Saturday, February 19, 2011

घरटं - फुकाचा अभिमान

‘अभिमान’ असा नुसता शब्द उच्चारला तरी लगेच अमिताभ आणि जया बच्चन समोर येतात. बायकोला अधिक प्रसिद्धी मिळताना पाहून असूयेने, रागाने बायकोपासून दूर जाणारा नवरा यात अमिताभने उत्तम रंगवला होता. खरं तर बायकोच्या प्रसिद्धीमुळे असूया निर्माण होण्यापेक्षा आपण तिच्याइतके सरस नाही, याचाच राग त्यात जास्त होता. असे अमिताभ आपल्या आसपास खूप असतात.

अशाच एका जया बच्चनने नुकतीच आपली नोकरी सोडली. त्याच निमित्ताने खरंतर हा सिनेमा पुन्हा आठवला. मुलीकडे दुर्लक्ष होतंय, हे एक ठरलेलं कारण तिनेही सांगितलं. तिचा नवरा तुलनेने कमी पगाराच्या, कमी आवाका असलेल्या कंपनीत काम करतो. ही पूर्वीपासूनच तशी एक पाऊल पुढे. कॉलेजमध्ये असताना शिक्षकांना हिचा अभिमान वाटायचा. आपली विद्यार्थिनी खूप पुढे जाणार, असा विश्वासच होता त्यांना. पण, आज परिस्थिती अगदी वेगळी आहे. घरी सासू आहे, नवरा दुपारी कामावर जातो. तरीही मुलीकडे नीट लक्ष दिलं जात नाही म्हणून मग हिने नोकरीच सोडली. नाही म्हणायला, गप्पांच्या ओघात नवर्‍याने मारलेले टोमणे येतातच. सगळं दुःख सांगून झालं की, ‘हे काय चालायचंच. सगळीकडे हीच गत असते,’ अशी सारवासारव करायलाही ती विसरत नाही.


एका मित्रामधला कॉम्प्लेक्स फील तर इतका आहे की, याला खरंच मित्र म्हणावं का, असा प्रश्‍न पडतो. आपण त्याला ‘स’ म्हणूयात. या ‘स’ने सर्वार्थाने वरचढ असणार्‍या मुलीशी लग्न केलं. तिला नोकरीत झपाट्याने बढती मिळत गेली. मात्र तितक्याच झपाट्याने दोघांमधली भांडणंही वाढत गेली. कधीही भेटल्यावर ‘ती काय मजेत आहे. नसायला काय झालं. हल्ली मॅडम झाल्यात ना त्या. त्यामुळे घरात काय, आम्हाला किंमतच नाही,’ अशा अर्थाचं पुराण सुरू करतो. याच स्वभावामुळेच की काय, त्याची मित्रमंडळीही बर्‍यापैकी कमी झालीत. त्याचाही राग स बायकोवरच काढतो. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाणं, फोनवर गप्पा मारणं यासाठी तिच्यावर बरेच निर्बंध आहेत. हे कमीच वाटावं, असेही किस्से आहेत. एक मैत्रीण मुलांना स्वावलंबी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते. ऑफिसला गेल्यावर घरी मुलांनी स्वतःची लहानमोठी कामं स्वतःच करावी, असं तिचं आहे. पण, घरातलं कुठलंच काम न येणारा तिचा नवरा मात्र यावर संतापतो. बायकोने मुलांना सूचना केल्या की याचा डायलॉग ठरलेला, ‘आम्ही तुझ्यासारखे पाळणाघरात नाही वाढलो. आमची आई दिवसभर आमच्याबरोबर असायची. सगळं प्रेमाने करायची.’

काय म्हणावं या वृत्तीला?

मनुष्यप्राण्यात नर हा नेहमीच स्वतःला मादीपेक्षा श्रेष्ठ मानत आलाय. सर्व व्यवस्था याच सोयीने तयार केल्या गेल्यात. कामासाठी घराबाहेर पडणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हे सगळं आजच्या मुली करतात, हे खरंच. पण, आजही लग्न होऊन मुलगीच सासरी जाते, मुलगा नाही. घरातली कामं स्त्रीनेच पाहायची असतात. पुढारलेल्या देशांमध्येही थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसतं.

याच व्यवस्थेचे संस्कार आपल्यावर झालेले असतात. बायको नवर्‍यापेक्षा सरस ठरणं, हे अनेकदा बायकांच्याच पचनी पडत नाही. मग, पुरुषांची काय गत! ज्या बाईला आपण घरात घेऊन आलो तिनेच आपल्याला डोईजड व्हावं? हे पचवणं अनेकांना जमत नाही. बायकोला आपल्यापेक्षा अधिक पगार आहे, ही गोष्ट तर अनेक नवर्‍यांची झोप उडवते. इतकंच नाही, आपल्यापेक्षा अधिक चांगली कंपनी, नीटनेटकेपणा, मनमिळाऊ स्वभाव अशा कोणत्याही गोष्टीवरून नवर्‍याचा अहं दुखावू शकतो. या आणि इतर अनेक बाबतीत बायकोने नवर्‍यापेक्षा जरा कमीच असायला हवं, असा जणू नियमच आहे. नवर्‍यापेक्षा उंच बायको असं दृश्य कितीवेळा दिसतं?

आपण दुसर्‍यापेक्षा सरस आहोत, हे दाखवण्याच्या नादात आपण स्वतःमध्ये कमीपणाची भावना निर्माण करत आहोत, हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. आपल्याच जोडीदाराच्या गुणांचं कौतुक करण्याइतकाही चांगुलपणा अशा कद्रू स्वभावाच्या माणसांमध्ये नसतो. बायकोमध्ये अमुक गुण आहे, याबद्दल राग येतो. मात्र, हा राग खरं तर आपल्यात तो गुण नाही याचा असतो. त्यामुळे या नवर्‍यांमध्ये कॉम्प्लेक्स फील येतो. त्यातूनच पुढे वाद, भांडणतंटे सुरू होतात. काही जणी या घुसमटीतून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारतात. तर, काही जणी वर उल्लेखलेल्या कुणा एकीसारखा तडजोडीचा निर्णय घेतात.

पण म्हणतात ना, अपवादाने नियम सिद्ध होतो. या विषयावर चर्चा करताना एका सहकार्‍याने त्याचा अनुभव सांगितला. ‘लग्नाला आता आठ वर्षं झाली. तिला सुरुवातीपासूनच माझ्यापेक्षा जास्त पगार आहे. तिचा वावरही बर्‍याच वेगळ्या वर्तुळात असतो. पण, तिच्याकडे पाहूनच मला अधिक चांगलं काम करण्याची, पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. तिच्यात काही गुण आहेत तसे माझ्यातही आहेत. मी माझ्यातल्या गुणांना अधिक वाव दिला तरच यशस्वी होऊ शकेन, हे समजावून सांगण्यातही बायकोचा वाटा आहे.’ हे सगळं सांगताना सुरुवातीला वादही झाले आमच्यात हे सांगायलाही तो कचरत नाही.

एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी एकमेकांच्या संगतीने, कॉम्पिट न करता कॉम्प्लिमेण्ट करत जगणं, हे अधिक छान आहे, नाही का?

No comments: