Saturday, May 31, 2014

गारेगार



उन्हाळा येताच गारेगार बर्फाच्या गोळ्याची आठवण येते. पण निकृष्ट दर्जाचा बर्फ आणि गोळा तयार करण्याची खराब पद्धत यामुळे हेल्थ कॉंन्शियस मंडळी इच्छा असतानाही हा गोळा खाण्याचे टाळतात. परंतु संभाजीनगरातील श्रेयनगर भागात असणारा आनंद गोळा यास अपवाद ठरला आहे. गेल्या ३० वर्षांपासून या व्यवसायात असणारे आनंद बसैये यांनी शुद्धता, स्वच्छता, चव आणि वैविधता जपली आहे. यामुळेच हा गोळा इतरांपेक्षा वेगळा ठरतो.
बर्फाचा गोळा म्हटला तर मशीनवर किसलेल्या बर्फावर टाकलेले विविध चवीचे रंगीत पाणी असे समीकरण असते. परंतु आनंद बसैये यांनी यात हटके प्रयोग केले आहेत. अशुद्ध पाण्याची तक्रार टाळण्यासाठी ते मिनरल वॉटरपासून तयार आणि प्रमाणित कंपन्यांच्या बर्फाचे गोळे बनवतात. रंगही प्रमाणित कंपन्यांचा असतो. मावा आणि साखरेचा पाक ते घरी करतात. गोळ्याच्या चवीत वैविध्य आणण्यासाठीही त्यांनी खासच प्रयोग केले आहेत. यासाठी त्यांना हिंदुस्थानभर केलेली भटकंती कामास आली. राजस्थानात बर्फाच्या गोळ्याचे अनेक प्रकार असतात. मनोज यांनी त्यापैकी काही फ्लेवर संभाजीनगरवासीयांना देऊ केले आहेत. ड्रायफ्रुट्सचा गोळा त्यापैकीच एक. बर्फाभोवती ड्रायफ्रूट्स, मावा, गुलकंद असे पदार्थ टाकून ते गोळा बनवतात. तर केवळ माव्यापासून तयार केलेले दहा प्रकारचे गोळे येथे मिळतात. पूर्वी केवळ काडीला चिकटवलेला गोळा आपल्याला माहिती असायचा. पण बसैये यांनी वाटीतील गोळा तयार करणे सुरू केले आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्यावर पातळ किंवा घट्ट पाक टाकला जातो. तर गोड पसंत नसणार्‍यांसाठी काहीसा खारट-नमकीन चवीचा गोळाही येथे मिळतो. पावसाळ्यातील चार महिने वगळता ८ महिने हा गाडा सुरू असतो. दसर्‍याला स्टॉल सुरू होतो ते थेट जून अखेरपर्यंत चालतो. दिवसाकाठी एक हजाराहून अधिक खवैये गोळा खाण्यासाठी अक्षरश: रांगा लावतात. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली गर्दी रात्री अकरापर्यंत कायम असते. हायजेनिक असल्यामुळे उच्चभ्रू मंडळीही कारच्या रांगा लावून बर्फ गोळ्याचा आस्वाद घेतात. १० रुपयांपासून ६० रुपये किंमतीचे हे गोळे उन्हाळ्यातील उष्णता तर घालवताच, पण बालपणीच्या दिवसांची आठवणही ताजी करतात.
- प्रिया गंद्रे
सौजन्य :- फुलोरा, सामना ३१०५१४

No comments: