Tuesday, August 02, 2011

कॉर्पोरेट मंत्र - हवामान मस्त आहे...

पावसाने कमालच केली आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सोडवलाच आहे. त्यातून तप्त मनांना वेगळ्या वातावरणाच्या गुंगीने चिंब भिजवले आहे. हवामानाचा आपल्यावर खूप परिणाम होतो. पावसाळ्यात सकाळी उठावेच वाटत नाही, काम होत नाही. सारीकडे ‘मळभ’ असेच वाटते. काहींना ताजेतवाने वाटते, खूप छान वाटते. कुणाला पांघरुणात घुसून अंधारात पडणे मानवते तर कुणाला बाहेर पडून भिजायला. खरं तर आपल्याला काय वाटते हे बाहेरच्या हवामानावर ठरत नाही. ते ठरते आपल्या मानसिक हवामानावर. मानसिक हवामान म्हणजे आपला ‘मूड’. ते बिघडले की हिरवागार निसर्गदेखील वणव्यासारखा जाणवतो. मूड चांगला असेल तर वाईट काळही उत्सव वाटू शकतो. हा ‘मूडच’ आपल्या आयुष्यात फार मोठा खेळ खेळत असतो. भले भले मूडच्या आहारी जाऊन जीवनाचे मातेरे करतात. निसर्गातील हवामान आपल्या हातात नसते. ऊन-पावसाला अजून तरी स्वत:चे स्वातंत्र्य आहे. पण आपल्या मानसिक हवामानाला मात्र आपण हवे तसे बदलू शकतो. हवे तेव्हा बदलू शकतो. हे हवामान कोणतीही वेधशाळा सांगू शकणार नाही. पण आपल्या वागण्यात आपल्या मनातील पाऊस-उन्हाचा पत्ता सर्वांना लागतच असतो. मूडमुळे काम चुकवू नका, माणसांना दुखवू नका, विचारांमध्ये हरवू नका, नकारार्थी दिशा धरू नका, वादळ, वारा, ऊन, पाऊस जेवढे निसर्गात अनिवार्य आहे तेवढेच मानसिक पातळीवरही. मनातील हवामानही बदलत राहाते. कधी चांगले तर कधी कटू वाटते. जसे असेल तसे स्वीकारा. त्याचा आनंद घ्या. वादळात अडकण्याची मजा घ्या, माणसांच्या स्वभावांची मजा घ्या. उन्हाची ऊब अंगावर ओढा, काळजी करणार्‍यांची ऊब जाणवेल, त्रास जाणवणार नाही. पावसात भिजा, तुफान प्रसंगांचे थेंब झेला, नाचा त्या पावसात. तुमच्या मनाचे हवामान तुम्हीच ठरवणार. ते तुम्हीच ठरवा. पण नियमित पणे स्वत:ला सांगत राहा-


‘आज हवामान मस्त आहे!’

- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना ०१०८२०११.

No comments: