कल्याण आणि वरळी-मेनमुळे ओपन आणि क्लोज हे दोन्ही शब्द बर्याच जणांच्या परिचयाचे असतीलच. आपल्या बाजारातसुद्धा हे दोन्ही शब्द वारंवार वापरले जातात. ओपन -खुलता भाव म्हणजे सकाळी बाजार सुरू झाल्यावरचा भाव आणि क्लोज -बंद भाव म्हणजे बाजार बंद होतानाचा भाव. याखेरीज महत्त्वाचे शब्द म्हणजे हाय आणि लो. हाय म्हणजे त्या दिवसाचा जास्तीत जास्त भाव आणि लो म्हणजे त्या दिवशीचा कमीत कमी भाव. या दोन्ही शब्दांना जोडून ५२ वीक हाय -लो असा शब्दप्रयोगदेखील होताना दिसतो.
त्याचा सरळ साधा अर्थ म्हणजे गेल्या वर्षभरातला जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव. एखाद्या शेअरच्या भावाचा विचार करताना त्याचा टप्पा म्हणजे वधघटीची कुवत समजण्यासाठी याचा उपयोग होतो. हे सगळे शब्द शेअरचा भाव सांगण्यासाठी वापरले जातात.
शेअर बाजार आज कसा आहे किंवा गेले काही दिवस कसा आहे हे सांगण्यासाठीचे जे शब्दप्रयोग केले जातात त्याची पण ओळख करून घेऊया. बुल फेज म्हणजे सरासरीनुसार रोज बाजारातले शेअरचे भाव वाढत जातात तो कालखंड (तेजीचा बाजार). बेअर फेजमध्ये अगदी याच्या उलट म्हणजेच सरासरीनुसार शेअरच्या भावामध्ये रोज घट होते तो कालखंड (मंदीचा बाजार). काही वेळा बाजार तेज आहे असेही म्हणता येत नाही किंवा मंद आहे असेही सांगता येत नाही त्या कालखंडाचा उल्लेख साईडवेज मार्केट असा होतो.मराठीत या सगळ्या शब्दांसाठी निश्चित असे काही शब्द नाहीत त्यामुळे आपण जेथे शक्य आहे तेथे मराठी शब्द वापरू किंवा जेथे नवीन शब्दप्रयोग अमलात आणणे आहे तेथे नवीन प्रयोग करू. उदाहरणार्थ साईडवेज मार्केटला लेझीम हा शब्द वापरू या. जसे लेझीम खेळताना दोन पावले पुढे आणि एक पाऊल मागे अशी हालचाल होते तसेच साईडवेज मार्केट असते. काही जण याला ग्यानबा-तुकाराम बाजार म्हणतात. ग्यानबा म्हटले की दोन पावले पुढे आणि तुकाराम म्हटले की एक पाऊल मागे.
बर्याच वेळा रेंज बाऊंड मार्केट आहे असे म्हटले जाते. रेंज बाऊंड म्हणजे विशिष्ट टप्प्याच्या पलीकडे बाजार हलत नाही अशी स्थिती. यासाठी मराठी शब्द आहे टप्पाबंद बाजार.
सकाळी शेअर बाजाराची वेगवेगळी चॅनेल बघताना बर्याच वेळा रॅली हा शब्द कानावर पडत असेल. रॅली दोन प्रकारची असते बुल रॅली किंवा बेअर रॅली. आधी हे लक्षात घेऊया की बुल म्हणजे तेजी आणि बेअर म्हणजे मंदी. आता बुल रॅली म्हणजे बाजाराची गतिमान हालचाल ज्यात बाजार वेगाने तेजीच्या दिशेने जात असतो. अर्थातच बेअर रॅलीत या उलट हालचाल होत असते. रॅलीसाठी मराठीत दंगल हा शब्द तुम्हाला सुचवतो आहे. तेजीची दंगल आणि मंदीची दंगल. बघा हे शब्द जमतात का?
सौजन्य:- फुलोरा, सामना.
No comments:
Post a Comment