Wednesday, August 31, 2011

हरतालिका….आपले सण समजून घ्या.

आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.


हरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती वं तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. फलाहार करतात. रात्री कथाकथन, जागरण करून सकाळी उत्तरपूजा करतात. देवीला खिचडीचा नैवद्य दाखवून देवीचे विसर्जन करतात.

हे व्रत भक्तीभावाने, निष्ठेने केल्यास मुलींना आपल्या मनाजोगा वर, अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती वं संपत्तीचा लाभ होतो.

हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला. हे करताना तिला “आली” नावाच्या मैत्रिणीने मदत केली. आलीच्या मदतीने हर पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.

ह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे सांब म्हणजेच श्री शंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशीवालाच आपला पती मानले होते.

पित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने, उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.

ही बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी, शक्तीमान, दयाळू होता.

हल्लीच्या मुलींनी वं त्यांच्या पालकांनीदेखील या सणातून शिकण्यासारखे आहे. फक्त संपत्ती, ऐश्वर्य वा दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर, गुणांवर, कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतू सदगुणांची खात्री देता येते. हाच खरा हरतालीकेचा संदेश आहे.

सौजन्य:- http://zampya.wordpress.com/

No comments: