उत्पन्न ८३ रुपये आहे. समभागाचे पुस्तकी मूल्य १३६ रुपये तर पीई रेशिओ ७.१५ आहे. याच क्षेत्रात काम करणार्‍या इतर कंपन्यांचे पीई रेशिओ १३.१५ आहे. कंपनी अत्यंत आकर्षक असा लाभांशपण वर्षानुवर्षे देत आहे. म्हणजे या कंपनीच्या भाववाढीला अजूनही जागा आहे. तर अशा सर्वगुणसंपन्न समभागाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष का नाही? कारण एकच की हा समभाग लोकप्रिय समभागाच्या यादीत नाही. कंपनीचे भागभांडवल फार छोटे असल्यामुळे बाजारात मागणी केली तरी समभाग मिळतील याची खात्री नाही. समभाग न मिळण्याचे महत्त्वाचे कारण असे की कंपनीच्या प्रवर्तकांकडे ५५ टक्के भाग भांडवल आहे. म्हणजे ते बाजारात विक्रीस उपलब्ध नाही. २५ टक्के भागभांडवल सॉल्व्हे या अग्रगण्य विदेशी रसायन कंपनीकडे आहे. (अभ्यासू वाचकांनी सॉल्व्हेच्या संस्थळाला जरूर भेट द्यावी.) सॉल्व्हेच्या मालकीचे समभागही बाजारात विक्रीस येण्याची शक्यता नाही. उरलेले ३० टक्के समभाग विखुरले असल्यामुळे तरंगते समभाग बाजारात कमी आहेत. जर हे समभाग गेल्या वर्षी तुम्ही घेतले असते तर या वर्षी दामदुप्पट झाली असती. ५६० ते ६०० रुपयांच्या दरम्यान हे समभाग मिळाले तर घ्यायला हरकत नाही. दुसरे उदाहरण रेवथी सीपी या कंपनीचे घ्या. कॉम्प्रेसर बनवणारी कॉन्सोलिडेटेड न्युमॅटिक या कंपनीचे प्रवर्तक होती. ती कंपनीनंतर ऍटलास कॉपको या कंपनीत विलीन झाली आणि रेवथीचे भाग भांडवल ऍटलास कॉपकोनी डालमिया उद्योगसमूहाला विकले. आजच्या तारखेस ५० टक्के समभाग त्यांच्या कडेच आहेत. उरलेले समभाग विखुरलेले असल्याने समभागाची खरेदी एका ऑर्डरमध्ये होत नाही. ट्रक माउंटॅड बोरिंंग कॉंप्रेसर हे या कंपनीचे उत्पादन आहे. या क्षेत्रात स्पर्धेत फारसे कोणीही नाही. हे समभाग ४४५-४५५ यादरम्यान मिळाल्यास सहा महिन्यांच्या गुंतवणुकीसाठी घ्यावयास हरकत नाही. ही फक्त दोन उदाहरणे झाली .या व्यतिरिक्त अनेक अशा कंपन्या आहेत.गुंतवणूकदारांना या आठवड्याचा गृहपाठ हाच की अशा आणखी दोन कंपन्या गुंतवणुकीसाठी शोधाव्या. या कोड्याचे उत्तर अर्थात नंतरच्या एखाद्या भागात दिले जाईल.

दीडदमडीचे समभाग अर्थात पेनी स्टॉक

शांती नावाच्या एका सीरिअलमध्ये काम करणारी मंदिरा बेदी आठवा किंवा उत्सव मधला शाहीद कपूर आठवा.एकेकाळी क्षुल्लक भूमिका करणारे हे कलाकार हळूहळू स्टार कधी बनले हे कोणालाच कळले नाही. फिल्मी दुनियेत असे स्टार हाताच्या बोटावर मोजण्यासारखे तयार होतात परंतु आपल्या शेअर बाजारात असे अनेक स्टार दरवर्षी येत असतात. एखादा समभाग स्टार बनण्याच्या आधीच जे गुंतवणूकदार खरेदी करतात त्यांना तो समभाग स्टार झाल्यावर एखादा हिंदी नाही पण मराठी चित्रपट काढण्याइतकी रक्कम मिळवून देऊ शकतो. हा श्रीमंतीचा मार्ग दिसतो तसा सोपा नाही. स्टार म्हणून कच्ची धूपमधली भाग्यश्री निवडावी - ‘मैने प्यार किया’ सारखा चित्रपट आल्यानंतर स्टार म्हणून अपेक्षा ठेवाव्या आणि तिने संन्यास घ्यावा .असेही प्रकार या उगवत्या स्टारमध्ये (उगवत्या समभागात)होऊ शकतात. इरा इन्फ्रा इंजीनिअरिंंग-अबान ऑफशोअर-श्रीराम ट्रान्सपोर्ट-प्राज इंडस्ट्रीज-पँटालून रीटेल-कल्पतरू पॉवर-हॅवेल इंडिया मदरसुन सुमी- ऍमटेक ऑटो या एकेकाळच्या लुकलुकणार्‍या चांदण्या आता तळपणारे तारे झाले आहेत. सोबत अशाही चांदण्या दिसतात की ज्या अपेक्षेपेक्षा लवकर ’तारे जमींपर’ झाल्या आहेत. एखादा कमी किमतीचा -ज्याला बाजारात पेनी स्टॉक -समभाग घेऊन पाच ते दहा वर्षे वाट बघितल्यावर स्टार समभाग जन्माला येतो. संयम आणि सतत निरीक्षण -अभ्यास -चिकाटी असणार्‍यांसाठी हे क्षेत्र उपलब्ध आहे .या क्षेत्राची गुण विशेषता पुढच्या अंकात बघू या? परंतु तोपर्यंत गुंतवणूकदारांनी स्वत:च्या तार्‍यांची यादी बनवायला हरकत नाही.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना

No comments: