Sunday, July 24, 2011

कॉर्पोरेट मंत्र - ‘‘ब्लँक’’

काहीच कसे होत नाही? काहीच कसे सुचत नाही? काहीच का नाही मिळत किंवा देता येत? काहीच नाही? असे का? हा आपल्यासाठी काही नवीन प्रश्‍न नाही. आयुष्याच्या गदारोळीत गधामजुरी करून-करून माणसाला तणावाचे शिखर गाठायची वेळ आली की तो होतो ‘ब्लँक’ अगदी कोरा. पुढे मागे काहीच नसल्यासारखा, शून्यपूर्ण, तल्लीन वाटणार्‍या गृहस्थाला विचारले, ‘‘अरे काय विचार करीत आहेस?’’ तेव्हा तो म्हणतो ‘काहीच’ नाही. या काहीच नाहीचा अर्थ खरं तर ‘खूप काही’ असा असतो आणि ते एवढे जास्त असल्यामुळे काहीच कळत नसते. आपण आपल्या जगण्याला ‘सिनेमा’सारखे जगण्याचा प्रयत्न करतो. पहिला भाग म्हणजे जन्म, दुसरा भाग म्हणजे मृत्यू. खर्‍या जगण्याला मात्र मध्यांतर समजून आपण धावपळीत काढतो. पिक्चरच्या मध्यांतरात कुणी कुणी थंड, समोसा, चहा आणायच्या गडबडीत असतो तर कुणी शौचालयाच्या लाईनीत उभे राहून दर २ मिनिटाला घड्याळाकडे पाहत असतो. प्रत्येकाला घाई असते दुसरा भाग सुरू होण्यापूर्वी जागेवर बसण्याची. तसेच मरण येण्याआधी खूप काही करायचे असते म्हणून जीव आटवून आपण पार सुकून जातो. आपल्याला असलेल्या शांततेची गरज जेव्हा आपल्याला जाणवत नाही तेव्हा नैसर्गिकरीत्या ती शांतता आपल्या जीवनात येते. त्यालाच ‘‘ब्लँक’’ होणे असे म्हणतात. ब्लँक होणे वाईट नसून फायद्याचे आहे. कधी कधी याच अवस्थेत अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळून जातात. बरीच कोडी सुटतात. मन कोर्‍या पाटीसारखे होते. त्यावर नव्याने आपण हवे ते लिहू शकतो. पुढल्यावेळी ‘‘ब्लँक’’ झालात तर घाबरू नका. त्या अवस्थेचाही आनंद घ्या. मनाला थोडे आराम करू द्या.


एखादा ‘ब्लँक कॉल’ घरच्या फोनवर आला की, आपण जसे ‘हॅलो हॅलो’ ओरडत असतो. तसे या बाबतीत होऊ देऊ नका. शांत व्हा व शांततेचा उपभोग घ्या. कधीतरी होऊन पाहा ‘ब्लँक’.
- dr.swapnapatker@gmail.com
सौजन्य :- थर्ड जनरेशन, सामना २३०७२०११.

Saturday, July 23, 2011

पीच

पीच या फळावर सोनेरी पिवळ्या रंगाची साल, सालीवर मऊ लव असते यातील गर पांढरा, पिवळा व थोडीशी लालसर छटायुक्त असतो हे फळ बहुगुणी आहे

- पीच मलावरोध दूर करते


- मूतखडा झाला असता एक कप पीचच्या रसात एक चमचा धणेपूड घालून जेवणापूर्वी घ्यावा असे पंधरा दिवस करावे मात्र त्या दिवसात खारट व आंबट पदार्थ शक्यतो टाळावेत खूप फायदा होतो

- अर्धा कप पीचचा रस घ्यावा त्यावर साधारण अर्ध्या पाऊण तासाने एरंडेल प्यावे पोटातील मोठे जंत शौचावाटे पडतात

- रोज एका पीचचे सेवन केले असता हातापायाच्या तळव्यांना घाम येणे बंद होते

- पीचच्या रसामध्ये खडीसाखर घालून प्यायल्याने थांबून थांबून लघवीला होणे, जळजळणे यावर फायदा होतो

- लहान मुलांना अंथरुण ओले करण्याची सवय असते अशा वेळेला चमचाभर वावडिंगाची पूड पाण्याबरोबर द्यावी व त्यावर एक पीच खाण्यास द्यावे

- सर्दी विकार असलेल्यांनी, मधुमेही व्यक्तींनी पीचचे सेवन टाळावे

सौजन्य :- चिरायू, सामना.

आजकालचा चातुर्मास

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते. साधारपणे आषाढी एकादशीपासून विविध नियम करून ते चार महिने पाळण्यावर पूर्वापार भर दिला जातो. आजच्या काळातही हे नियम लागू पडतात. काही नियमांमध्ये थोडेफार बदल करून आजही चार्तुर्मास पाळणं गरजेचं आहे. अगदीच घराबाहेर पडायचे नाही, हा नियम पाळता आला नाही तरी जेवणाबाबतचे नियम पाळायला काहीच हरकत नाही.


पूर्वी चातुर्मासात कांदा आणि लसूण खायचा नाही हा घरोघरी पाळला जाणारा नियमच होता. याचे कारण असे असावे की, कांदा हा थंडावा देणारा आहे. पावसाळ्याच्या थंड वातावरणात कांदा खाण्याने पोटात थंडी होते, पोटात गुरगुरते आणि एकंदरच स्वास्थ्य बिघडायला मदत होते. पण आता एकंदर ऋतुचक्र बदलतेय आणि पृथ्वीवरील उष्ण तापमानात अधिक वाढच होत आहे. त्यामुळे हा कांदा न खाण्याचा नियम पाळण्याची विशेष गरज भासत नाही.

आषाढी एकादशीनंतर १५-२० दिवसांत श्रावणही चालू होतो. श्रावण महिन्यात अनेक उपवास असतात. या उपवास करण्यामागेही असाच आरोग्याशी निगडित उद्देशच होता. या काळात शेतावरची कामे कमी झालेली असतात. घरातल्या घरातच जास्त वेळ जातो. घरातल्या घरात बसून राहण्याने चार वेळा खाल्लेले पचत नाही. पोटात गॅसेस धरतात. अपचनासारखे विकार होतात. त्यामुळे कमी खाल्ले जावे म्हणून उपवास केला जात असे. या महिन्यात हवेतला दमटपणा आणि कुंद वातावरण यामुळे पचनशक्ती थोडी कमी झालेली असते. अशावेळी बटर, चीजसारखे पचनाला जड पदार्थ खाऊन पचनशक्तीवर ताण देऊ नये. या अशा वातावरणात जिकडेतिकडे पाणी साठलेले असते. त्यामुळे हवेतही रोगजंतू पसरलेले असतात. यातूनही पोटाच्या विकाराचा जंतूसंसर्ग होतो. या हवामानात पोटाचे विकार जास्त उद्भवतात म्हणून खरे तर कच्च्या भाज्याही कमी प्रमाणातच खाव्यात.

शिजलेल्या पदार्थांपेक्षा कच्चे पदार्थ पचनास जड असतात. म्हणूनच पावसाळ्यात कच्चे खाणे टाळावे म्हणजे चातुर्मासात उपवास करताना डाएट कॉन्शस होऊन नुसती सलाडस् खाणे टाळलेलेच बरे नाही का! चातुर्मासात मांसाहार नाही असे आजकाल खूप कमीजण करतात, पण श्रावणात महिनाभर मांसाहार नाही हे खूपजण पाळतात. एक तर आषाढानंतरचा काळ माशांच्या पुनरुत्पादनाचा कालावधी असतो. त्यामुळे या काळात मासे पकडलेही जात नाहीत. शिवाय समुद्रही खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारी केली जात नाही. मांसाहार पदार्थही पचनास थोडे जडच असतात. म्हणूनच चातुर्मास आजही पाळायला आरोग्याच्या दृष्टीने इष्टच म्हटले पाहिजे.

- पचनाला जड असणारे पदार्थ टाळावे. जसे चीज, बटर, कच्चे पदार्थ.

- उपवास करणे जमत नसेल तर पचनास हलके पदार्थ खावे. उदा. मूगडाळ, तांदूळ, फळभाज्या. उदा. पडवळ, दुधी इत्यादी.

- स्नॅक्सच्या पदार्थांमध्ये भात-ज्वारीच्या लाह्यांचा वापर करता येईल.

- मांसाहार वारंवार करू नये. ठरावीक दिवशी फक्त म्हणजे आठवड्यात एखादवेळीच मांसाहार करावा.

- चीज, बटर, पास्ता, मॅगी हे वारंवार न खाता १५ दिवसांत एखादवेळी खायला हरकत नाही.

- बहुतेकजण मॉर्निंग वॉकला जात असतात, पण पावसाने त्यांच्या फिरण्यात अडथळा येतो. अशा वेळी देवाला प्रदक्षिणा घालायला हरकत नाही.

- या हवामानात पचनशक्तीवर ताण येऊ नये म्हणून थोडे थोडे अन्न चार पाच वेळा विभागून खा. यामध्ये सूप, मोड आलेल्या धान्याचे चाट, वरणभात, पोळीभाजी, फळे इत्यादी.

- न्याहरीचे पदार्थही पूर्ण शिजलेले, जसे पोहे, शिरा, उपमा, इडली, डोेसे भाजलेला ब्रेड, पराठे (कमी तेल).

- घरगुती बनवलेेले स्वच्छ पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

- उघड्यावरचे पदार्थ पूर्ण टाळावेत.

- चातुर्मासात एकभुक्त म्हणजेच एकदा जेवण्याचा नेम करतात तो जरूर करा. या नेमात दिवसात एकदाच पोटभर जेवा. जेवताना समतोल आहार मिळेल इकडे लक्ष द्या. (भात-वरण, लिंबू, भाजी, चपाती/भाकरी, कोशिंबीर, चटणी, लोणचे इत्यादी).

- पण पूर्ण दिवस उपाशी राहू नका. दिवसभरात सरबत, दूध, सूप, फळ किंवा हलका स्नॅक्स घ्या.

दमट वातावरण, कोंदटपणा, हवेतील रोगजंतू या सर्वांशी मुकाबला करून आरोग्य आणि स्वास्थ्य चातुर्मासाच्या नेमातून मिळवून पुण्य जोडा आणि परंपरा नव्या प्रकारे जोपासण्याचे समाधानही मिळवा.

- स्मृती गोखले
सौजन्य :- चिरायू, सामना

Thursday, July 21, 2011

कशी असेल ती आता ?

कशी असेल ती अता ?


असेल का ती ठीक ??

अता तिला जून सर्व आठवत असेल का??

आठवल्या क्षणामध्ये परत ती जाऊ पाहेल का??

गेलीच तरी तर ,त्या क्षणात मला पाहिलं का??

पाहिलं जरी मला तर , एकदा तरी मला परत बोलवेल का??

बोलावले तरी माझ्यासंगे प्रेमाचे २ शब्द म्हणेल का??

माझ्यासाठी तीच मन परत,माझ्या मनाशी हितगुज साधेल का??

साधल तरी मनातले प्रश्न,सुख दुख माझ्यासमोर मांडेल का??

मांडले तरी ,मी दिलेल्या त्या उत्तरांचा ती विचार करेल का???

माझ्यासाठी परत ,सर्वांसाठी ती झगडेल का???

दिलेल्या आठवणीत परत मागण्याचा देवा कडे हट्ट करेल का??

प्रत्येक क्षणी नाही पण दिवसातून एकदा तरी आठवण काढेल का???

काढलेल्या त्या वेळात फक्त मलाच ती पाहेल का??

मी नाही होऊ शकलो तिचा ,तरी ती आनंदात राहील ना???

माझ्यापेक्षा हि जास्त प्रेम देणारा तिला मिळेल ना???

त्याच्या सहवासात राहून सर्व दिलेले क्षण विसरून ती आनंदी राहेल ना

मी दिलेले सर्व क्षण ,आठवणींची जळमट मनाच्या गाभार्यातून काढून टाकेल ना???

आयुष्याच्या तिच्या सुंदर वळणावर एकदा तरी माझी आठवण तिला येईल ना??

आली तरी माझ्यासाठी ,तिचे डोळे पाणावतील ना ??



माझ्या मनात असा मग प्रश्नाचा साठा साचला

एका तरी उत्तरासाठी तो वाट पहाट बसला :-/



सौजन्य:- चेतन र राजगुरु

Tuesday, July 19, 2011

निसर्गाचे आव्हान


महाराष्ट्राला एक अशी दिव्य भूमी लाभलेली आहे, जी परशुरामांच्या परशु मुळे निर्माण झाली आहे. परशुरामांनी (श्री विष्णू अवतार) आपल्या  परशु ने समुद्राला मागे ढकलून एका निसर्ग रम्य भूमीची निर्मिती केली जिचे नाव आहे 'कोंकण'.

पुराणा नुसार भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी हि कोंकण भूमी म्हणून ओळखली जाते. आणि हो, मुंबई पण कोकणचाच भाग आहे. तर असे हे कोकण डोंगर दर्यांमध्ये वसलेले.


मी लहान असताना आम्ही एक दोनदा कोकणात गेलो होतो. अर्थात ते वय अजाण होत. त्यानंतर १९९४ पासून आम्ही सतत पाच वर्षे कोकणात (गावी) जात होतो. तोपर्यंत कोकणात जाण्यासाठी फक्त एस. टी. चीच सोय होती, व त्या सर्व रात्री सुटत असत. पण त्या प्रवासाची मजा काही औरच असायची. मी गावी जाताना रात्रभर जागा राहून घाट रस्त्यावरील वाहनांची जुगलबंदी बघत बसायचो.
त्यानंतर अशक्य वाटणाऱ्या अश्या डोंगर दर्यातून कोंकण रेल्वेचा मार्ग बनविण्याची संकल्पना प्रशासनाने पुढे आणली होती. ते काम तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आले. मग फक्त रोह्या पर्यंत असणारी मध्य रेल्वे प्रथम रत्नागिरी, नंतर मडगाव व अखेर मंगलोर पर्यंत धावू लागली. अर्थात, तो पर्यंत कोंकण रेल्वे ने बांधलेल्या बोगद्यांचा व पुलांचा बराच गाजावाजा झाला होता. ते बोगदे व पूल बांधताना बरेच मजूर पण गतप्राण झाले होते.
कोंकण रेल्वे सुरु झाल्यावर बरेचसे लोक जे पूर्वी कोंकणात जाण्यास टाळत असत ते हि निसर्ग  दर्शन घेण्यासाठी कोंकणात जाऊ लागले. एक मात्र आहे रेल्वे जिथे जाईल तिथे प्रगती बरोबर प्रदूषण हि जाते.

कोंकणातील डोंगर जे पूर्वी स्वातंत्र्य अनुभवत होते त्यांचा पोटातून आता धूर ओकत रेल्वे धाऊ लागली. कोकणातील जमिनींना अचानक मागणी वाढू लागली. कोकणातील जनता (तो पर्यंत सर्व मराठीच होते), जी आपसा आपसातल्या दुही मुळे कोकणात होणार्या प्रगतीचा फायदा उचलू शकली नाहीत, तिथे आता परप्रांतीय येऊन आपला धंदा करू लागले.

तर कोंकण रेल्वे सुरु झाल्या पासून एक गोष्ट मात्र सातत्याने घडत आहे. दर पावसाळ्यात को. रे.  मार्गावर दरडी कोसळणे व भूस्खलन होत आहे.

दरडी कोसळल्या मुळे झालेला सर्वात प्रथम अपघात झाला होता तो बांद्रा - मडगाव या सुट्टी विशेष गाडीला. खरे तर तो पर्यंत को. रे. पावसाळी वेळापत्रक बनवत नव्हती व सर्व गाड्यांचा वेग जास्तच होता. त्या रात्री हि गाडी कोंकण कन्या गाडीच्या मागे पंधरा मिनिटांनी धावत होती, व ढिली झालेली दरड या गाडीवर कोसळली होती. त्या गाडीची ती सुट्टी विशेष शेवटची फेरी होती. पण अशी दरड कोसळल्या वर सर्वात जास्त धसका घेतला तो पश्चिम रेल्वने, त्यांनी परत अशी गाडी आता सोडली आहे, बऱ्याच वर्षांनी .

तर मुद्दा असा कि, त्या नंतर को. रे. ने पावसाळी वेळापत्रक बनवण्या पासून ते सुरक्षा धागा, चेक इंजिने फिरवणे, संरक्षक भिंत बांधणे असे बरेच उपाय योजले, तरी पण माणूस निसर्गाचे आव्हान थोपवू शकत नाही हीच आजची सत्य परिस्थिती आहे.
निसर्ग दर पावसाळ्यात को. रे. पुढे आव्हान उभे करत आहे. अर्थात हे सर्व आता आपल्याला समजत आहे. पण इतकी वर्ष तिथे भूस्खलन होतच असणार व त्या मध्ये बऱ्याच गावांचा संपर्क तुटला असणार, काही गाव नष्ट हि झाली असतील. त्यामुळे इतके वर्ष कोंकण दुर्लक्षित का होते याचा हि विचार व्हायला हवा.
निसर्गाची कृपा दृष्टी अजूनही कोकणावर आहे, तिथे आजही महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो, पण आज पर्यंत ना प्रशासनाने ना तिथल्या लोकांनी अश्या काही उपाय योजना केल्या ज्यामुळे पाणी जतन करून ठेवता आले असते.

तर यातून एकच गोष्ट दिसून येते कि, जरी मानवाने तंत्रज्ञानाच्या जोरावर कितीही प्रगती केली व कितीही शक्ती मिळवली, तरी तो निसर्गाच्या शक्ती पुढे, निसर्गाच्या आव्हान पुढे थीटाच  राहणार.

टीव्हीवर संगणक

संगणकावर टीव्ही बघण्यासाठी आजकाल आपणासमोर बरेच पर्याय आहेत. संगणकावर इंटरनेटचा वापर करून आपण अनेक ऑनलाईन टीव्ही चॅनल्स बघू शकतो किंवा संगणकाचा मॉनिटर किंवा एलसीडीला बाहेरून लावण्यासाठी असणारे टीव्ही ट्यूनर कार्डचा वापर करूनदेखील आपण संगणकावर टीव्ही बघू शकतो. पण जर घरच्या टीव्हीवरच आपण जर संगणकात करू शकतो ती सर्व कामे करू शकलो तर? होय आता हे शक्य आहे. एलजी व सॅमसंगने त्यांचे नवीन ‘स्मार्ट टीव्ही’ हे क्रांतिकारी वैशिष्ट्य असणारे एलसीडी टीव्ही सादर केले आहे. ज्याचा वापर करून आपण टीव्हीवरच संगणक वापरू शकतो. ‘स्मार्ट टीव्ही’ हे भविष्यातील टीव्ही आहेत व त्यात संगणक, इंटरनेट व टीव्हीचे भन्नाट कॉम्बिनेशन आहे.


स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये

* संगणक प्रणाली : स्मार्ट टीव्हीमध्ये संगणकात असते तशीच संगणक प्रणाली असते व संगणकाच्या संगणक प्रणालीमध्ये असणारे जवळपास सर्व वैशिष्ट्ये ‘स्मार्ट टीव्ही’मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

* सोशल नेटवर्किंग : ‘स्मार्ट टीव्ही’चे हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे त्यात सोशल नेटवर्किंग विभागात आपण आपल्या टीव्हीवर कुठलाही कार्यक्रम बघता बघताच आपल्या सोशल नेटवर्किंग संकेत स्थळावरील मित्रमंडळींच्या थेट संपर्कात राहू शकतो. सोशल नेटवर्किंगवर आपण ‘लाईव्ह’ असल्यामुळे आपण एखादा आवडीचा कार्यक्रम आपल्या मित्रांना थेट शेयर करू शकतो किंवा एखादा व्हिडीओ किंवा फोटोजदेखील शेयर करू शकतो.

* स्मार्ट ऍप्लिकेशन : स्मार्ट टीव्हीवर संगणक किंवा मोबाईलप्रमाणेच आपणास विविध ऍप्लिकेशन देण्यात आलेले आहेत. या ऍप्लिकेशनचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा टीव्हीवर वापर करू शकतो.

* वेब ब्राऊजर : संगणकाप्रमाणेच स्मार्ट टीव्हीवर आपण वेब ब्राऊजरचा वापर करून इंटरनेटचा वापर करू शकतो. आपण आपल्या टीव्हीवर इंटरनेटवरील विविध संकेतस्थळे वापरू शकतो किंवा आपला ई-मेल पाहू शकतो अगदी इंटरनेटवरून कोणतीही फाईलदेखील डाऊनलोड करू शकतो.

* म्युझिक प्लेयर : स्मार्ट टीव्हीवर आपण इंटरनेटवरून कोणतेही गाणे डाऊनलोड करू शकतो. डाऊनलोड केलेले कोणतेही गाणे आपण स्मार्ट टीव्हीमधील म्युझिक प्लेयरचा वापर करून टीव्हीवरच ऐकू शकतो.

* विजिटस् : यू ट्यूब, पिकासा, स्कायपी, फेसबुक इ. इंटरनेटवरील लोकप्रिय सेवांचे थेट टीव्हीवरच विजिटस् देण्यात आले आहेत व त्याचा वापर करून आपण थेट या सेवा टीव्हीवरच वापरू शकतो.

* प्रोग्राम रेकॉर्डर : डीटीएच टीव्ही सेवेतले हे लोकप्रिय वैशिष्ट्य आता स्मार्ट टीव्हीवरदेखील आपणास बघावयास मिळेल. प्रोग्राम रेकॉर्डरचा वापर करून आपण टीव्हीवर सुरू असलेला कोणताही कार्यक्रम ऑनलाइन किंवा टीव्ही बंद असतानादेखील रेकॉर्ड करू शकतो. रेकॉर्ड झालेला कार्यक्रम नंतर आपण आपल्या सवडीनुसार कधीही बघू शकतो.

* ३डी/एचडी टीव्ही : स्मार्ट टीव्हीमध्ये आपणास ३डी तसेच हायडेफिनेशन असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण आपल्या बजेटप्रमाणे कोणत्याही आवडत्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.

* स्मार्ट कनेक्टिव्हिटी : स्मार्ट टीव्हीमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटीसाठी आपणास विविध पर्याय देण्यात आले आहेत. वायफाय व वायरलेस राऊटरसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या टीव्हीवर इंटरनेटची जोडणी करू शकतो. स्मार्ट कनेक्टिव्हिटीमधले सर्वात क्रांतिकारी वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा, आयपॅड, आयफोन अशी कोणतीही डीव्हाईस तुमच्या टीव्हीला कनेक्ट करू शकता व त्यातील हवी ती गोष्ट किंवा सेवा शेयर करू शकता.

* स्मार्ट टीव्हीचे पर्याय : सध्या बाजारात एलजी व सॅमसंग या दोन कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत व त्याच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी. www.samsang.comlin/smarttv. www.LG.com.
- Techno.savvy@live.com

इंद्रधनुच्या पानावरील टेक्नोलॉजीविषयी माहिती वाचून वाचकांनी टेक्नोसॅव्हीला मेल पाठवून खूप शंका विचारल्या त्यातल्याच काही निवडक प्रश्‍नांना या सदरातून टेक्नोसॅव्ही उत्तरे देणार आहेत. वाचकांनी आपले प्रश्‍न Techno.savvy@live.com या मेलवर जरुर विचारावे


वाचकांचे प्रश्‍न :

१) माझ्याकडे NOKIAE75 हा मोबाईल फोन आहे व त्यात ३जी सेवादेखील आहे. मोबाईलवर ‘LIVE TV’ बघण्यासाठी काय करावे लागेल?

- सुबोध राजम (subodhrajam@gmail.com)

उत्तर -

मोबाईलवर ‘LIVE TV’ ची सेवा देणारी पेड सर्व्हिस सध्या http://mundu.tv या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर नोंदणी करून आपण ‘LIVE TV’ सेवेचा वापर करू शकतो.

सौजन्य:- इंद्रधनू, सामना १९०७२०११.

चातुर्मास

आषाढ शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा चार महिन्यांच्या कालावधीत आजही अनेक जण ‘चातुर्मास’ पाळतात. पिझ्झा, बर्गर, नॉनव्हेजच्या काळात आजची पिढी खूप चंगळवादी बनत चालल्यामुळे व्रतवैकल्यांचा त्यांना विसर पडला आहे. नुसता श्रावण पाळायचा ठरवला तरी पंधरा दिवसांनी अनेकांचा धीर सुटतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण खरंतर असा चातुर्मास पाळायला हवा. सोमवारपासून चातुर्मासाला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने...


हिंदुस्थानी संस्कृती आणि आरोग्य याची सांगड ठिकठिकाणी पाहायला मिळते. पावसाळ्याच्या दरम्यान हा ‘चातुर्मास’ येतो. पावसाळ्यात आपल्या शरीरातील जठराग्नी मंदावत असतो. यामुळे पोटाला आराम मिळावा या हेतूने हा ‘चातुर्मास’ खूप आवश्यक आहे. चातुर्मासात मांसाहार, कांदा लसुणयुक्त पदार्थ वर्ज्य असतात. हे पदार्थ पचण्यास जड असल्यामुळे हा प्रघात पडला असवा. तसेच एकवेळ भोजन, एका दिवसाआड भोजन अशी जेवणाशी संबंधित व्रतवैकल्ये या काळात जास्त आहेत.

धार्मिक महत्त्व

आषाढातील देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून ही ‘शयनी’ एकादशीही समजली जाते. याच काळात ब्रह्मदेवाचे सृजनाचे काम जोरात चालू असते. पावसामुळे धरती हिरवीगार झालेली असते. शेतामध्ये पिकं बहरायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे हा काळ सृजनाचा म्हणून ओळखला जातो.

वर्ज्यावर्ज्य
अ. वर्ज्य : १) प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळूंग, वैश्‍वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पन न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निंबीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ. २) मंचकावर शयन : ३) विवाह किंवा अन्य तत्सम शुभ कार्य ४) चातुर्मास्यात वपन वर्ज्य सांगितले आहे. म्हणजेच चार महिने, निदान दोन महिने तरी एकाच ठिकाणी राहावे.


आ. अवर्ज्य : चातुर्मास्यात हविष्यान्न सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातले मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी, इत्यादी पदार्थ हविश्ये मानतात. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)


वैशिष्ट्यपूर्ण व्रते


* पर्णभोजन व्रत : पानावर जेवण करणे.


* एकभोजन : एकावेळेस जेवणे.

* अयाचित : न मागता मिळेल तेवढेच जेवणे. एकदा जेवण वाढल्यानंतर पुन्हा मागून न घेण्याच्या या व्रातामध्ये मोजकं खाण्यावर भर दिलेला आहे.

* मिश्रभोजन : सर्व पदार्थ एकदाच वाढून घेऊन त्याचा काला करून खाणे.

* धरणे-पारणे : यात एक दिवस भोजन व दुसर्‍या दिवशी उपवास.

दिवशी उपवास.

* एकधान्य : कित्येकजण या काळात एक किंवा दोन धान्यांपासून बनवलेले जेवण जेवतात.

सौजन्य:- देव्हारा, सामना १८०७२०११.

Friday, July 15, 2011

इमारत - २ बीएचके, 4 बीएचके

"अगं तुला माहित आहे का उज्वला ने बदलापूरला ४ बीएचके चा ब्लोक घेतला", "अरे त्या काळेंनी कल्याण ला २ बीएचके चा वेल फर्निश्ड फ्लाट घेतला". अशी वाक्य माझ्या कानी मुंबई ते डोंबिवली प्रवास करताना सतत पडत असत.


तसे आम्ही पूर्वी विक्रोळी (मुंबई) येथे चाळीत स्वताच्या खोलीत राहत असू. माझा जन्म पण तिथलाच आहे. माझे बालपण ते प्राथमिक शिक्षण विक्रोळी तच झाले. ती तीन चाळींची मिळून एक कॉलनी होती. अर्थात तिथल्या आठवणी मी नंतर कधी तरी सांगेनच.

त्या नंतर वडिलांनी निर्णय घेतला डोंबिवलीला स्थाईक होण्याचा, कारण तिथे जवळ काका व आत्या राहतात म्हणून. तेव्हा आम्ही पहिल्यांदा इमारतीत राहायला गेलो. तेव्हा मला मात्र खूप उत्साह वाटत होता, कारण मी पाचवी पास झालो होतो व आता नवीन शाळेत जाणार होतो. पण डोंबिवलीला आल्यावर मला पहिल्यांदा OWNERSHIP व RENTED इमारत यातला फरक कळला.

त्यानंतर काही वर्षांनीच आत्या राहत असलेली इमारत त्यांच्या मालकाने दोन मजल्याची तोडून चार मजली करून त्यांना OWNERSHIP देऊन टाकली. तेव्हा मला ब्लोक किंवा FLAT , SLIDING WINDOW वगैरे काय असते ते कळले.

तो पर्यंत माझा मुंबई चा प्रवास पण सुरु झाला होता व वरील वाक्य कानी पडू लागली होती. तो पर्यंत आम्ही पण भाडोत्री असण्याचा त्रास काय असतो ते मला कळले होते.

नंतर वडील निवृत्त होणार होते तेव्हा एका शेजार्यांच्या मित्राचा रूम बघण्यासाठी ते बदलापूरला जाऊन आले. त्यानंतर आम्ही बदलापूरला जाऊन आलो व आम्ही बदलापूरला FLAT घेण्याचा विचार केला. व आम्ही ४ फेब्रुवारी २००४ रोजी बदलापूरला राहण्यास आलो, तेव्हा मला १ बीएचके या शब्दाचा अर्थ कळला.

त्यानंतर काही महिन्यांनी आमच्या शेजारीच एक COMPLEX उभे राहिले, ज्यात त्या बांधकाम व्यावसायिकाने जमीन, अंतर्गत सजावट यात खूप चांगल्या सुविधा दिल्या होत्या, त्या बघून मला वाटले

आपण अजून थोडे दिवस थांबायला पाहिजे होते !

तर मुद्दा असा कि, आमच्या प्रमाणेच बरेच मराठी मध्यम वर्गीय जे कि मुंबईतून प्रथम ठाण्यात, नंतर डोंबिवलीत व आता बदलापूर मध्ये स्थायिक होत आहेत, आपल्या आपल्या ऐपती प्रमाणे इमारतीत राहण्यास जात आहेत.

आता इथेही इमारतींचे जंगल उभे राहत आहे. आम्ही बदलापूरला राहायला आलो तेव्हा फक्त पश्चिमेला एक इमारत सात माळ्यांची होती, ती सोडली तर पूर्ण बदलापूर मधील इमारती तीन ते चार माळ्यांच्या होत्या. इथल्या नगर परिषदेच्या मागील निवडणुका होई पर्यंत इथे शत प्रतिशत भाजप होते, त्या नंतर इथे भाजप - राष्ट्रवादी ची सत्ता आली व त्या बरोबरच बदलापूर मध्ये परिवर्तने पण झाली, इथल्या नवीन इमारतींची उंची सात ते आठ मजल्या पर्यंत वाढली, इथल्या रस्त्यांच्या खड्ड्यांची संख्या पण वाढली, तसेच एके काळी सतत स्वच्छतेचा पुरस्कार मिळवणाऱ्या बदलापूर मध्ये घाण दिसू लागली.
आपण आज इमारतींमध्ये म्हणजेच एकमेकांच्या डोक्यावर राहत आहोत. पूर्वी चाळीत सात ते आठ रूम असत, तिथेच आज ५० - ६० रूम आहेत. आता तर इमारती पूर्वी जिथे पाणी किंवा दलदल साठत असे, तिथे देखील भरणी घालून बांधल्या जात आहेत. ती पण जागा कमी कि काय म्हणून डोंगर तोडून इमारती बांधल्या जात आहेत व त्यास 'निसर्गाच्या कुशीत' असे गोंडस नाव देऊन विकल्या जात आहेत.


सध्या दूरदर्शनवर एक जाहिरात नेहमी दिसते, NDMA ची (NATIONAL DISASTER MANAGEMENT AUTHORITY ). यात सांगतात कि घर घेण्यापूर्वी किंवा बांधण्या पूर्वी दोन गोष्टी जाणून घ्यावात,

१. SOIL टेस्टिंग म्हणजेच जमिनीची चाचणी केली आहे कि नाही,

२. व ते घर कोणत्या भूकंप प्रवण क्षेत्रात येते ते.

याचा अर्थ असा कि, आपण इमारतीत घर घेताना भविष्याच्या दृष्टीने सतर्क राहावे असा आहे.



आजमिती आपण आपल्या मुलांसाठी कर्ज काढून स्वताचे घर इमारतीत घेत आहोत, जेणे करून आपली मुले आनंदात राहू शकतील. पण थोडासा विचार आपण असा हि केला पाहिजे कि, सगळी कडेच इमारती उभ्या राहत आहेत व चाळ हि संज्ञा च हरवत चालली आहे.





या सर्व इमारतींचे आयुष्य हे कधीतरी संपणारच आहे. त्या वेळी कदाचित आपण नसूही, मग त्या वेळी आपली पुढील पिढी कुठे जाऊन राहणार याचाही विचार व्हायला हवा. त्या मुळे चाळ हि संज्ञा जपली गेली पाहिजे, तिच्यात राहणे म्हणजे कमीपणाचे नव्हे तर भविष्याच्या दृष्टीने आधाराचे मानले पाहिजे.

नाहीतर आपणच आपल्या हाताने आपल्या पुढील पिढीला संकटात ढकलत आहोत असे समजा, आणि हेच विदारक सत्य असेल.

Thursday, July 14, 2011

अळू

पावसात मस्त गरमागरम भाकरी आणि त्यासोबत अळूचं फतफतं खाण्यात जी मज्जा आहे ती काही औरच! कोकणात अळूचे फतफते चांगलेच लोकप्रिय आहे अळूच्या कंदाची, पानांची व देठाचीही भाजी बनवली जाते ओलसर जमिनीत अळूची लागवड जास्त होते या पानांच्या वड्याही सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत काही अळू खाजरे असतात अशावेळी चिंच किंवा कोकमचा वापर करुन त्यातील खाज दूर करता येते हे अळू अतिशय गुणाकरी असतात त्याविषयी - अळू थंड, शक्तिवर्धक, अग्नीप्रदीपक, कफ आणि वायूकारक आहे.


- बेसन घालून अळूच्या पानांच्या वड्या करतात मात्र त्यात भरपूर मसाला आणि तेलाचा वापर करावा ज्यानेे वायुविकाराचा त्रास होत नाही मात्र त्याचे अतिरेकी सेवन टाळावे

- अळू रक्तपित्त, जुलाबात गुणकारी ठरते

- अळूच्या कोवळ्या पानांचा रस काढून त्यात जिरेपूड मिसळून प्यायला असता पित्तप्रकोप दूर होतो

- वायुमुळे पोटात गोळा उठल्यास अळूच्या देठासहित पाने वाफवून त्याचे पाणी काढून त्यात तूप घालून तीन दिवस प्यायला द्यावे

- अळूचा आहारात समावेश केल्याने स्त्रियांना अंगावर दूध चांगले येते

- अळूच्या पानांचा रस तीन-चार दिवस प्यायल्याने लघवीची जळजळ दूर होते

- अळूची देठे विस्तवावर जाळावी व त्याची राख फोडांवर लावल्यास फोड फुटून बरे होतात

- गांधीलमाशी चावल्यास अळू भाजून त्याचा रस दंशस्थानी लावावा तसेच पोटातही घ्यावा

- पोटात कृमी, जंत झाले असता रानटी अळूचा कंद जाळून त्याची राख मधातून चाटावी

- पोटात गुबारा धरुन शौचाला साफ होत नसल्यास लसणाची फोडणी दिलेली अळूची भाजी खावी

- मूतखडा, पित्ताशयामध्ये खडा असणार्‍यांनी अळूचे सेवन टाळावे अळू कधीही कच्च्या स्वरुपात खाऊ नये

सौजन्य:- चिरायू, सामना १४०७२०११.

Wednesday, July 13, 2011

ऍपल लायन

जून २०११ हा महिना तंत्रज्ञानातील आघाडीवर असणार्‍या गुगल, ऍपल व मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन वैशिष्ट्ये असणार्‍या व नवीन दशकातील ग्राहकांच्या गरजा ओळखून बनवलेल्या गोष्टींनी अक्षरश: गाजवला आहे. ऍपलनेदेखील आपली आजपर्यंतची सर्वश्रेष्ठ संगणक प्रणाली ‘लायन’ जगासमोर आणली.

ऍपल लायन ही ऍपलची आजपर्यंतची सर्वश्रेष्ठ प्रणाली आहे. ही प्रणाली फक्त संगणकापर्यंतच मर्यादित नसून ती आयफोन, आयपॅड व मॅक या कोणत्याही प्रकारच्या डिव्हाईसवर चालणारी एकच प्रणाली आहे. त्यामुळे ऍपलचा संगणक, मोबाईल आयपॅड व आयफोन हे एकाच ‘ऑपरेटिंग सिस्टिम’वर चालणार आहेत. ऍपलच्या स्वत:च्या क्लाऊडवर असणारी ही ऑपरेटिंग सिस्टिम २५० पेक्षा अधिक नवीन वैशिष्ट्ये आपणासाठी घेऊन आली आहे.


प्रमुख वैशिष्ट्ये -



* इंटरनॅशनल व्हॉईस - आजपर्यंत आपण आपल्या आवाजात संगणकाला कमांड देऊ शकत होता. पण ऍपलची नवीन ‘लायन’ जगातील २३ बिल्ट इन भाषांमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहे. म्हणजेच तुम्ही संगणकाशी जसे बोलू शकता तसेच संगणकदेखील तुमच्याशी बोलू शकेल. याचा फायदा जर तुम्ही संगणकावर एखादी चुकीची गोष्ट केली तर संगणक स्वत: तुम्हाला काय चुकीचे करत आहोत हे बोलून दाखवेल.

* पिक्चर इन पिक्चर झूम - चित्र झूम करण्याचे हे क्रांतिकारी वैशिष्ट्ये याचा वापर करून तुम्ही एखाद्या चित्रातील फक्त एखादा विशिष्ट विभाग तुम्हाला पाहिजे तेवढा झूम करू शकाल.

* सोशल नेटवर्किंग प्रोफाईल - तुमच्या ऍड्रेसबुकमध्ये तुम्ही तुमचे सोशल नेटवर्किंगमधील मित्रमंडळींचे कॉन्टॅक्स व प्रोफाईल सिंक जमा करू शकाल.

* एयर ड्रॉप - वायरलेस नेटवर्कचा वापर करून तुम्ही कोणतीही फाइल एका ठिकाणावरून दुसरीकडे पाठवू शकाल.

* ऑटोसेव्ह - काम करीत असताना लाइट गेली किंवा संगणक बंद पडला तरी ‘लायन’ प्रणालीवर काम करणार्‍यांना काळजी करण्याचे काहीही कारण नाही कारण ‘लायन’ प्रणाली स्वत: तुम्ही काम करीत असलेल्या सर्व फाइल्स ‘ऑटो सेव्ह’ करीत राहणार आहे.


* फेसटाइम - फेसटाइम हे ‘लायन’मधले सर्वात क्रांतिकारी वैशिष्ट्ये आहे. याचा वापर करून तुम्ही ‘रीयल टाइम’ हाय डेफिनेशन व्हिडीओ कॉल करू शकता तेही कोणत्याही आयपॅड, आयफोन किंवा आयपॉडवर.


* फाइल वॉल्ट - आपल्या महत्त्वाच्या फाइल्स किंवा फोल्डर सुरक्षित ठेवण्याचे हे एक सुरक्षित कपाट आहे. त्याचा वापर करून कोणतीही फाइल तुम्ही इनक्रीप्ट करून सुरक्षित ठेवू शकता व ही फाइल तुमच्या व्यतिरिक्त कोणीही वापरू शकणार नाही.

* फोटो बूथ - आपल्याकडील फोटो एडिट व त्यात बदल करण्यासाठी दिलेले हे नवीन वैशिष्ट्य आहे. यात तुम्ही हाय रीझुल्युशन फोटो एडिटिंग करू शकता किंवा त्यात बदल करू शकता.

* रीझूम - जर तुम्ही एखादे काम करता करता संगणक बंद केला तरी काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही परत संगणक चालू कराल तेव्हा तो ‘रीझूम’ अर्थात शेवटच्या बंद करते वेळेच्या स्थितीत परत चालू होतो त्यामुळे तुम्ही तुमचे अर्धवट राहिलेले काम पुन्हा ‘रीझूम’ करू शकता.

* ऍपल क्लाऊड - तुम्ही तुमची सर्व माहिती किंवा तुमच्या संगणकावर/ मोबाईलवर किंवा आयपॉडवरची सर्व माहिती ऍपलच्या क्लाऊडवर जमा करू शकता व तिचा वापर कधीही कुठेही करू शकता. अगदी तुमच्या आयपॅडवरील गाणे तुम्ही तुमच्या आयफोनवरदेखील डाऊनलोड करू शकता व हे नव्या जमान्याच्या ऍपल क्लाऊडमुळे सहज शक्य होईल.

* मॅक ऍप स्टोअर - ऍपलने आपल्या आयपॅड, मॅक, आयफोनला लागणारी सर्व सॉफ्टवेअर व ऍप्लिकेशन्स त्यांच्या आयय्युनच्या माध्यमातून त्यांच्या नवीन मॅक ऍप स्टोअरला वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्हाला हवे ते ऍप्लिकेशन तुम्ही थेट ऍपलच्या मॅक ऍप स्टोअरमधून डाऊनलोड करू शकता व त्यासाठी तुम्हाला कोणत्याही सिडी/ डिव्हिडीची गरज पडणार नाही.

 

टेक्नोलॉजीविषयी माहिती वाचून वाचकांनी टेक्नोसॅव्हीला मेल पाठवून खूप शंका विचारल्या त्यातल्याच काही निवडक प्रश्‍नांना या सदरातून टेक्नोसॅव्ही उत्तरे देणार आहेत वाचकांनी आपले प्रश्‍न Techno.savvy@live.com  या मेलवर जरुर विचारावे


वाचकांचे प्रश्‍न -

आपण एका मोबाईलवरून दुसर्‍या मोबाईलमध्ये एखादे सॉफ्टवेअर कॉपी करू शकतो का? व त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर इंस्टॉल करावे लागते.

- जे. डी. माळी


उत्तर -

मोबाईल निर्मिती करणार्‍या कंपनीचे मूळ सॉफ्टवेअर जे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले असते त्याला (ध्र्ंिश् सॉफ्टवेअर) असे म्हणतात, असे कोणतेही सॉफ्टवेअर आपण एका मोबाईलवरून दुसर्‍या मोबाईलमध्ये कॉपी करू शकत नाही व त्यासाठी बाजारपेठेत कोणतेही सॉफ्टवेअर उपलब्ध नाही. तुम्ही मूळ सॉफ्टवेअरव्यतिरिक्त कोणतेही सॉफ्टवेअर इतर ठिकाणावरून डाऊनलोड किंवा इन्स्टॉल केले असेल, अशी सॉफ्टवेअर मात्र थेट तुमच्या मोबाईलवरून ब्लू टूथ किंवा इतर कोणत्याही प्रकारे शेयर व कॉपी करू शकता.

Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना १२०७२०११.

Tuesday, July 12, 2011

कॉर्पोरेट मंत्र - मीच मला खांदा देणार!

शरीरात वेगवेगळ्या अवयवात असलेला एक आहे खांदा. डोळ्यावर, ओठांवर, केसांवर, हातांवर अगदी पायांवरही कविता लिहिल्या जातात. पानावर पाने भरून लेख लिहिले जातात. पण ‘खांदा’ या विषयाकडे फार कुणाचे लक्ष जात नाही. खरं तर हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपले संपूर्ण आयुष्य खांदे शोधण्यात जाते. मेल्यानंतर मात्र खांदे देणार्‍यांची रांग लागते. आलटून पालटून नंबर लावून प्रत्येकाला खांदा द्यायचा असतो. ‘मलाही द्यायचाय यांना खांदा. थोडे पुढे गेल्यावर जरा मला संधी द्याल का?’ हे जेवढे सहजपणे ऐकू येते, तेवढे सहज जिवंतपणी नाही कानी पडत. एवढे सगळे खांदे जिवंतपणी का नाही समोर येत, या प्रश्‍नावर विचार करून वेळ घालवणे मूर्खपणाचे लक्षण आहे. आपल्यात पद्धतच आहे ती, ‘जिवंतपणी तिरस्कार आणि मरणोत्तर पुरस्कार.’ अनेक मोठ्या लोकांनीही या पद्धतीतच जीव सोडला. कठीण परिस्थितीत कधी कधी आधार घ्यावासा वाटतो. खूप मनमोकळे बोलावे, रडावे, न पटणारी बाजू असली तरी कुणी ऐकून घ्यावी, डोक्यावरून हात फिरवावा, सगळं नीट होईल असे उगाच आश्‍वासन द्यावे, हे सगळे वाटत राहते. पण तसे काही होत नाही. मग रागाचे वादळ मन, मेंदू झपाटून टाकते. ही सगळी तडफड असते फक्त ‘खांद्या’साठी. मोबाईलमध्ये जमा असलेल्या सर्व नावांमध्ये आपल्याला समजून घेईल असे एकही आढळत नाही अशा क्षणी. हे असे क्षण सर्वांच्याच जीवनात येतात. प्रत्येकाला आधाराची ओढ असते. डोके ठेवायला सगळेच खांदा शोधत असतात. त्यात काहीच गैर नाही. पण आपण विसरतो की, आपल्यालाही दोन खांदे आहेत. आपण जगभर आधार शोधतो, पण स्वत:च स्वत:ला आधार देत नाही. ही चूकच नाही का? ज्या खांंद्यांनी आपण इतरांना आधार देतो तेच खांदे आपल्यालाही आधार देऊ शकतात ही गोष्ट विसरू नका. खांदे शोधत फिराल तर स्वत:च हरवाल. तुम्ही जे खांदे शोधत आहात ते फक्त जगण्याला पूर्णविराम लागल्याशिवाय मिळत नाहीत. आधाराची गरज जाणवली की आरशात पहा. आपल्या मजबूत खांद्यावर असेल त्या संकटाची जबाबदारी सोडा. जेव्हा तुम्ही आयुष्यात संकटक्षणी आरशात पाहाल...हे खांदे तुमच्यासोबत असतील. कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत. खांदे शोधू नका, आधारासाठी वणवण फिरू नका. आरशात पहा. स्वत:ला खांदा द्या. स्वत:ला आधार द्या. पुढल्यावेळी डोके ठेवण्याकरिता खांदा हवा असे वाटले की आरशात पाहून म्हणा, ‘मीच मला खांदा देईन.’

- स्वप्ना पाटकर 
सौजन्य:- फुलोरा, सामना ०२०७२०११

Sunday, July 10, 2011

कॉर्पोरेट मंत्र - सर्व शक्तींचा बाप सहनशक्ती

सध्या ‘पॉवर’चा जमाना आहे. प्रत्येकाला पॉवरचे वेड लागले आहे. आपल्या ताकदीचे प्रदर्शन घालणे सर्वांनाच आवडते. मग ‘मसल’ बनवून कमावलेली शारीरिक ताकद असो किंवा आपल्या पदाचा रुबाब असो. ‘शक्तिप्रदर्शना’चे पोस्टर लावायला कुणी चुकत नाही. शक्ती ही देवाची देणगी आहे. ती तो सगळ्यांनाच देतो. फक्त काहींना ती असल्याचे भान असते. शक्तीचे पहिले स्वरूप आहे शारीरिक शक्ती. शरीराची प्रतिकारशक्ती ठणठणीत असणे यालाच शारीरिक शक्ती म्हणतात. चांगल्या सवयीमुळेच शरीराला प्रतिकार करण्याचे बळ मिळते. पौष्टिक आहार, व्यायाम आणि चांगली झोप माणसाला मजबूत करते. ऑफिसचे काम, ट्रॅफिकचे प्रवास आणि घरी पोहोचल्यावर घरच्या जबाबदार्‍या पार पाडण्यात ही शक्त्ती साथ देते, आजारांपासून दूर ठेवते आणि थकव्याला जवळ येऊ देत नाही. शक्तीचे दुसरे रूप आहे मानसिक शक्ती. प्रॉब्लेम सर्वांनाच असतात. काही थोडक्यात गळून पडतात, तर काही ठामपणे संकटाशी लढायला सज्ज होतात. छोट्या-छोट्या गोष्टींनी वैतागणारे कामात, नात्यात, कशातही लक्ष देऊ शकत नाहीत. मनाने हळवी माणसे शरीराने कितीही बलवान असली तरी त्यांना आयुष्य जडच वाटते. यावरून हे लक्षात येते की, शारीरिक शक्ती हवीच, पण त्यासोबत मानसिक शक्ती नसेल तर सर्वकाही व्यर्थ आहे. तुम्ही कोणत्याही पदावर असा किंवा तुमचा सामाजिक पातळीवर कितीही दबदबा असो, पण स्वत:च्या मनावर जर तुमचा ताबा नसेल तर जगातल्या कोणत्याही ताकदीला काहीच अर्थ राहणार नाही. कुणाला मारणे, त्रास देणे, छळणे किंवा दुखावणे याला ताकद म्हणत नाही. जगातील सर्वात मोठी शक्ती आहे ‘सहनशक्ती’. मोठे आजार असोेत, कठीण परिस्थिती असो, अनेकांची विकेट पडते. भले भले धीर सोडतात. स्वत:शी किंवा परिस्थितीशी धाडलेल्या लढाईत एकच शक्ती कामी येते ती म्हणजे ‘सहनशक्ती’ ही शक्तीदेखील प्रत्येकाकडे असते. अफाट असते, पण आपल्याला ती माहीत नसल्यासारखेच आपण वागतो आणि या शक्तीचीही कमाल आहे. त्रास वाढला की, ही शक्ती दुप्पट वाढते. आपल्या मदतीला ती सतत असते. पुढे त्रास कमी झाला तरी ती कमी होत नाही. दु:खात, काळाच्या पकडीत याहून वाईट काहीच नाही होणार असे आपल्याला वाटत राहते. पण तीही वेळ सरून जाते. आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडतो, पण त्याचे कारण आपली ‘सहनशक्ती’ असते हे आपण लक्षात घेत नाही. हे संपूर्ण जग चालत आहे आशा आणि सहनशक्तीवर. या शक्तीचा सन्मान करा. ती वाढवत रहा. ती वाढली तर त्रास कमी वाढेल. इतर शक्तींचे ‘ऍडव्हर्टाइजमेंट’ पाहून त्यांच्या आहारी जाऊ नका. या शक्तीला सर्वात मोठे स्थान आहे. तुमच्याही आयुष्यात ते असू द्या, कारण सर्व शक्तींचा बाप आहे ‘सहनशक्ती’.


dr.swapnapatkar@gmail.com
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना ०९०७२०११.

Friday, July 08, 2011

प्लेटलेट्स

पावसाळ्यात होणार्‍या मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरेसिस या आजारांमुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊन तो दगावण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स देणे हा उत्तम उपाय आहे आणि त्यासाठी प्रत्येक रक्तपेढीमध्ये रक्तघटक वेगळे करण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. या प्लेटलेट्सविषयी सांगताहेत राज्य रक्त संक्रमण परिषदेचे उप संचालक अशोक देवरे-पाटील.
प्लेटलेट्स हा रक्तामधील एक महत्त्वाचा घटक आहे. प्लेटलेट्स या शरीरातील रंगहीन पेशी असतात. रक्त पातळ होऊ न देण्याचे तसेच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात न होऊ देण्याचे काम या पेशी करतात. रक्तामध्ये हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. सर्वसाधारणपणे रक्तामध्ये प्लेटलेट्सची संख्या दीड लाख ते साडेचार लाख इतकी असते. ती ७० ते ८० हजार इतकी झाल्यास शरीरात इन्फेक्शन झाले आहे असा अंदाज येतो. इन्फेक्शन किंवा इतर काही कारणामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेले तर प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते. प्लेटलेट्स कमी झाल्यास ते बाहेरून भरले जाऊ शकतात. औषधांपेक्षा बाहेरून तयार प्लेटलेट्स रुग्णाला दिल्यास तो आजाराशी प्रभावीपणे सामना करू शकतो आणि औषधेही लागू पडतात.
रुग्णाच्या शरीरात प्लेटलेट्स किती कमी झाले आहेत त्यावरून त्याला प्लेटलेट्स बाहेरून देण्याचा निर्णय डॉक्टर घेतात. प्लेटलेट्स देण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे सिंगल डोनर प्लेटलेट्स. यात प्लेटलेट्स दात्यांची यादी रक्तपेढीमध्ये असते. रुग्णाला आवश्यक प्लेटलेट्स दात्याशी संपर्क साधून त्याला बोलवले जाते. त्याच्या शरीरातील रक्त घेण्यापेक्षा रक्तातील प्लेटलेट्स घेतले जातात आणि ते रुग्णाला चढवले जातात. यामुळे रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या ३०-४० हजारांनी वाढते. दुसरा प्रकार आहे रॅन्डम प्लेटलेट्सचा. यात रक्तपेढ्यांमधून प्लेटलेट्सची युनिट्स आणून रुग्णाला चढवली जातात.
रक्ताप्रमाणेच रक्तघटकही वेळीच उपलब्ध व्हायला हवेत. रक्तदानानंतर त्यातील रक्तघटक सहा तासांच्या आत वेगळे करावे लागतात. प्लेटलेट्स साठवण्यासाठी असलेल्या पिशव्यांची मुदत ३ ते ५ दिवस असते. त्या कालावधीत प्लेटलेट्स वापरावे लागतात. प्लेटलेट्स वेळीच मिळाले तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात. प्रत्येक रक्तपेढीमध्ये रक्तघटक वेगळे करण्याची यंत्रणा यासाठीच आवश्यक आहे.
प्लेटलेट्स नियंत्रणासाठी काय करावे?
- पौष्टिक आहार घ्यावा.
- फळे, भाज्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे.
- आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे.
- शीतपेयांचे सेवन थांबवावे.
- फास्ट फूड, गोठवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत.
- ‘सी’ जीवनसत्त्वयुक्त लिंबू, संत्री, मोसंबी, लसूण खावेत.
- टोमॅटो, बोरे, टरबूज, गाजर, कोबी, पालक यांचे सेवन करावे. 



SAUJANYA:- CHIRAYU, SAMANA 07072011

अंजीर

अंजीरमध्ये उच्च प्रकारचे पोषणमूल्य आहे. त्यापासून कॅल्शियम मिळते. तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटिन (अ जीवनसत्त्व) आणि क जीवनसत्त्व असते. इतर कोणत्याही फळापेक्षा अंजिरात तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात.- सर्दी, खोकला किंवा कफाचा त्रास असल्यास सुकलेले अंजीर दुधात उकळून रात्री प्यायल्यास सकाळी शौचावाटे कफ साफ होतो.
- ताजे अंजीर व दुधाचे सेवन एकत्रित केल्याने शरीरात बळ येते.
- सुके अंजीर व दुधाचे एकत्रित सेवन रोज केल्याने रक्त शुद्ध होते.
- सर्दी, दमा किंवा फुप्फुसाच्या आजारावर अंजीर हे उत्तम औषध आहे. साधारण पाच अंजीर पाण्यात उकळून ते पाणी सकाळ-संध्याकाळ प्यायल्याने आराम मिळतो.



- दम्याचा त्रास असणार्‍यांनी रोज ताजे अंजीर खावे. कफ साचत नाही व दम्यापासून आराम मिळतो.
- अंजीरमध्ये लोह व कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे ऍनिमिया दूर करण्यास मदत होते.
- अंजीरमध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
- फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते. नियमित अंजीर खाल्ल्याने अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच रजोनिवृत्तीदरम्यान महिलांना होणारा त्रास कमी होतो. स्तनांच्या कर्करोगाचाही धोका कमी होतो.
- कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
- मांस किंवा रिफाइन्ड फूड खाल्ल्यामुळे रक्तात वाढणार्‍या आम्लधर्मी घटकांचा समतोल राखण्याचे काम अंजीर करते.
- गॅसचा त्रास असणार्‍यांनी दररोज अंजीर खावे व त्याचा रस प्यावा. त्यामध्ये असणार्‍या औषधी गुणधर्मांमुळे पित्तविकार, रक्तविकार व वातविकार दूर होतात.
- लघवीचा त्रास असणार्‍यांनी दिवसाला तीन-चार अंजीर नियमित खावीत.
- पावसाळ्यात अजीर्णाचा त्रास उद्भवतो. अशावेळी अंजीर खावे. अंजीरमुळे अजीर्णाचा त्रास कमी होतो.


SAUJANYA:- CHIRAYU, SAMANA 07072011

नो टेन्शन - ये बेचाराऽऽऽ

आतापर्यंत आपण मानसिक ताणतणावांचे विविध प्रकार, त्यांची विविध कारणे तसेच तणाव निवारणाचे विविध उपाय या सार्‍यांची तपशीलवार माहिती घेतली.
पण तणावाचा सर्वात मोठा तापदायक काळ हा नोकरी/ व्यवसायाच्या सुरुवातीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा ३०-४० वर्षांचा असा प्रदीर्घ असतो. या काळात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊन त्याद्वारे निर्माण होणारे तणाव आणि त्याचे दूरगामी परिणाम पाहावयास मिळतात. त्याची कारणे पुढीलप्रमाणे-
- नोकरी/व्यवसायाची सुरुवात.
- नोकरी/व्यवसायातील स्पर्धा आणि स्थैर्य.
- नोकरी/व्यवसायातील प्रगती/बदल.
- घरकुलासाठी कर्ज व परतफेड.
- संसारातील वाढत्या जबाबदार्‍या आणि वाढते खर्च.
- आई-वडील, पती/पत्नी, मुलांची आजारपणे व त्यांचा खर्च.
- मुलांच्या शिक्षणाचा खर्च.
वरील घटकांचा विचार करताना दैनंदिन जीवनात यापैकी अनेक घटक ताणतणाव निर्मितीला पोषक ठरू शकतात. परंतु आपण किती मनावर घ्यायचे हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार ठरत असते.
या सर्वांपेक्षा महत्त्वाचा घटक म्हणजे जोडीदाराशी होणारे मतभेद, त्यातून उद्भवणारा घटस्फोट किंवा जोडीदाराचे अकस्मात निधन म्हणजे तणावाचा उच्चांक असतो.
तणावाच्या प्रत्येक वेळी रक्तदाब वाढणे, छातीत धडधडणे, अनिद्रा, चक्कर येणे अशा अनेकविध शारीरिक लक्षणांपैकी एक वा अनेक लक्षणांचे प्रकटीकरण होते.
रामाला, पांडवांना वनवास भोगावा लागला. संतांनाही जीवनात त्रास सहन करावा लागला, पण कुणीही व्यसनाधीन किंवा वेडे झाले नाही किंवा त्यांनी आत्महत्यादेखील केली नाही.
उपाय आणि मार्ग अनेक आहेत, फक्त तुमची तयारी हवी तणावमुक्त राहण्याची, आनंदाने जगण्याची... तुमच्या मदतीसाठी माझ्यासारखे अनेक जण आहेत, फक्त तुम्ही हाक मारा. चारी दिशांनी प्रतिसाद मिळेल.

आपणास खालील पर्यायांचा विचार नक्कीच फायदेशीर ठरू शकतो-
- इतरांचे वागणे आणि स्वभाव याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करूया.
- अपघात, नैसर्गिक/ मानवनिर्मित आपत्तींवरसुद्धा आपले नियंत्रण असू शकत नाही. तेव्हा त्यावर उपाययोजना शोधून अमलात आणण्याचा प्रयत्न करूया.
- घरासाठी किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी कर्ज घेताना आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा तपशीलवार हिशेब लिहून नंतरच पाऊल पुढे टाका.
- मतभेद मग ते कुणाशीही असोत (सहकारी, वरिष्ठ, जोडीदार) वेळीच मिटवले नाहीत तर काट्याचा नायटा निश्‍चित होतो.
- आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम ओळखावी. त्यानंतर मिळालेल्या संधीचे सोने करावे.
- दुसर्‍यांविषयी ईर्षा, मत्सर, कट-कारस्थान यांऐवजी सहकार्य, मदत केल्यास विरोधकांची/ शत्रूंची संख्या वाढत नाही. उलट संकटकाळी इतर लोक आपल्या मदतीसाठी पुढे येतात.
- पैसा, प्रसिद्धी यापेक्षा समाधान महत्त्वाचे असते. ते पैशाने विकत घेता येत नाही. रात्री अंथरुणावर पडल्यावर कोणत्याही औषधाशिवाय लगेच झोप येणारा माणूस अधिक श्रीमंत असतो.
- सात्त्विक चौरस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप ही आरोग्याची त्रिसूत्री आहे, तिचा स्वीकार करा.
- योग आणि ध्यानसाधनेमुळे आत्मविश्‍वास, आरोग्य आणि आत्मबल वाढते जे तणावाला हाताळण्यासाठी समर्थ असते.
- तणावमुक्तीसाठी व्यसनाची कास धरणे म्हणजे आपणच स्वत:ला गळफास लावण्यासारखे आहे.
- जोडीदारापेक्षा नि:स्वार्थी क्वचितच दुसरा मित्र/मैत्रीण मिळतो/मिळते, त्यामुळे जोडीदाराला नि:संकोचपणे तणावाविषयी सांगा.
- आवश्यकता असल्यास मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक किंवा संमोहनतज्ज्ञाला अवश्य भेटा. ‘वेडा’ होण्याची वाट पाहू नका.
समाप्त!
- मिस्टर योगी

SAUJANYA:-  CHIRAYU, SAMANA 07072011