Saturday, May 31, 2014

जगन्नाथ मंदीर

- ओरिसन मंदिरांची छाप असलेलं हे मंदिर.
- मंदिराच्या चहूबाजूला मजबूत भिंती बांधण्यात आल्या आहेत.
- भिंतीमध्ये प्रत्येकी एक गोपुरा म्हणजे गेट बांधण्यात आले आहे.
- प्रत्येक गेटवर पिरामिडच्या आकाराचे छप्पर आहे.
- या मंदिराची जमिनीपासूनची उंची ६५ मीटर म्हणजे २१४ फूट एवढी आहे.
- मंदिरात पूजापठनासाठी तब्बल ६,००० भटजी आहेत.
- मंदिराच्या कळसाजवळ एक चक्र आहे. त्याला नील चक्र संबोधले जाते.
- आठ प्रकारच्या धातूंपासून हे चक्र बनविण्यात आले आहे.
- ११ मुख्य मंदिराच्या सभोवताली ३० छोटीमोठी मंदिरे बांधण्यात आली आहेत.
- यापैकी नरसिंहाचे मंदिर अतिप्राचीन असून मुख्य मंदिर बांधण्यापूर्वीच ते उभारण्यात आले होते.

सौजन्य :- फुलोरा, सामना ३१०५१४

गारेगार



उन्हाळा येताच गारेगार बर्फाच्या गोळ्याची आठवण येते. पण निकृष्ट दर्जाचा बर्फ आणि गोळा तयार करण्याची खराब पद्धत यामुळे हेल्थ कॉंन्शियस मंडळी इच्छा असतानाही हा गोळा खाण्याचे टाळतात. परंतु संभाजीनगरातील श्रेयनगर भागात असणारा आनंद गोळा यास अपवाद ठरला आहे. गेल्या ३० वर्षांपासून या व्यवसायात असणारे आनंद बसैये यांनी शुद्धता, स्वच्छता, चव आणि वैविधता जपली आहे. यामुळेच हा गोळा इतरांपेक्षा वेगळा ठरतो.
बर्फाचा गोळा म्हटला तर मशीनवर किसलेल्या बर्फावर टाकलेले विविध चवीचे रंगीत पाणी असे समीकरण असते. परंतु आनंद बसैये यांनी यात हटके प्रयोग केले आहेत. अशुद्ध पाण्याची तक्रार टाळण्यासाठी ते मिनरल वॉटरपासून तयार आणि प्रमाणित कंपन्यांच्या बर्फाचे गोळे बनवतात. रंगही प्रमाणित कंपन्यांचा असतो. मावा आणि साखरेचा पाक ते घरी करतात. गोळ्याच्या चवीत वैविध्य आणण्यासाठीही त्यांनी खासच प्रयोग केले आहेत. यासाठी त्यांना हिंदुस्थानभर केलेली भटकंती कामास आली. राजस्थानात बर्फाच्या गोळ्याचे अनेक प्रकार असतात. मनोज यांनी त्यापैकी काही फ्लेवर संभाजीनगरवासीयांना देऊ केले आहेत. ड्रायफ्रुट्सचा गोळा त्यापैकीच एक. बर्फाभोवती ड्रायफ्रूट्स, मावा, गुलकंद असे पदार्थ टाकून ते गोळा बनवतात. तर केवळ माव्यापासून तयार केलेले दहा प्रकारचे गोळे येथे मिळतात. पूर्वी केवळ काडीला चिकटवलेला गोळा आपल्याला माहिती असायचा. पण बसैये यांनी वाटीतील गोळा तयार करणे सुरू केले आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्यावर पातळ किंवा घट्ट पाक टाकला जातो. तर गोड पसंत नसणार्‍यांसाठी काहीसा खारट-नमकीन चवीचा गोळाही येथे मिळतो. पावसाळ्यातील चार महिने वगळता ८ महिने हा गाडा सुरू असतो. दसर्‍याला स्टॉल सुरू होतो ते थेट जून अखेरपर्यंत चालतो. दिवसाकाठी एक हजाराहून अधिक खवैये गोळा खाण्यासाठी अक्षरश: रांगा लावतात. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली गर्दी रात्री अकरापर्यंत कायम असते. हायजेनिक असल्यामुळे उच्चभ्रू मंडळीही कारच्या रांगा लावून बर्फ गोळ्याचा आस्वाद घेतात. १० रुपयांपासून ६० रुपये किंमतीचे हे गोळे उन्हाळ्यातील उष्णता तर घालवताच, पण बालपणीच्या दिवसांची आठवणही ताजी करतात.
- प्रिया गंद्रे
सौजन्य :- फुलोरा, सामना ३१०५१४

मलावष्ठंभ - आयुर्वेद आरोग्य

काय हो पोट साफ होतंय का? हो अगदी नॉर्मल. पण कसं होतंय विचारलं तर सुरू होतं रामायण. जोर द्यावा लागतोय. खडा होतो, संडास एक दिवसाआड होतेय. संडास करतेवेळी त्या जागी जळजळ होतेय. या पाळण्यातल्या बाळाला मलावष्ठंभ म्हणतात. हा मोठ्या मोठ्या आजाराला जन्माला घालतो.
सात वर्षांची दुर्वा संडास करायचं म्हटलं की घाबरायची. त्रास होतो म्हणून रडायची. आईसोबत आली तेव्हा तिच्या हातात कुरकुरे होते. मग सांगा कचरा खायला द्याल तर मग पोट खराब होणारच. नाडी व पोट तपासताना यकृताची आणि पचनाची तक्रार जाणवली. खाण्याविषयी पथ्ये सांगितली. जेवणाआधी १/२ तास १ चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र मिक्स करून चाटायला सांगितले. जेवणानंतर २ चमचे द्राक्षासव २ चमचे पाण्यात मिक्स करून घ्यायला सांगितले. महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपताना कापूस एरंडेल तेलात भिजवून संडासाच्या ठिकाणी ठेवायला सांगितले. तेलामुळे संडासला सहज होऊ लागले आणि औषधामुळे पचन सुधारले. आठवड्याभरात पोटाची तक्रार बरी झाली.
बेचाळीस वर्षांच्या कांबळे बँकेत चौकशी विभाग सांभाळतात. केस घेताना लक्षात आले की लघवी, संडासला झाले तरी समोर भली मोठी रांग असल्यामुळे त्या टाळत होत्या आणि जेवणामध्ये फास्टफूड जास्त प्रमाणात होते. संडास एक दिवसाआड होत होते, गॅसेस, अस्वस्थ होत होते. त्यांना लगेच सात दिवसाचा बस्तीचा कोर्स केला आणि जेव्हा प्रेशर येईल तेव्हा संडास, लघवीला जायला सांगितले. खाण्याविषयी नियम सांगितले. महिन्याभरात अपचन, गॅसेस मलावष्ठंभ हा सगळा त्रास पूर्णपणे बरा झाला.
पचनशक्ती व्यवस्थित असल्याची लक्षणे- दोन वेळा कडकडून भूक लागणे.
- खाल्लेलं अन्न पचन करणे.
- सकाळी एकदाच पोट साफ होणे.
- रात्री (झोपताना २५-३० बिया काढलेल्या काळ्या मनुका चावून खाणे.)
- आठवड्यातून एकदा २ चमचे एरंडेल दुधातून घेणे.
- आपण जे खातोय ते पचवू शकतो का याचा विचार करा.
- डॉ, दीपक केसरकर
:सौजन्य - फुलोरा, सामना ३१०५१४

Thursday, May 01, 2014

संधीवात

संधी भेटताच वाढणारा वात असं म्हटलं तर काही खोटं नाही. ‘अभी तो मैं जवान हूं।’ हे आजोबांनाच शोभून दिसतं, परंतु आता पंचविसाव्या वर्षांतच हाडांचा खुळखुळा झालाय.
असाच बत्तीस वर्षांचा तरुण, पण अगदी म्हातारपण आलेला सुधीर. कोणत्या सांध्यातून आवाज येत नसेल तर शपथ! सर्व सांधे तर दुखत होते, सोबत गंजलेल्या बिजागरासारखा करकर आवाज येत होता. त्याचा दोनदा अपघातसुद्धा झाला होता आणि भरीस भर कामाला पिझ्झा बॉय म्हणून. त्यामुळे खाण्याचीसुद्धा बोंबाबोंब, शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अंगाला सहचरादी तेल लावायला दिले. सोबत वात कमी करणारी, हाडांना बळकटी देणारी औषधं सुरू केली. खराब वात बाहेर काढेल आणि हाडांचे पोषण करील असे २१ दिवस दुधाचे बस्ती केले. तेल लावल्यामुळे सांध्यांना वंगण तर मिळालेच त्याचप्रमाणे बस्तीमुळे हाडांना मजबुती मिळाली. त्याला पहिल्या बारा दिवसांतच बरं वाटायला लागलं. साडेतीन महिन्यांनंतर तो संधीवाताचे दुखणे विसरला.
आजकाल आईवडील लहान मुलांच्या वजनाकडे जास्त लक्ष देताना जाणवतात. टीव्हीवर दाखवणार्‍या बंद डब्यातील खाद्यपदार्थांमुळे मुलांचे वजन तर वाढतंच, परंतु नुसता मेद (फॅट) वाढून पुढे हाडांचे पोषण होत नाही. असाच अनुभव पवार कुटुंबाला आला. सात वर्षांचा मुलगा. पहिल्या तीन वर्षांमध्ये डबाबंद खाद्यपदार्थ. वजन वाढलं, पण ते वजन सहन करणारी हाडं मात्र पोकळ राहिली. या सर्वांमुळे त्याला संध्याकाळी ताप येऊन अंग दुखायचं. त्याला शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मेद पचवणारी औषधं दिली. तेल लावून घाम काढला व सात दिवस काढ्याचे बस्ती दिले. आठव्या दिवशी अडीच किलो वजन कमी झाले. मेद पचून हाडांना मजबुती मिळाल्याने ८० टक्के फरक पडला.
अनुभवाचे बोल
चाळीतल्या कुलकर्णी आजोबांची नुकतीच पंचाहत्तरी साजरी केली. सगळ्यांच्या आग्रहाखार त्यांनी सांगितलेले गुपित तुम्हाला सांगतो :
- आंघोळीपूर्वी अंगाला तिळाचे तेल लावणे.
- आठवड्यातून एकदा रात्री झोपताना दुधातून २ चमचे एरंडेल घेणे.
- संध्याकाळी भूक नसल्यास जेवण न करता दूध पिणे.
- दररोज सकाळी १५ मिनिटे दीर्घश्‍वसन.
यालाच म्हणतात,
‘ओल्ड इज गोल्ड’.
- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य :- फुलोरा, सामना ०१०५१४