Saturday, July 23, 2011

आजकालचा चातुर्मास

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते. साधारपणे आषाढी एकादशीपासून विविध नियम करून ते चार महिने पाळण्यावर पूर्वापार भर दिला जातो. आजच्या काळातही हे नियम लागू पडतात. काही नियमांमध्ये थोडेफार बदल करून आजही चार्तुर्मास पाळणं गरजेचं आहे. अगदीच घराबाहेर पडायचे नाही, हा नियम पाळता आला नाही तरी जेवणाबाबतचे नियम पाळायला काहीच हरकत नाही.


पूर्वी चातुर्मासात कांदा आणि लसूण खायचा नाही हा घरोघरी पाळला जाणारा नियमच होता. याचे कारण असे असावे की, कांदा हा थंडावा देणारा आहे. पावसाळ्याच्या थंड वातावरणात कांदा खाण्याने पोटात थंडी होते, पोटात गुरगुरते आणि एकंदरच स्वास्थ्य बिघडायला मदत होते. पण आता एकंदर ऋतुचक्र बदलतेय आणि पृथ्वीवरील उष्ण तापमानात अधिक वाढच होत आहे. त्यामुळे हा कांदा न खाण्याचा नियम पाळण्याची विशेष गरज भासत नाही.

आषाढी एकादशीनंतर १५-२० दिवसांत श्रावणही चालू होतो. श्रावण महिन्यात अनेक उपवास असतात. या उपवास करण्यामागेही असाच आरोग्याशी निगडित उद्देशच होता. या काळात शेतावरची कामे कमी झालेली असतात. घरातल्या घरातच जास्त वेळ जातो. घरातल्या घरात बसून राहण्याने चार वेळा खाल्लेले पचत नाही. पोटात गॅसेस धरतात. अपचनासारखे विकार होतात. त्यामुळे कमी खाल्ले जावे म्हणून उपवास केला जात असे. या महिन्यात हवेतला दमटपणा आणि कुंद वातावरण यामुळे पचनशक्ती थोडी कमी झालेली असते. अशावेळी बटर, चीजसारखे पचनाला जड पदार्थ खाऊन पचनशक्तीवर ताण देऊ नये. या अशा वातावरणात जिकडेतिकडे पाणी साठलेले असते. त्यामुळे हवेतही रोगजंतू पसरलेले असतात. यातूनही पोटाच्या विकाराचा जंतूसंसर्ग होतो. या हवामानात पोटाचे विकार जास्त उद्भवतात म्हणून खरे तर कच्च्या भाज्याही कमी प्रमाणातच खाव्यात.

शिजलेल्या पदार्थांपेक्षा कच्चे पदार्थ पचनास जड असतात. म्हणूनच पावसाळ्यात कच्चे खाणे टाळावे म्हणजे चातुर्मासात उपवास करताना डाएट कॉन्शस होऊन नुसती सलाडस् खाणे टाळलेलेच बरे नाही का! चातुर्मासात मांसाहार नाही असे आजकाल खूप कमीजण करतात, पण श्रावणात महिनाभर मांसाहार नाही हे खूपजण पाळतात. एक तर आषाढानंतरचा काळ माशांच्या पुनरुत्पादनाचा कालावधी असतो. त्यामुळे या काळात मासे पकडलेही जात नाहीत. शिवाय समुद्रही खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारी केली जात नाही. मांसाहार पदार्थही पचनास थोडे जडच असतात. म्हणूनच चातुर्मास आजही पाळायला आरोग्याच्या दृष्टीने इष्टच म्हटले पाहिजे.

- पचनाला जड असणारे पदार्थ टाळावे. जसे चीज, बटर, कच्चे पदार्थ.

- उपवास करणे जमत नसेल तर पचनास हलके पदार्थ खावे. उदा. मूगडाळ, तांदूळ, फळभाज्या. उदा. पडवळ, दुधी इत्यादी.

- स्नॅक्सच्या पदार्थांमध्ये भात-ज्वारीच्या लाह्यांचा वापर करता येईल.

- मांसाहार वारंवार करू नये. ठरावीक दिवशी फक्त म्हणजे आठवड्यात एखादवेळीच मांसाहार करावा.

- चीज, बटर, पास्ता, मॅगी हे वारंवार न खाता १५ दिवसांत एखादवेळी खायला हरकत नाही.

- बहुतेकजण मॉर्निंग वॉकला जात असतात, पण पावसाने त्यांच्या फिरण्यात अडथळा येतो. अशा वेळी देवाला प्रदक्षिणा घालायला हरकत नाही.

- या हवामानात पचनशक्तीवर ताण येऊ नये म्हणून थोडे थोडे अन्न चार पाच वेळा विभागून खा. यामध्ये सूप, मोड आलेल्या धान्याचे चाट, वरणभात, पोळीभाजी, फळे इत्यादी.

- न्याहरीचे पदार्थही पूर्ण शिजलेले, जसे पोहे, शिरा, उपमा, इडली, डोेसे भाजलेला ब्रेड, पराठे (कमी तेल).

- घरगुती बनवलेेले स्वच्छ पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

- उघड्यावरचे पदार्थ पूर्ण टाळावेत.

- चातुर्मासात एकभुक्त म्हणजेच एकदा जेवण्याचा नेम करतात तो जरूर करा. या नेमात दिवसात एकदाच पोटभर जेवा. जेवताना समतोल आहार मिळेल इकडे लक्ष द्या. (भात-वरण, लिंबू, भाजी, चपाती/भाकरी, कोशिंबीर, चटणी, लोणचे इत्यादी).

- पण पूर्ण दिवस उपाशी राहू नका. दिवसभरात सरबत, दूध, सूप, फळ किंवा हलका स्नॅक्स घ्या.

दमट वातावरण, कोंदटपणा, हवेतील रोगजंतू या सर्वांशी मुकाबला करून आरोग्य आणि स्वास्थ्य चातुर्मासाच्या नेमातून मिळवून पुण्य जोडा आणि परंपरा नव्या प्रकारे जोपासण्याचे समाधानही मिळवा.

- स्मृती गोखले
सौजन्य :- चिरायू, सामना

No comments: