सणांचा मौसम सुरू झाला की घराघरात गोड पदार्थांचा घमघमाट सुरु असतो. गोड पदार्थाशिवाय सण पूर्ण होतच नाही त्यातही आपल्याकडे आग्रहाची संस्कृती! त्यामुळे ‘आजचा दिवस खा उद्यापासून पथ्य करा’ असा आग्रह केला की खवय्यांचा ताबा सुटलाच म्हणून समजा. पण मधुमेह आणि वजन वाढण्याच्या समस्यांपासून दूर राहायचं असेल तर गोड खाण्यावर संयम ठेवायलाच हवा. पण हा संयम ठेवायचा कसा हे सांगणार्या या काही युक्ती नक्कीच उपयोगी येतील.
- गोड पदार्थ पाहिला की तो खाण्याची इच्छा अनावर होते. अशावेळी त्या गोड पदार्थाचा लहानसा तुकडा उचला. म्हणजे कमीतकमी गोड तुमच्या पोटात जाईल. शिवाय दुसर्यांदा गोड मागून खाताना तुम्ही लाजेखातर मागणार नाही.
- कॉम्बिनेशन करून खा. म्हणजे एखादा गोड पदार्थ पुढे केला तर तो पदार्थ दुसर्या एखाद्या तिखट पदार्थासोेबत किंवा हेल्दी पदार्थासोबत मिसळून खा.
- थोडासा गोड पदार्थ खाल्यावर लगेचच वेगळा एखादा पदार्थ चाखून बघा म्हणजे तुमच्या जीभेची चव बदलेल आणि तोच गोड पदार्थ पुन्हा खाऊन बघण्याची इच्छा होणार नाही.
- च्युइंग गम खा. ज्यांचे सिगरेटचे व्यसन सुटत नाही त्यांना हा सल्ला दिला जातो. गोड खाणार्यांनीही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. तोंडात च्युइंग गम असल्यामुळे सहाजिकच हात गोड पदार्थाकडे जात नाही.
- तुमच्या समोर गोड पदार्थाचं ताट आलं आणि तुम्ही स्वत:ला रोखू शकला नाहीत तर सरळ तिथून निघून दुसरीकडे जा. म्हणजे तुमच्या डोक्यातून गोडाची इच्छा निघून जाईल.
- काही लोकांना सतत चॉकलेट, आईस्क्रीम, केक खाण्याची इच्छा होते. अशा लोकांनी आकाराने छोटा चॉकलेट किंवा आईस्क्रीमचा बार घ्यावा. म्हणजे तुलनेने कमी गोड खाणेे होते.
- आस्वाद घेऊन खा. खूप गोड पदार्थ भराभर खाण्यापेक्षा एकेक घास जीभेवर चघळून त्याचा आस्वाद घेऊन खा. म्हणजे तुलनेने कमी गोड खाल्ले जाते.
- उपाशी राहू नका. दोन जेवणांच्यामध्ये खूप उपाशी राहिले की गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. हा काळ तुमच्यासाठी धोकादायक असतो. त्यामुळे शक्यतो दोन जेवणाच्यामध्ये काहीतरी आरोग्यवर्धक पदार्थ खावेत म्हणजे गोड खाण्याची इच्छा होत नाही.
सौजन्य:- चिरायू, सामना.
No comments:
Post a Comment