हे एवढे मोठे अवाढव्य जग चालते तरी कसे? काय खरं आणि काय खोटं? काय चांगले आणि काय वाईट? हे जग हवापाण्यावर तर चालतेच, पण त्याहून जास्त ते चालते आपल्या मानण्यावर. दगडाचा देव बनवणारे आपण तसेच देवाचा दगडही आपणच करतो. तासन्तास पूजा-अर्चना करून पाणावलेल्या डोळ्यांनी नवस मागतो आणि मग छिन्नी-हातोड्याने त्या नवसाच्या धन्याला मोडून काढतो. जगात तसे पाहिले तर बरेच काही आपणच ठरवतो आणि नशिबावर ओझे लादत राहतो. एका गावातला पुजारी देवळातली पूजा आटोपून घरच्या दिशेने निघाला, घाईत हाताला लागलेला शेंदूर पुसायचा राहून गेला. वाटेत एका दगडाला त्याने हात पुसले आणि पुढे निघून गेला. त्याच वाटेवरून प्रवास करणार्या काहींनी तो दगड पाहिला. शेंदूर लागलेल्या त्या दगडात त्यांना स्वयंभू देवाचे तेज वाटले. त्यांनी त्या दगडाला नमस्कार केला, फुले वाहिली. येणार्या-जाणार्या सर्वांनी तेच केले आणि हात पुसलेल्या दगडाचा देव झाला. देव सगळीकडेच असतो. त्या दगडातही असणारच. असे अनेक हात पुसलेले दगड आयुष्यात आढळतात. त्यांना नमस्कार करणे काही वाईट नाही. ऑफिस, घर... सारीकडे हे असेच होते. मनाचा खेळ संपतच नाही. आपण ‘टाईम प्लीज’ म्हणून काही काळ थांबतही नाही. हे असेच, तो तसाच... हा हट्ट आपणच आपल्याशी करीत राहतो. नकारार्थी विचार, गैरसमज व त्रागा यात सत्य कुठेतरी राहूनच जाते. आपण विसरतो की, प्रसंगाहून महत्त्वाची ‘माणसं’ असतात. आपण ठरवले तर आनंद, आपण ठरवले तर दु:ख. आपण ठरवले तर जग आपले आणि आपण ठरवले तर आपणही जगाचे नाही. सगळीच माणसं चांगली नसतात. म्हणून प्रत्येकाची परीक्षा घेऊ नका. सगळेच दगड देव नसतील म्हणून सगळ्या दगडांना लाथ मारून पाहू नका. त्यापेक्षा सर्व दगडांना नमस्कार केलेला परवडला. चांगले माना, आनंद माना, सुख माना, प्रेम माना, आपलेपणा माना, शांतता माना, सत्य माना. कारण मानण्यावरच सारे काही निर्भर आहे. तुम्ही मानाल तसे तुमचे आयुष्य. मानले तर जग, नाही तर बंदिशाळा, मानले तर प्रवास, नाहीतर फरफट आणि मानला तर देव, नाहीतर फक्त दगड!
dr.swapnapatker@gmail.com
dr.swapnapatker@gmail.com
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना १३०८२०११.
No comments:
Post a Comment