सुरुवात करू या डीमॅट अकाऊंट सुरू करण्यापासून. हे डिमॅट खाते आहे तरी काय? फार सोपे आहे. आपण पैसे बचत करण्यासाठी बँकेत खाते उघडतो. तसेच शेअर घेऊन जमा करण्यासाठी आणि विक्री केल्यानंतर शेअर काढण्यासाठी जे खाते असते त्याला म्हणतात डीमॅट खाते.
आता डीमॅट अकाऊंट उघडायचे कसे? हा प्रश्न आलाच. डीमॅट म्हणजे डिमटेरीअलाइज्ड खाते. कागदी शेअर हातात ठेवण्याऐवजी शेअर या खात्यात जमा करता येतात .जवळजवळ सगळेच दलाल ट्रेडिंग अकाऊंट उघडताना डीमॅट अकाऊंट उघडून देतात. असे खाते उघडण्यात आपली आणि दलालाची सोय असते. याखेरीज बर्याचशा सरकारी आणि सहकारी बँका पण डीमॅट खाते उघडून देतात. हे खाते उघडल्यावर शेअरची खरेदी विक्री सुरू करण्यासाठी तुम्ही सज्ज झालात असे समजा... आता या खात्यात जमा करण्यासाठी शेअर विकत घ्यायला हवेत ते घ्यायचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधून किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधून. या बाजारात खरेदी करण्यासाठी आपल्याला ब्रोकर किंवा मराठीत ज्याला आपण दलाल म्हणतो त्यांच्या मार्फत जावे लागते. तुमच्या पसंतीनुसार दलाल निवडा आणि त्याच्याकडे ट्रेडिंग खाते उघडा. थोडक्यात आता तुमच्याकडे तीन खाती झाली. एक तुमचे बचत खाते -दुसरे डीमॅट खाते -तिसरे ट्रेडिंग खाते. बचत खाते बँकेत उघडताना जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे बाकीची दोन खाती उघडताना लागतात.
ही खाती सुरू केली की शेअर बाजारात येण्याची तयारी पूर्ण झाली.
आता गुंतवणूक करायची म्हणजे भांडवल हवे. भांडवल म्हणजे डोळ्यांसमोर लाखांचे आकडे यायला नकोत. हाताशी असलेल्या पाचशे रुपयांपासून ते वीस पंचवीस हजारांतही हा व्यवसाय सुरू करता येतो. दुसरा प्रश्न असा की, वेळेची गुंतवणूक किती? सुरुवातीला ट्रेनमधून येण्या-जाण्याचा वेळ वाचनाला द्यावा आणि व्यवहारासाठी दहा ते पंधरा मिनिटे.
मग हा आटापिटा करून मिळकत किती होणार? समजून व्यवहार केला तर मुद्दल सुरक्षित ठेवून वर्षाकाठी मुद्दलावर चाळीस टक्के कमावणे फारसे कठीण नाही. उदा: दोन वर्षांपूर्वी ज्यांनी ओएनजीसीचे शेअर घेतले असतील त्यांच्या पाच हजारांचे आतापर्यंत साडेनऊ हजार झाले असतील. म्हणजे जवळजवळ दुप्पट.
आता विचार करा दोन वर्षांत आपले पैसे आपल्या हातात ठेवून दुप्पट होत असतील तर महिन्याला सात-आठ टक्के देणार्या धोकादायक स्किमकडे जा कशाला?
चला,शेअर बाजाराचा पासपोर्ट घेऊ या? हा पासपोर्ट म्हणजे काय तर डीमॅट अकाऊंट.
ते आजच उघडा...
पैसा कसा कमवाल? या लेख मालिकेतील हा पहिला लेख आहे. येत्या वर्षभरात वाचकांची शेअर बाजार ते सरप्लस कमोडिटीपर्यंत सगळ्या बाजाराची ओळख या मालिकेतून करण्याचा प्रयत्न आहे. अनेक वेगवेगळ्या बाजारांचा एकत्रित परिचय करून देण्यासाठी पाच विभागांत या लेखांची मांडणी करण्यात येणार आहे.
* शेअर बाजाराची ओळख :
- आयपीओ अर्थात नवीन शेअरची विक्री आणि नोंदणी.
- सेकंडरी मार्केट : बाजारातून खरेदी /विक्री आणि नफा कमावण्याच्या अनेक क्लृप्त्या
- फ्युचर आणि ऑप्शन मार्केट : कमीत कमी भांडवलात कल्पनेपलीकडची कमाई कशी करावी.
* कमोडिटी मार्केट : या लेखात कमोडिटी म्हणजे नॉन ब्रँडॅड वस्तूंची खरेदी विक्री करून नफा कमावण्याच्या युक्त्या.
* विदेशी मुद्रा : फॉरेक्स मार्केटमधून पाच हजारांच्या छोट्या गुंतवणुकीतून लाखो रुपयांची कमाई कशी कराल याची ओळख.
* इन्शुरन्स मार्केट : सर्वसाधारण विमा ते जीवन विमा याची विक्री आणि त्यातून आयुष्यभर निरंतर उत्पन्न मिळवण्याची साधने कशी उपलब्ध आहेत याची ओळख.
* सरप्लस मार्केट. १) डोमेस्टिक सरप्लस, २) एक्सपोर्ट सरप्लस ३) इंपोर्ट सरप्लस ४) शेल्फ पूलआऊटस् या बाजारांची ओळख.
या विभागाची ओळख अशी की या विषयात मराठीत काय किंवा इंग्रजी मीडियात काय कुठेही एकसंध माहिती मिळणार नाही जी आमच्या विभागात मिळेल.
* स्क्रॅप आणि नॉन मूव्हिंग : या बाजारातल्या उलाढालीची एकत्र नोंदणी कुठेच नसल्यामुळे या बाजारात फायदा किती आहे याची कल्पना फक्त या बाजारातील माणसांना आहे परंतु आपल्या लेखातून जी माहिती दिली जाईल त्यातून अनेक तरुणांना करोडपती बनण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
थोडासा गृहपाठ
गेल्या वर्षभरात बक्कळ नफा कमवून देणार्या नवीन कंपन्यांची यादी खाली देतो आहे आणि सोबत त्यांची सुरुवातीची किंमत .
तुम्ही एकच काम करा शेअर बाजाराचे पान उघडून आज त्या शेअरची काय किंमत आहे ते पडताळून बघा.
जानेवारी २०१०
DB Corp
२१२.००
Godrej Proper
४९०.००
फेब्रुवारी २०१०
Jubilant Food
१४५.००
मार्च २०१०
United Bank
६६.००
एप्रिल २०१०
Persistent
३१०.००
मे २०१०
Talwalkars Fitn
१२८.००
जुलै २०१०
Aster Silicates
११८.००
ऑगस्ट २०१०
Prakash Steelag
११०.००
सप्टेंबर २०१०
Gujarat Pipavav
४६.००
ऑक्टोबर २०१०
Electrosteel St
११.००
नोव्हेंबर २०१०
Coal India
२४५.००
डिसेंबर २०१०
MOIL
३७५.००
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना.
No comments:
Post a Comment