Sunday, August 21, 2011

गोकुळाष्टमीचा गोडवा

गोकुळाष्टमीचा सोहळा सगळ्याच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे जन्मोत्सवाचा प्रसाद. एकीकडे भाकरी, आंबोळ्या असा आहार, तर दुसरीकडे खीर, मसाला दूध असा गोडवा. उद्यापासून कृष्णजन्माचा सोहळा सुरू होतोय. जन्मोत्सवाच्या प्रसादासाठी तुम्ही तयार आहात ना...

रात्री बारा वाजतात आणि घराघरात, मंदिरात कृष्ण जन्मोत्सवाचा जल्लोष सुरू होतो. कृष्णभक्तांचा गोकुळाष्टमीचा उपवास, श्रीमद्भगवद्गीतेचं पठण पूर्ण होतं आणि सगळेच कृष्णाच्या नामस्मरणात दंग होतात. उत्सवाचं खास आकर्षण असतं ते यावेळी तयार होणारा सात्त्विक आहार. कृष्णाच्या आवडीचे पदार्थ हे गोकुळाष्टमी आणि त्यानंतरच्या दहीहंडीच्या दिवशीचा खास मेन्यू असतो.


गोकुळाष्टमीच्या उपवासादरम्यान कृष्णमूर्तीसमोर पाचपेक्षा जास्त प्रकारची फळं ठेवली जातात. कृष्णजन्मानंतर ही फळं कापून त्याचा काला तयार केला जातो. कृष्णभक्तांबरोबरच दहीहंडी फोडणार्‍या गोविंदाच्या टोळीलाही या काल्याचा प्रसाद वाटला जातो. काही ठिकाणी दुधापासून तयार केलेल्या विविध मिठाई एकत्र करून हा काला तयार केला जातो.


रात्री बारानंतर उपवास सोडणारे कृष्णभक्त परंपरेने चालता आलेला एक ठरावीक आहार घेतात. यात भाकरी, आंबोळ्या, उसळ, मुगाची भाजी यापैकी पदार्थांचा समावेश असतो. काही भक्त दूध, दही, खीर यांसारखे पदार्थच घेतात. एकूणच कृष्णभक्त उपवासानंतर हलकाफुलका आहार घेण्यावर भर देतात.


कृष्णजन्मोत्सवाचा सोहळा रात्री बाराला सुरू होऊन दुसर्‍या दिवशीही सुरू राहतो. एका बाजूला रस्त्यारस्त्यावर दहीहंडीचा जल्लोष असतो तर दुसर्‍या बाजूला कृष्णभक्त नावाजलेल्या मंदिरात आवडीने घेतला जातो. त्यामुळेच गोकुळाष्टमीला मिठाईमध्ये नेहमीच्या पर्यायांबरोबर फ्रुटस्, मिक्स फ्लेवर असे विविध पर्याय उपलब्ध असतात. गोल, चौकोनी मिठाईचा जमाना तर कधीच गेलाय. त्याऐवजी सफरचंद, केळी, कलिंगड यांसारख्या विविध फळांच्या आकाराच्या मिठाई आवडीने घेतल्या जातात. गोकुळाष्टमीचा उत्सव हिंदुस्थानातल्या कानाकोपर्‍यात साजरा केला जातो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू यासारख्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीनं धार्मिक पूजाअर्चा केल्या जातात. त्यामुळे त्या त्या राज्याची स्पेशालिटी असलेले गोडधोड पदार्थ तयार करण्याची पद्धत आहे.

- क्षितिजा परब
saamana.phulora @gmail.com

No comments: