Friday, February 18, 2011

एकाग्रतेची गुरुकिल्ली त्राटक

योगाभ्यास करीत असताना मनाची एकाग्रता आवश्यक असते अन्यथा योगासने म्हणजे शारीरिक कसरत होते.


मनाची एकाग्रता ही जीवनात कित्येक वेळी आवश्यक ठरते. विशेषकरून विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता म्हणजे अभ्यासाचा प्राण.

अभ्यासात लक्ष लागत नाही अशी तक्रार कित्येक पालक आणि विद्यार्थी करीत असतात. एकाग्रतेसाठी पहाटे लवकर उठणे, रात्री उशिरा जागरण करणे असे विविध प्रयोग केले जातात. विशेषत: परीक्षेच्या काळात तर अशा प्रयोगांना आणि संबंधित उपचारांना उधाण येते.

योगाभ्यासातील ‘त्राटक’ म्हणजे मानसिक एकाग्रतेसाठी एक गुरुकिल्लीच आहे. ‘पी हळद नि हो गोरी’ अशा म्हणीप्रमाणे गोळी खाल्ल्यावर लगेच परिणाम होत नसला तरी नियमित त्राटक केल्यास खालील फायदे निश्‍चित मिळतात -

१) मानसिक एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते २) डोळ्यांचे दोष दूर होऊन दृष्टी सुधारते
३) आत्मविश्‍वास वाढतो, मनोधैर्य वाढते ४) निर्णयक्षमता वाढते, मनोबल उंचावते
५) ताण-तणावाचे व्यवस्थापन करून समतोल, आरोग्यपूर्ण जीवन जगता येते
६) स्वयंस्फूर्ती जागृत होऊन कार्यक्षमता वाढते ७) निद्रानाशाच्या तक्रारी दूर होतात.

आसन स्थिती : पद्मासन, वज्रासन किंवा सुखासनात बसावे. हे शक्य नसेल तर खुर्चीवर पाठीचा कणा सरळ राहील अशा अवस्थेमध्ये बसावे.


* साधारण एक मीटर अंतरावर डोळ्यांच्या रेषेत दिव्याची ज्योत येईल असा दिवा ठेवावा किंवा भिंतीवर बिंदू/टिकली लावावी. हल्ली ॐच्या भोवताली वर्तुळे असलेले चित्रसुद्धा वापरतात.

* प्रथम दीर्घ श्‍वास-प्रश्‍वासाची पाच आवर्तने करावीत. नंतर डोळ्यांच्या पापण्या न मिटता एकटक ज्योत/बिंदूकडे पाहत राहावे. बुब्बुळांचीसुद्धा हालचाल करू नये. दिवा लावल्यास हवेने ज्योत हलणार नाही याची काळजी घ्यावी.

* काही वेळाने डोळ्यांवर ताण येऊन पापण्या आपोआप मिटू लागल्यावर हळुवारपणे डोळे मिटून काही वेळ तसेच ठेवावेत. डोळे चुरचुरणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा तक्रारी सुरुवातीला जाणवतात, परंतु सरावामुळे त्या कमी होतात.


* सर्वसाधारणपणे त्राटकाचा तीन ते पाच मिनिटे नियमित सराव केल्यास पुरेसे असते.

* सभोवतालचे वातावरण प्रसन्न असावे, कोंदट नसावे.

* मध्य त्राटक हे कोणाही व्यक्तीला करता येते.

* बाह्य त्राटक सूर्याकडे पाहून करावयाचे असल्यास सकाळच्या कोवळ्या किरणातच करावे. भरदुपारी करू नये.

* सुरुवातीला त्राटक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे.

* त्राटकांचा सराव विद्यार्थ्यांसाठी परीक्षापूर्व काळात भीती, दडपण अशा मानसिक तक्रारींसाठी निश्‍चित आशेचा किरण ठरू शकतो.

* त्राटकांचे प्रकार

पुरातन ग्रंथांमध्ये त्राटकांचे तीन प्रकार सांगितले आहेत -

आंतर त्राटक : यामध्ये साधक डोळे बंद करून नाभी, हृदय किंवा भुवयांमधील मध्यबिंदू यापैकी एका ठिकाणी अंतर्मुख होऊन पाहत राहतो.

बाह्य त्राटक : यामध्ये डोळे उघडे ठेवून चंद्र, सूर्य किंवा तारे या दूरवरच्या वस्तूंवर साधक एकटक पाहत राहतो.

मध्य त्राटक : या प्रकारात बिंदू, दिव्याची ज्योत यांसारख्या वस्तूंकडे साधक एकटक पाहत राहतो.

सौजन्य :- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक.

No comments: