Saturday, August 13, 2011

ओळख सेकंडरी मार्केटची - ५

गेले काही दिवस उत्तर हिंदुस्थानात गोठवणारी थंडी पडते आहे. मुंबईच्या समशीतोष्ण हवामानात मात्र गुंतवणूकदारांना हुडहुडी भरते आहे ते रोज घसरणारा बाजार बघून. आजच्या लेखात विचार करू या संधीचा फायदा करून घेण्याचा.

सेकंडरी मार्केटमध्ये खरेदीची सुरुवात आज आपण करूया. या खरेदीच्या प्रस्तावापूर्वी काही महत्त्वाची सूत्रे.

१)
अ : ट्रेडिंग खाते आहे आणि हातात रोख रक्कम आहे म्हणून रोज खरेदी-विक्री करावी असे नाही.

ब: जास्त उलाढाल म्हणजे जास्त नफा असे नाही.

क: बाजारात केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत हजर राहणेसुद्धा बाजारात असण्यासारखे आहे.

क्रिकेटच्या खेळात फलंदाज प्रत्येक बॉलवर रन काढतोच असे नाही. काही बॉल फक्त तटवायचे असतात. काही बॉलवर किरकोळ धावा काढायच्या असतात. योग्य संधी मिळताच काही बॉल सीमापार करायचे असतात, तर काही वेळा पिचवर टिकून उभे राहणे हाच खेळ असतो.

२)
अ: काही गुंतवणूकदारांची पैसे गुंतवल्यानंतर वर्षभर थांबण्याची तयारी आणि कुवत असेल तर काही गुंतवणूकदारांचा धीर तीन महिन्यांत संपेल. म्हणून खरेदी करण्यापूर्वी गुंतवणुकीचा कालावधी नक्की करावा.

ब: हा कालावधी निश्‍चित केल्यावर नफ्याचे अपेक्षित प्रमाण टक्केवारीतच ठरवावे.

क : ही टक्केवारी कालावधीच्या आधीच मिळत असेल तर विक्री करून नफा जमा करावा. कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा असेल या भ्रमात जमा झालेला नफा काही वेळा अनपेक्षितरीत्या वाया जातो.

येथे टक्केवारीतच नफ्याचा विचार करावा असे सांगतो आहे. कारण वर्षानुवर्षे गुंतवणुकीची काही विचित्र कल्पना आपल्या मनात कळत-नकळत जमा झालेल्या असतात.

उदाहरणार्थ, किती वर्षात दुप्पट? हा प्रश्‍न. गुंतवणुकीचा प्रस्ताव केवळ दुपटीच्या कसावर तपासून बघण्याची सवय आपल्याला लागली १९८५ च्या बजेटनंतर. या बजेटमध्ये सहा वर्षांत दुपटीचा फायदा देणार्‍या नॅशनल सेव्ंिहग सर्टिफिकेटचा समावेश आयकरातील सूट मिळण्यासाठी केला गेला होता. अर्थात ही स्किम लोकप्रिय झाल्यामुळे भविष्यकाळातल्या कुठल्याही प्रस्तावाला किती वर्षात दुप्पट हा एकच नियम लागू केला गेला. दुप्पट म्हणजे वार्षिक बारा-साडेबारा टक्क्यांचा परतावा म्हटले की लोकांना समजेनासे झाले. सहा किंवा साडेसहा वर्षांत दुप्पट म्हटले की गुंतवणूक चांगली हा नियम सगळ्यांना सरसकट लावायला सुरुवात झाली. अशा अडाणी अनुमानाने शेअर बाजारात गुंतवणूक करू नये हा माझा सल्ला आहे. पटीत बोलण्यापेक्षा टक्केवारीत बोलणे जास्त योग्य आहे. दुप्पट म्हणजे स्वत:च्या मनाची सोयीस्कर समजूत आहे, तर टक्केवारी म्हणजे गुंतवणुकीचे योग्य माप आहे.

शेअर खरेदीचे काही बारकावे आता बघूया. समजा पन्नास शेअरची खरेदी करायची असेल तर एकाच वेळी एकाच भावात पन्नास शेअर खरेदी करण्याची ऑर्डर देऊ नये. समजा त्या शेअरचा भाव २१० दहा रुपये असेल तर २०५ ते २१० या दरम्यान दहा किंवा पंधरा शेअर खरेदी करण्याची ऑर्डर डिलरला द्यावी. अशी ऑर्डर देण्याचा हेतू असा की सकाळपासून सुरू होणार्‍या ट्रेडिंग सेशनच्या चढउताराचा पूर्ण फायदा आपल्याला व्हावा. काही वेळा असे होण्याची शक्यता असते की सगळे पन्नास शेअर एकाच दिवसात खरेदी होणार नाहीत. हरकत नाही. दुसर्‍या दिवशी खरेदी करता येईल. खरेदीची सरासरी कमी ठेवणे म्हणजेच नफ्याकडे वाटचाल.

अपेक्षित नफा कमावण्यासाठी शेअर खरेदी करण्यापूर्वी खरेदी कशी करावी हे ठरवण्याची अनेक तंत्रे आहेत. बाजारातला प्रत्येक गुंतवणूकदार स्वत:च्या अनुभवानुसार आपले तंत्र वापरत असतो. माझ्या अभ्यासातील दोन तंत्रे आज मी तुम्हाला सांगणार आहे.

१) आयपीओतल्या नवीन समभागाची नोंदणी झाल्यानंतर काही दिवसांनी त्या समभागाचे भाव स्थिरावतात. त्यानंतरच्या मंदीच्या काळात हे समभाग आणखी स्वस्तात मिळतात. हीच योग्य वेळ असते हे समभाग खरेदी करण्याची. या तंत्रानुसार काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड या कंपनीचे समभाग सध्या स्थिरावलेल्या भावात उपलब्ध आहेत. साधारण ५७ ते ५८ रुपयांच्या सरासरीत खरेदी करून गुंतवणुकीचा कालावधी अठरा महिन्यांचा ठेवल्यास ४० ते ५० टक्के नफ्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. (आयपीओ ग्रेड ४ किंवा ५ चा असावा)

२) बोनससहित मिळणारे सरकारी कंपन्यांचे शेअर खरेदी करणे हा दुसरा सोपा मार्ग आहे. बोनस म्हणजे हा समभाग खरेदी केल्यावर वाढीव शेअर मोफत मिळतात. (त्याचे प्रमाण आधीच जाहीर झालेले असते. ) गेल्या काही आठवड्यांत ओएनजीसी या सरकारी कंपनीचे शेअर बर्‍याच म्युच्युअल फंडनी विकण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हा समभाग बोनससहित स्वस्तात मिळतो आहे. समजा दहा समभाग खरेदी केले तर दहा समभाग मोफत मिळणार आहेत. अर्थात तारीख गेल्यानंतर या समभागाची किंमत कमी होईल.

जे गुंतवणूकदार दोन वर्षे थांबण्याच्या मन:स्थितीत असतील त्यांनी हा समभाग खरेदी करून भरघोस नफा कमवावा अशी माझी सूचना आहे. ही दोन्ही खरेदीची तंत्रे झाली, पण अमुक एक कंपनीची निवड का करावी याचा अभ्यास वेगळा असतो. त्या अभ्यासाची सुरुवात पुढच्या भागात करूया.

लक्षात घ्या. समभाग खरेदी -विक्रीचे तंत्र हा अनुशासनाचा किंवा शिस्तीचा भाग आहे. या तंत्रांची अंमलबजावणी शिस्तीत करणार्‍याला बक्षीस म्हणून (फायद्याचा) मौका हमेशा मिलता है.

shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना

No comments: