Tuesday, August 09, 2011

दिलवाले आणि दिमागवाले - ४

दिमागवाल्यांना भावनेपेक्षा भाव महत्त्वाचा वाटतो. गल्ल्यात खणखणीत नाण्यांची भरती होताना (एखाद्या समभागाचा भाव वाढवताना) ते दिलवाल्यांच्या टोळीत सामील होतात आणि गल्ला भरला की गंगाराम झोळीत भरून या रंगमंचावरून पोबारा करतात.

सेकंडरी मार्केट म्हणजे खरा शेअर बाजार. क्षणाक्षणाला हलणारे भाव -एका क्षणी साकार होणारी स्वप्ने आणि तर दुसर्‍या क्षणात हवेत विरून जाणार्‍या आकांक्षा - एका क्षणात आकाशात तर दुसर्‍या क्षणी जमिनीवर तर पुढच्या क्षणाला पायाखालची जमीन खचण्याचा भास. हे सगळे रोज. सकाळी सवानऊ ते साडेतीन. रोज हजारो कंपन्यांच्या लाखो शेअर्सची अब्जावधी रुपयांची उलाढाल. ११ जानेवारीला बाजार चारशे अंकांनी ढासळला तर १२ जानेवारीला बाजार साडेतीनशे अंकांनी वर १३ जानेवारीला तिनशे अंक ढासळून १४ तारखेस शंभर अंकांची घसरण....

चला तर, चला जाऊ या, या थर्रार नाटकाच्या रंगमचावर. एक सूचना : इथे आहेत दोन रंगमच. सरकणारे -फिरणारे आणि सवय होईस्तो घेरी आणणारे. एक बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज.

आपण मनास येईल तेथे जाऊ शकतो. या नाटकाचे लेखक आपणच. तुम्ही सोडून एकच पात्र आहे या मंचावर : तुमचा ब्रोकर. बाकी नायक -नायिका -खलनायक आणि प्रेक्षक सगळे काही तुम्हीच. टाळ्या तुम्हीच वाजवायच्या आणि डोळे भरून आले तरी तुम्हीच पुसायचे. या दोन रंगमचावर एकाच वेळी लाखो नायक असतात तरी प्रत्येकाचे नाटक वेगळे आणि स्वत:पुरतेच.
काय? कसे वाटले शेअर बाजाराचे नाट्यीकरण. आवडले?

तर मग चला या आणि करा कामाला सुरुवात. नाटकात भाग घायचा म्हणजे भूमिका करायला हवी. या रंगमचावर दोन भूमिका आहेत. एक दिलवाल्याची आणि दुसरी दिमागवाल्याची. यापैकी आपली भूमिका कोणती हे ठरवण्यासाठी दोन्ही भूमिका आधीच सांगतो. दिलवाल्यांचा गुंतवणुकीचा खेळ भावनांवर आधारित असतो. त्यांना ज्या दिवशी बाजार हिरवा दिसतो त्या दिवशी ते खरेदी आणि ज्या दिवशी काळा दिसतो त्या दिवशी विक्री ..मग हे रंग दिसतात तरी कसे? सकाळी जाग आल्यापासून दिनक्रम सुरू असेपर्यंत खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात जे काही घडत असेल त्याचे प्रतिबिंब दिलवाल्यांच्या खेळावर पडते. शंभरापैकी पंचाण्णव माणसे दिलवाली असतात. ज्या दिवशी मंदी दिसते त्या दिवशी विक्री तर ज्या दिवशी तेजी दिसते त्या दिवशी खरेदी. गंगा गये गंगादास -जमना गये जमनादास. (एखाद्या समभागाचा भाव वाढवणारे हेच आणि एखाद्या समभागाचे भाव घटवणारे पण हेच.) परिणामी दिलवाल्यांचा गल्ला जसा क्षणात गच्च भरतो तसा दुसर्‍या क्षणी रिकामा पण होतो. दिलवाले कमावतात ज्या पध्दतीने त्याच पध्दतीने गमावतात पण. आता दुसरी जमात दिमागवाल्यांची. यांना भावनेपेक्षा भाव महत्त्वाचा वाटतो.गल्ल्यात खणखणीत नाण्यांची भरती होताना (एखाद्या समभागाचा भाव वाढवताना) ते दिलवाल्यांच्या टोळीत सामील होतात आणि गल्ला भरला की गंगाराम झोळीत भरून या रंगमंचावरून पोबारा करतात. (आपले उद्दिष्ट नजरेस आले की दुप्पट जोमाने विक्री करून टोळीच्या बाहेर पडतात.) सराईत बहुरूप्याला लाजवील असे बहुरूपी. आता ठरवा या रंगमचावर तुम्ही कोण आहात? दिलवाले की दिमागवाले?
 
मुंबई शेअर बाजाराचा पारा किती वर-खाली आहे हे दर्शवणारा अंक. निवडक तीस शेअरचा त्या दिवशीचा जो भाव असेल त्याआधारे हा अंक ठरतो. आज बाजारात तेजी आहे असे जेव्हा म्हणतात तेव्हा हा अंक कालच्या अंकापेक्षा जास्त असतो.
 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा पारा वरखाली दाखवणारा अंक. हा अंक त्या बाजारातल्या निवडक पन्नास शेअरच्या त्या दिवशीच्या भावावर ठरवला जातो. या अंकाचा उपयोग करून रोज सट्टा करता येतो म्हणून याची लोकप्रियता जास्त आहे. रोजच्या रोज कमाई करण्याची इच्छा असणारांनी हा अंक रोज दर तासांनी बघावा. हे रोजच्या कमाईचे तंत्र आपण फ्युचर आणि ऑप्शनचा अभ्यास करताना करणार आहोतच.
ङ आजचा गृहपाठ :

डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते तयार असेल तर सेन्सेक्स आणि निफ्टीचा अभ्यास करा. पुढच्या शनिवारी शेअर खरेेदी-विक्रीचे निर्णय कसे घ्यायचे? हे पाहू.

ङ मी आणि माझा ब्रोकर

बाजारात खरेदी-विक्री करायची म्हणजे ब्रोकरच्या (दलालाच्या) माध्यमातून जावे लागते. दलालाची सोबत म्हणजे दलालीचा पण प्रश्‍न आलाच. दलाली असते ०.१०ज्ञ् ते ०.५०ज्ञ्. प्रत्येक दलाल आपल्या गिर्‍हाइकाला वेगवेगळ्या प्रकारे दलाली मागू शकतो.

ज्या ग्राहकाची उलाढाल जास्त त्याला दलाली कमी. डे ट्रेडिंग करणार्‍याला दलाली सगळ्यात कमी म्हणजे ०.१० किंवा अपवादात्मक परिस्थितीत ०.०३ज्ञ् सुध्दा. सूज्ञ ग्राहकांनी दलालीच्या दरासाठी खळखळ करू नये. दलालाचे पोट दलालीवर भरते. दलाल सोनारासारखा असतो. सोनाराला दुकानात एका वेळी पाच लाखांचे खरेदी करणार्‍या बायकांपेक्षा दरवर्षी एक लाखाचे दागिने मोडून नवीन दागिने करणार्‍या बायका जास्त आवडतात. कारण स्पष्टच आहे. सोनाराची कमाई सोन्यात नसते. त्याची कमाई घडणावळीत असते. त्याचप्रमाणे शेअर दलाल असतात. त्याची कमाई असते दलालीत. तुमच्या नफ्या-तोट्यात नाही. एकाच वेळी पन्नास लाखांचे शेअर घेऊन पाच वर्षे काही न करणार्‍या ग्राहकापेक्षा रोज दहा- वीस हजारांची उलाढाल करणारा ग्राहक त्याला जास्त प्रिय असतो. त्यामुळे दलालीच्या बाबतीत घासाघीस करू नये. शेवटी दलाल आपल्या वाण्यासारखा बनीया. तुम्ही साखरेच्या पोत्यात हात घालून फक्की मारली तर तो तेलाची धार ऍडजस्ट करतो. दलालाला त्याचे पैसे कमावू द्या. पण एक महत्त्वाची सूचना. दलालाशी संबंध मैत्रीपूर्ण असावेत, पण सलगीचे नसावेत. आपल्या खात्यात लुडबूड करण्याचा अधिकार त्याला देऊ नये. गेल्या काही वर्षांत उलाढाल इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी कस्टमर रिलेशन मॅनेजरची नेमणूक केलेली असते. या प्राण्यापासून तर फारच जपून राहावे. दलालीची उद्दिष्टे पार करण्यासाठी हा दिवसातून दहा वेळा वेगवेगळी बातमी तुमच्यापर्यंत आणत असतो. या सगळ्या बातम्या देण्याचे कारण एकच. ग्राहकाला जास्तीत जास्त खरेदी-विक्री करायला लावून जास्तीत जास्त दलाली कमवायची. त्याच्या कमाईच्या नादात बर्‍याच वेळा ग्राहकाचे भांडवल संपून जाते. अशी बरीच ब्रोकरेज हाऊस आहेत जेथे ग्राहकाच्या ट्रेडिंग खात्याचे आयुष्य सात-आठ महिनेच असते. या दरम्यान ग्राहकाचे भांडवल संपते. तात्पर्य ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. पण दलाल म्हणजे खलनायक नाहीत. आपल्याला सौदा करताना मदत व्हावी म्हणून आता प्रत्येक दलालाकडे रिसर्च डिपार्टमेंट असते. वेळोवेळी विशिष्ट क्षेत्राचा -विशिष्ट कंपनीचा अभ्यासपूर्ण तपशीलवार आढावा घेऊन त्याचा रिसर्च रिपोर्ट ग्राहकांना मोफत पुरवला जातो. या लेखाचा अभ्यास करून गुंतवणूक केल्यास बर्‍याच वेळा नफा होण्याची शक्यता असते.

shreemant2011@gmail.काम
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना

No comments: