Tuesday, August 02, 2011

चाळ - एक संस्कृती...

मागे 'इमारती २ बीएचके 4 बीएचके'  हा लेख लिहित असताना 'चाळ' या शब्दाचा उल्लेख आला होता, व त्यानंतर मी पुन्हा एकदा त्या आमच्या विक्रोळीतील चाळी मधील आठवणीत रममाण झालो.

तसा माझा जन्म झाला तेव्हा आम्ही विक्रोळीतील 'मयुरेश को. ओप. हौसिंग सोसायटी' या तीन चाळी असलेल्या कॉलनीत राहत असू. मला आजही आठवत ते 'रामायण' हि दूरदर्शन वरील मालिका. तेव्हा वडिलांनी २७ इंची TELI RAD या कंपनीचा  T .V . आणला होता. त्यावर चित्र एवढे मोठे दिसायचे कि त्यामुळे शेजारी आमच्या कडेच येऊन ती
मालिका पाहत असत.
 
लहानपणी एक गोष्ट मात्र व्हायची मला आई रागावली कि मी डुंबरे मामांकडे जाऊन राहायचो व त्यांची मुले नितेश, पिंकी, रुपेश त्यांची आई रागावली कि आमच्या कडे येऊन राहत असू. मग त्या दिवशी माझे जेवण त्यांच्या कडेच व्हायचे व मी वडील घरी आल्याशिवाय घरी जात नसे. तेव्हाचा तो राग म्हणजे बालपणातला राग असे. पण त्यामुळे 'शेजार धर्म' या संस्काराचे बाल कडू मिळाले होते.
 
एकदा अशीच दुपारची बोंबाबोंब झाली, बाहेर आल्यावर समजले कि, शिंदे काकूंच्या घरात साप घुसलाय म्हणून. तेव्हा मग कोणीतरी एका माणसाला बोलावून आणले तो साप शोधण्यासाठी, तेव्हा तो साप कुठे मिळाला माहित आहे .... RADIO च्या बॉक्स मध्ये. त्या नंतर मला बर्याच वर्षांनी समजले कि तो माणूस ज्याने साप शोधला त्याला 'सर्प मित्र' म्हणतात म्हणून.
 
तिथेच 'सावंत' म्हणून एक कुटुंब राहत असे. त्यांची मोठी मुलगी... अं... आता नाव नाही आठवत, पण ती छान रांगोळी काढत असे. मी तिला एकदा असेच सांगितले कि ताई मला पण शिकव. तर तिने खरच मनावर घेतले व तिने प्रथम मला कागदावर ठिपके काढून त्यावर रांगोळी काढायला सांगितली. तसं शिकल्यावर मग तिने मला जमिनीवर ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग कसे भरायचे ते शिकवले. ती ताई मला विना ठिपक्याची पण रांगोळी शिकवणार होती पण... त्या आधीच आम्ही विक्रोळी सोडली. मग डोंबिवलीला आल्यावर व आजही बदलापूरला आल्यावर दिवाळी मध्ये जेव्हा मी रांगोळी काढतो व मला दोन शब्दांची वाहवा मिळते तेव्हा त्याचे सर्व श्रेय त्या ताईलाच जाते. जर आम्ही तिथे असलो असतो तर आज कदाचित मी मुक्त हस्त रांगोळी देखील काढू शकलो असतो.!
 
पूर्वी चाळी मध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवायची, ती म्हणजे तिथे सर्व सण गुढी पाढवा ते ख्रिसमस एकत्र साजरे केले जायचे. त्यावेळी आमच्या इथे जास्त मराठी व दोन तीन कुटुंबेच गुजराती व ख्रिस्चन होती. पण सर्व सण समभावाने साजरे केले जायचे. त्यातल्या त्यात तुळशीचे लग्न व ३१ डिसेंबर ची रात्र खास असायचे. तुळशी ची लग्न चाळी च्या मधोमध टेबल लाऊन त्याला सजावट करून केली जायची. तुलाशिना सजवणे हा पण एक वेगळाच उपक्रम असायचा. मग तुळशीची लग्न लागल्यावर आम्हा मुलां- मुली  मध्ये चुरस लागायची ती मोठांचे नजरा चुकवून अक्रोड पळवण्याची. मग आम्ही ती घरी घेऊन गेलो कि आमच्या आई आम्हाला सांगायच्या, नंतर सर्वाना वाटणार आहेत तेव्हा परत ठेऊन या. मग सर्व अक्रोड परत आपल्या आपल्या जागेवर येत असत. हि आठवण आजही माझ्या चेहऱ्यावर हसू उमटवून जाते.
 
तसंच, ३१ डिसेंबर ची रात्र पण एक मोठा उत्सव असे. तीच जर शनिवारी आली तर क्या कहने... त्या रात्री तिन्ही चाळी मधले लोक एकत्र येऊन दोन तीन प्रकारचे पदार्थ बनवत असत. मग आम्ही तिथेच मोठा परदा मागवून त्यावर चित्रपट पाहत असू व त्या पदार्थांची चव चाखत असू. त्या वेळी सर्व कुटुंबातील सर्व मंडळी हजार असत व एकही व्यक्ती कार्यक्रम पूर्ण होई पर्यंत जात नसे.

हं.... तो काळच वेगळा होता. आज मला ह्या आठवणीचे खूप महत्व वाटत आहे. ते क्षण आज छायाचित्र रूपाने जतन असायला हवे होते. पण ते वयच लहान होत व तेव्हा असे कॅमेरा वगैरे च फॅड पण नव्हते.
 
जीवन म्हटल्यावर जश्या बर्या आठवणी असतात  तश्याच त्रासदायक आठवणी पण असतात.  
 
आमच्या घरी दर श्रावण महिन्यात वडील 'श्री नवनाथ भक्तिसार' हा ग्रंथ पठण करून पूजा ठेवत असत. असेच एका वर्षी पूजेच्या दुसर्या दिवशी आम्ही प्रसादाच्या पुड्या बांधत असताना शेजारचे डोंगरे आजोबा आले. त्यांना पण देवांची आवड होती व वडिलांनी त्यावर्षी एक हनुमानाची फोटो फ्रेम आणली होती. तेव्हा ते आजोबा फोटो वर करून भिंतीला कुठे लावायचा ते दाखवत होते. त्याचवेळी पंख्याची पात फोटोला लागून काचा उडाल्या व त्यातील एक मोठी काच येऊन माझ्या डोक्यात घुसली, व एकदम धावपळ झाली, डुंबरे मामा आणि  वडील मला पटकन डॉक्टर कडे घेऊन गेले होते. नंतर मला डॉक्टर ने गुंगीचे इंजेक्शन दिले. जेव्हा जाग आली तेव्हा कळले कि २१ टाके घातले आहेत. त्या दिवसा पासून ते टाके काढायच्या दिवसा पर्यंत तिन्ही चाळी मधले कुणी न कुणी दिवसभरात येऊन माझी चोकशी करून जायचे. तेव्हा माणसां मधील  मधली 'आपुलकी' कळली.
 
तसंच एकदा रात्री बोंबा बोंब झाली आग लागल्याची. आमच्या मागील कापड कंपनीला आग लागली होती. त्या रात्री बाकी दोन्ही चाळीतले लोक आग आमच्या चाळी पर्यंत येईल म्हणून पटापट सर्व सामान बाहेर काढत होते व सर्वच रात्रभर जागे होते.  ह्या दोन्ही प्रसंगातील त्या वेळच्या लोकांची आपुलकी, सहकार्य हे खरच वाखाणण्याजोगे आहे.
 
तेव्हाचे लोक निस्वार्थी आणि  एकमेकांना मदत करणारे, सुख दुखात सहभागी होणारे, जात भेद न मानणारे असे होते.  खरच आमची ती चाळ म्हणजे एक संस्कार रुपी परिसरच होता.
 
मी स्वताला खरच भाग्यशाली समजतो कि माझ्या कडे अश्या आठवणींच  गाठोडं आहे, जे कधी तरी नकळत उघडलं कि, मनात एक वेगळीच हसू रुपी लकेर उमटते.
 
मला आज वाटते आहे कि आम्ही अजून हि तिथे राहायला हवे होते.  जस झाड एका जागी उगवल्यावर तिथे ते वाढत असताना आपण त्याला दुसर्या जागी लावतो व मग त्या झाडाला त्या मातीशी, परिस्थितीशी जुळवून घ्यायला वेळ लागतो, तशीच स्तिथी माझ्या सारख्या इतर अनेक जणांची झाली असेल, ज्यांना काही कारणास्तव आपले जन्म स्थान सोडावे लागले असेल.
 
मला आज वाटत आहे कि, तेव्हा मुंबई सोडायला नाही पाहिजे होती, मुंबईत मराठी माणसाला उद्योग धंदा करण्या साठी बर्याच संधी उपलब्ध आहेत. हे मला वाटले कारण, माझ्या सारख्याच एका मित्राचे CYBER  कॅफे लालबागला आहे. तसेच त्यांचा परंपरागत गणपती मूर्ती बनविण्याचा पण उद्योग आहे.  मला अश्या सर्व मराठी माणसांचा अभिमान वाटतो, ज्यांनी मुंबई न सोडता तिथेच आपले उद्योग धंदे सुरु केले आहेत.
 
ह्या सर्व आठवणी आठवल्यावर वाटते कि, पुढची पिढी फक्त ब्लोक मध्ये च जन्माला येणार, तिथेच वाढणार व तिथेच गतप्राण होणार. त्यांना कधी या   चाळ रूपी संस्काराचे बाळ कडू मिळणार नाही !!

No comments: