Sunday, July 10, 2011

कॉर्पोरेट मंत्र - सर्व शक्तींचा बाप सहनशक्ती

सध्या ‘पॉवर’चा जमाना आहे. प्रत्येकाला पॉवरचे वेड लागले आहे. आपल्या ताकदीचे प्रदर्शन घालणे सर्वांनाच आवडते. मग ‘मसल’ बनवून कमावलेली शारीरिक ताकद असो किंवा आपल्या पदाचा रुबाब असो. ‘शक्तिप्रदर्शना’चे पोस्टर लावायला कुणी चुकत नाही. शक्ती ही देवाची देणगी आहे. ती तो सगळ्यांनाच देतो. फक्त काहींना ती असल्याचे भान असते. शक्तीचे पहिले स्वरूप आहे शारीरिक शक्ती. शरीराची प्रतिकारशक्ती ठणठणीत असणे यालाच शारीरिक शक्ती म्हणतात. चांगल्या सवयीमुळेच शरीराला प्रतिकार करण्याचे बळ मिळते. पौष्टिक आहार, व्यायाम आणि चांगली झोप माणसाला मजबूत करते. ऑफिसचे काम, ट्रॅफिकचे प्रवास आणि घरी पोहोचल्यावर घरच्या जबाबदार्‍या पार पाडण्यात ही शक्त्ती साथ देते, आजारांपासून दूर ठेवते आणि थकव्याला जवळ येऊ देत नाही. शक्तीचे दुसरे रूप आहे मानसिक शक्ती. प्रॉब्लेम सर्वांनाच असतात. काही थोडक्यात गळून पडतात, तर काही ठामपणे संकटाशी लढायला सज्ज होतात. छोट्या-छोट्या गोष्टींनी वैतागणारे कामात, नात्यात, कशातही लक्ष देऊ शकत नाहीत. मनाने हळवी माणसे शरीराने कितीही बलवान असली तरी त्यांना आयुष्य जडच वाटते. यावरून हे लक्षात येते की, शारीरिक शक्ती हवीच, पण त्यासोबत मानसिक शक्ती नसेल तर सर्वकाही व्यर्थ आहे. तुम्ही कोणत्याही पदावर असा किंवा तुमचा सामाजिक पातळीवर कितीही दबदबा असो, पण स्वत:च्या मनावर जर तुमचा ताबा नसेल तर जगातल्या कोणत्याही ताकदीला काहीच अर्थ राहणार नाही. कुणाला मारणे, त्रास देणे, छळणे किंवा दुखावणे याला ताकद म्हणत नाही. जगातील सर्वात मोठी शक्ती आहे ‘सहनशक्ती’. मोठे आजार असोेत, कठीण परिस्थिती असो, अनेकांची विकेट पडते. भले भले धीर सोडतात. स्वत:शी किंवा परिस्थितीशी धाडलेल्या लढाईत एकच शक्ती कामी येते ती म्हणजे ‘सहनशक्ती’ ही शक्तीदेखील प्रत्येकाकडे असते. अफाट असते, पण आपल्याला ती माहीत नसल्यासारखेच आपण वागतो आणि या शक्तीचीही कमाल आहे. त्रास वाढला की, ही शक्ती दुप्पट वाढते. आपल्या मदतीला ती सतत असते. पुढे त्रास कमी झाला तरी ती कमी होत नाही. दु:खात, काळाच्या पकडीत याहून वाईट काहीच नाही होणार असे आपल्याला वाटत राहते. पण तीही वेळ सरून जाते. आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडतो, पण त्याचे कारण आपली ‘सहनशक्ती’ असते हे आपण लक्षात घेत नाही. हे संपूर्ण जग चालत आहे आशा आणि सहनशक्तीवर. या शक्तीचा सन्मान करा. ती वाढवत रहा. ती वाढली तर त्रास कमी वाढेल. इतर शक्तींचे ‘ऍडव्हर्टाइजमेंट’ पाहून त्यांच्या आहारी जाऊ नका. या शक्तीला सर्वात मोठे स्थान आहे. तुमच्याही आयुष्यात ते असू द्या, कारण सर्व शक्तींचा बाप आहे ‘सहनशक्ती’.


dr.swapnapatkar@gmail.com
सौजन्य:- थर्ड जनरेशन, सामना ०९०७२०११.

No comments: