Wednesday, February 23, 2011

सायबर वॉर

सायबर वॉरमुळे हिरोशिमा किंवा नागासकीवर अणुबॉम्ब टाकून केलेली अपरिमित जीवितहानी नक्कीच होणार नाही. परंतु एखाद्या देशाची संपूर्ण ‘इन्फर्मेशन सिस्टिम’ व दळणवळण यंत्रणा कोलमडून टाकण्याची क्षमता नक्कीच आहे व त्याचबरोबर आपल्याकडील महत्त्वपूर्ण माहिती जी कोट्यवधी संगणकावर सध्या स्टोअर केली असेल ती ‘वॉश आऊट’ अर्थात नाहीशी होण्याचा धोका व तिचा गैरवापर केला जाण्याची शक्यता अशा अनेक गोष्टी होऊ शकतात.


भविष्यातील युद्ध हे संगणकाचा ‘कीबोर्ड व माऊस’चा वापर करून होईल असे जर कोणी म्हटले तर ते खरे वाटणार नाही, पण जागतिक महासत्तेच्या सारीपाटावर मात्र भविष्यातील सायबर युद्धाच्या सोंगट्यांच्या चालींना केव्हाच सुरुवात झाली आहे. यावर सर्वसामान्य माणसाला विश्‍वासदेखील बसणार नाही.

पण खरंच विचार करा की, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेला मोबाईल फोन किंवा इंटरनेट जर अशाप्रकारे अचानक बंद पडला तर किंवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या इतर काही सेवा ज्या मुख्यत्वे दळणवळण अर्थात कम्युनिकेशन सिस्टिमवर चालतात जसे बँकांचे एटीएम किंवा बँक, शेअर खरेदी-विक्री, आजकाल सर्वत्र असणारे क्रेडिट कार्ड मशीन्स, अवकाशात उडणारी विमाने व त्यांचे एअर ट्रॅफिक कंट्रोलशी होणारे कम्युनिकेशन, रेल्वे रिझर्व्हेशन, अगदी आपल्या दूरचित्रवाणीवर चालणारे विविध चॅनेल्स जर क्षणार्धात काही कळायच्या आत जर अचानक बंद पडले तर... कदाचित त्याचे अनेक विध्वंसकारी परिणाम होऊ शकतात. काही क्षणातच आपली अर्थव्यवस्था कोलमडू शकते व सर्वत्र हाहाकार माजू शकतो. अगदी कल्पनेच्या पलीकडे घडणारे असे काहीही होऊ शकते. यालाच ‘सायबर वॉर’ असे म्हटले जाते.

अमेरिकेमध्ये ‘सायबर सिक्युरिटी’ सांभाळण्यासाठी एक वेगळी निष्णात तंत्रज्ञांची मोठी फौज तयार करण्यात येत आहे व हे तंत्रज्ञ अशाप्रकारच्या सायबर युद्धापासून त्यांच्या देशाचे संरक्षण करतील. अशाच प्रकारे जगातील अनेक देशदेखील आपल्याकडे ‘सायबर वॉर’शी लढा करण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहेत. दुदैंवाने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रभागी असणारा आपला देश ‘सायबर सिक्युरिटी’मध्ये मात्र कमालीचा पिछाडीवर आहे. ण्र्ंिऊ.ग्ह (कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम) ही एकमेव सरकारी संस्था काही प्रमाणात या क्षेत्रात काम करीत आहे. तरीही सर्वसामान्य संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणे वापरणार्‍या माणसाला मात्र ‘सायबर सेफ्टी’बद्दल फारशी माहिती नसतेच. त्यामुळेच मग ‘बॉम्ब ब्लास्ट’नंतर देशविघातक शक्ती कुणाचे तरी ‘वाय फाय’ इंटरनेट हॅक करून त्यावरून ईमेल पाठवण्यासारखे प्रकारदेखील सर्रास घडतात.

भविष्यातील सायबर युद्धाला तोंड देण्यासाठी सरकारी यंत्रणेबरोबरच खासगी कंपन्यानादेखील त्यांच्या ‘इन्फर्मेशन सिक्युरिटी’वर काम करावे लागणार आहे व त्याचबरोबर आपल्या देशातील संगणक व इतर डिजिटल उपकरणे वापरणार्‍या प्रत्येकाला ‘इन्फर्मेशन सिक्युरिटी’चे ज्ञान माहिती करून घ्यावे लागेल तरच भविष्यातील ‘सायबर युद्धा’त आपला निभाव लागू शकेल.


तुम्हीही बळी ठरू शकता!

* ‘सायबर वॉर’ हे काही एक देश दुसर्‍या देशाशी करेल असेदेखील नाही. सायबर वॉर एकाच देशात त्याच देशातील लोकदेखील करू शकतात.

* एखादी कंपनी आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी प्रतिस्पर्धी कंपनीच्या नेटवर्कवर व इन्फर्मेशन सिस्टिमवर डीडीओएससारखे (डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस) शस्त्र वापरून त्यांच्या सर्व सेवा जे ग्राहक वापरतात त्या काही काळासाठी बंद पडू शकते. अर्थात त्यामुळे सेवा पुरवठा करणार्‍या कंपनीची बाजारपेठेतील पत कमी होऊन तिला आर्थिक फटका पोहोचवणे हा उद्देश असतो.

* आपली प्रतिस्पर्धी कंपनी कोणते नवीन प्रॉडक्ट (वस्तू) बाजारात आणणार आहे हे जाणून घेण्यासाठीदेखील अशाप्रकारचे ‘सायबर वॉर’ खेळले जाऊ शकते.

* आजच्या बाजारपेठेतील प्रचंड स्पर्धा व त्या स्पर्धेत टिकण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी आजकाल कोणतीही कंपनी काहीही करण्यास तयार असते व ‘सायबर वॉर’ हे साधन या सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते.

* आपण आपल्याकडील ‘माहिती व तंत्रज्ञाना’वर आधारित सर्व गोष्टींची आतापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली नाही तर ‘सायबर वॉर’च्या धोक्याची आपल्यावर सदैव टांगती तलवार राहील.

No comments: