Sunday, June 15, 2014

मूषक मंदिर

हिंदुस्थान हा मंदिरांचा देश आहे. वैविध्यपूर्ण वास्तुरचना हे या मंदिराचे वैशिष्ट्य. असेच एक अद्भुत आणि अनोखे मूषक मंदिर राजस्थानातील बिकानेर येथे आहे. करणी माता असेही या मंदिराला संबोधले जाते.
- देशातील प्रमुख महत्त्वाच्या मंदिरांत या मंदिराचा समावेश आहे.
- राजा गंगा सिंह यांनी २० व्या शतकात हे मंदिर उभारले.
- या मंदिरात पावलोपावली उंदीरच उंदीर फिरत असतात.
- या उंदरांची फौज पार केल्यावरच मुख्य देवीच्या मूर्तीचे दर्शन होते.
- शेकडो उंदरांच्या या टोळक्यात जर एखाद्या भाविकास सफेत उंदीर दिसला तर तो धनवान होतो. त्यामागची इडापिडा संपते असे म्हटले जाते.

सौजन्य :- फुलोरा, सामना १५०६१४

सर्दी - आयुर्वेद आरोग्य

ऍलर्जिक सायनायटीस नावाचं भूत समाजात जिकडेतिकडे पाहायला मिळतं. काही खाल्लं, कोणता वास घेतला, कुणाला स्पर्श केला, अहो एवढंच काय घरात साफसफाई केली की सुरू होते सर्दी. याला साधीसुधी नाही ऍलर्जीची सर्दी म्हणतात. खालावलेल्या रोगप्रतिकार शक्तीचं जिवंत उदाहरण म्हणावं लागेल.
पटेल नावाचे सद्गृहस्थ वसईला राहणारे. शहरी लाइफस्टाइल दिसायला मोहमाया असते. अडकलात तर फसलातच म्हणून समजा. असेच काही पटेल यांच्या बाबतीत झाले. काही विचित्र खाण्यामध्ये आले, कोणी आजूबाजूला साफसफाई केली, कामावर कोणाला सर्दी झाली की यांना सर्दी झाली म्हणून समजा. शिंका आणि नाकातून पाणी यायला काही प्रमाणच नाही. यांना शोधन व बृहन नस्य लगेच सुरू केले. सोबत रक्तशुद्ध करणारी औषधे व आहार योजना सांगितली. दीड महिन्यात त्रास कमी झाला. त्यानंतर विरेचन (जुलाब) देऊन शरीरशुद्धी केली आणि दरवर्षी शरीरशुद्धी करण्याचा सल्ला दिला.
तोंडाने श्‍वास घेणारे आणि रात्री तोंड उघडे करून झोपणारे बहुतेक लोक पाहायला मिळतात. काय करणार बिचारे? सर्दीने नाक ब्लॉक असल्याने तोंडाने श्‍वास घेणं भाग असतं. असेच देसाई. दिवसभरात त्यांचे नाक कधी ब्लॉक होईल याचा काही नेम नाही. नाडी तपासताना त्यांना यकृतासंबंधी आणि हृदयासंंबंधी बिघाड जाणवला. त्याप्रमाणे त्यांना कफ-वात दोषावर कार्य करणारी औषध दिली. सोबत गोमूत्रसिद्ध चित्रकादी तेलाने नस्याचा सात दिवसांचा कोर्स केला. गोमूत्राच्या तीव्रतेने व वासाने ब्लॉक तर सुटलाच आणि त्याने डोके हलके वाटायला लागले. पूर्वीपेक्षा ७० टक्के फरक जाणवायला लागला.
सर्दी नावाचं भूत घालवण्याचे तंत्र
- रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी रोज मोकळ्या हवेत प्राणायाम, सूर्यनमस्कार यासारखे सर्वांगिण व्यायाम करा.
- बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळा.
- (सुंठ हळकुंड आंबेहळद पुनर्नवा वचा शृंगी) उगाळून कपाळ, नाक, गालावर पातळ लेप करावा. एक चमचा हळद, अर्धा चमचा आलं, दोन कप पाणी उकळताच चार-पाच तुळसीची पाने उकळवून एक कप शिल्लक उरलेलेे गाळून दोन चमचे मध टाकून घेणे.
- आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुसार शरीरशुद्धी करा. रोगप्रतिकार शक्ती आपोआप वाढेल.


- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य :- फुलोरा, सामना १५०६१४

सायबर स्टॅकिंग सावधान!

    

सुरुवातीला लॉटरी लागली आहे, परदेशातील कंपनीत निवड झाली आहे किंवा परदेशातील एखादी ‘ललना’ मला हिंदुस्थानात यायचंय म्हणून प्रेमाची गळ घालत ईमेल पाठवायची. अशा आमिष दाखवणार्‍या ईमेलमधून जोरदार फसवणूक होत होती. त्याबाबत मग सोशल साईटवर सावधपणा बाळगला जायला लागला. लोक हुशार झाले फसवणूक करता येईना. ‘सायबर क्राइम’वाल्यांनीही याविरोधात कायदेशीर आणि तांत्रिक पाऊल उचलले. त्यामुळे सायबर चाच्यांचा बंदोबस्त तेवढ्यापुरता झाला, परंतु कायदे मोडणार्‍यांना अधिक वाटा माहीत असतात ना... या सायबर चाच्यांनी नवी पद्धती विकसित केली आहे... त्यालाच ‘सायबर स्टॅकिंग’ म्हणतात.
या सायबर स्टॅकिंग पद्धतीत समोरच्याला घाबरवून टाकणारी मेल पाठविले जातात. घाबरलेले एखादे सावज जाळ्यात आले की, त्याला भोवर्‍यात फसवले जाते. घाबरविण्यासाठी कोर्ट, मंत्रालय, पोलीस, इतर सरकारी खात्यांच्या नावाचा वापर केला जातो. त्यामुळे भल्याभल्यांची गाळण उडते आणि सायबरचाच्यांचे फावते. कोर्टातून अचानक ईमेलवर नोटीस आली, ‘तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उद्या दुपारी हजर रहा. उद्या वॉरंट काढून पोलिसांकडून उचलून आणण्यात येईल.’ तर कोणता भला माणूस घाबरणार नाही. तशीच पोलिसांची नोटीस, इन्कमटॅक्सची नोटीस... त्यामुळे आता या ‘स्टॅकिंग’पासून सावधान.
एवढेच नव्हे तर ‘मिस कॉल’ नावाची पद्धतीही गाजते आहे. एखाद्या अनोळखी नंबरवरून बर्‍याच वेळा हे नंबर पाकिस्तान, अफगाणिस्तान, दुबईकडचे असतात. ‘मिस कॉल’ आला की, कुणाचा होता हे बघण्याची खोड प्रत्येकालाच असते. आपण रिटर्न कॉल केला की झालंच, तिथून कुणी मधाळ आवाजात बोलू लागते आणि बिलाचा आकडा वाढत जातो. जेव्हा बिल पुढ्यात येतं तेव्हा आपल्या हाती ते भरणे एवढेच उरलेले असते. ‘व्हॉटस् अप’चा वापरही आता महिलांना फसविण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे विज्ञानाची कास धर हे ठीक आहे, पण त्याच्या आहारी जाणे तरुणाईला परवडणारे नाही. हे कुठेतरी कळायला हवे एवढे खरे... किंबहुना तरुणाई मोबाईल, मेल आणि व्हॉट्स अपच्या आहारी गेल्यामुळेच या सायबर चाच्यांचे फावले आहे.
अतिशय वेगवान आणि सहजपणे कोणतीही गोष्ट आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो त्यामुळे गेल्या काही वर्षात इंटरनेटचा वापर खूप मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यात आता इंटरनेट मोबाईलवर देखील सहजपणे वापरता येते आणि मोबाईलवर असणार्‍या असंख्य सोफ्टवेअरमुळे आपली कामे चुटकीसरशी होतात. इंटरनेटच्या या चांगल्या बाजूबरोबर एक काळी बाजू देखील आहे आणि तिचे नाव म्हणजे सायबरक्राईम; इंटरनेटवरून लोकांच्या आर्थिक फसवणुकीचे शेकडो गुन्हे गेल्या काही वर्षात सर्रास घडताना आपण बघितले आहेत. यात तुमचे नेटबँकिंग अकाऊंट हॅक होणे किंवा कोणीतरी तुमचे क्रेडिट कार्ड वापरणे असे अनेक गुन्हे गेल्या काही वर्षात घडले आहेत. या सर्व गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी अनेक बँकांनी अनेक उपाययोजना देखील केल्या आहेत त्यामुळे आता सराईत सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा नवीन प्रकारे लोकांना फसवण्यात आणि नवीन प्रकारचे गुन्हे करण्याकडे वळवला आहे. हे नवीन प्रकारचे सायबर गुन्हे हे आधी घडणाया सायबर गुन्ह्यापेक्षा अतिशय भयंकर आहेत.
अर्जंट अटेन्शन... ईमेल बघून कुणीही दचकणारच ना... परेशचं तसंच झालं. त्याने तो लगेच ओपन केला. वाचतानाच त्याची बोबडी वळली. तो पोलिसांचा होता. आम्हाला एक बॉडी सापडली आहे. त्याच्या खिशात तुमचा नंबर आणि फोटो आहे. तातडीने खालील पत्त्यावर संपर्क साधा. बिच्चारा परेश... हादरला. पुढचामागचा विचार न करता त्याने संपर्क केला आणि...
तुमच्या खात्यात अमेरिकन माफियाने पाठविलेला हवाला चेक वटविण्यात आला आहे... त्याबाबत त्वरित खुलासा करा. ‘अर्जंट अटेन्शन’ या विषयाखालीच एका बड्या उद्योगपतीला आलेला हा ईमेल. इन्कम टॅक्स खात्याची नोटीसच ती. तत्काळ संपर्क करण्याचे आदेश. त्यामुळे सीएला काही विचारण्यापूर्वीच त्याने त्या इन्कम टॅक्स अधिकार्‍याला संपर्क केला आणि...
‘‘तुझा अश्‍लील फोटो आम्हाला मिळाला आहे. हा क्राइम असून तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये.’’ अर्जंट अटेन्शन म्हणून दीपाली नावाच्या तरुणीला आलेला ईमेल. आता लग्न झालेली, दोन वर्षांचं मूल असणारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात चांगली नोकरी करणारी तरुणी, पण सायबर क्राइमकडून आलेली नोटीस पाहून थरकलीच. तिनेही संपर्क साधला आणि...
आणि... काय? ...आणि तिघेही फसले. असे फसले की, काहीही न करतासवरता पार धुऊन गेले. ज्यांनी संपर्क केला ते कोण तेही कळले नाही आणि कुठल्या खात्यात रकमा जमा केल्या, ते पैसे कुणी घेतले तेही कळले नाही. सर्व काही संपल्यानंतर जाणीव झाली की, आपण फसलो गेलोय... हा ‘सायबर क्राइम’च आहे, पण त्यामध्ये आता नवीन प्रकार आला आहे. त्याचे नाव आहे ‘सायबर स्टॅकिंग.’
सायबर स्टॅकिंगच्या क्राईमला बळी न पडण्यासाठी
- जंक मध्ये असणारे इमेल सहसा उघडू नका.
- कोणताही इमेल जर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने पाठवला असेल तरच उघडा
- कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेला ‘मिस कॉल’ वर परत ‘कॉल’ करू नका
- कोणत्याही जंक इमेलमध्ये असणारी फाईल उघडू नका.
- व्हाटस्ा्अपवरून अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मेसेजला उत्तर देऊ नका.
- तुमचा घराचा पत्ता, इमेल, मोबाईल क्रमांक, कोणत्याही संकेतस्थळावर अपलोड करू नका.
- जर तुम्हाला इमेल किंवा मोबाईलवर अश्‍लील मेसेजेस कोणी पाठवत असेल तर असे क्रमांक किंवा इमेल ऍड्रेस आपल्या फोनबुक तसेच जंक इमेल मधून ब्लॉक करून टाका.
- तुम्ही अशा प्रकारचे इमेल तसेच मोबाईल क्रमांक व्हाटस्अप, तसेच इतर जीमेलला रिपोर्टदेखील करू शकता. त्यामुळे तुमच्याप्रमाणे जर इतरांना या इमेल किंवा मोबाईल क्रमाकावरून त्रास दिला जात असेल तर संबंधित कंपनी त्या इमेल आणि मोबाईल क्रमांकावरून इतरांना पाठवले गेलेले मेसेज बंद करू शकते.

अमित घोडेकर
सौजन्य :- फुलोरा, सामना १५०६१४