Friday, February 18, 2011

ऍनिमल थेरपी


मला तर हा लेख पटतो. कारण माझ्या कॉलेज लाइफ आमच्या कडे मांजर पाळली होती. तुम्ही कधी प्राण्यांना आपला 'मित्र'  बनवून पाहिलेत का ?   


प्राणी पाळणे ही केवळ ‘हौसे’ची गोष्ट असे आपल्याकडे अजूनही मानले जाते, पण या प्राण्यांचा उपयोग आजार किंवा व्याधी दूर करण्यासाठीही होऊ शकतो हे मानसशास्त्रज्ञांनी व संशोधकांनी सिद्ध करून दाखवले आहे. यालाच प्राणी चिकित्सा किंवा ऍनिमल असिस्टेड थेरपी असे म्हणतात.


वास्तविक पाळीव पशू-पक्ष्यांनाही आपल्यासारखेच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. माणसाच्या सहवासामुळे त्यांना आपली बोली कळते, आपले हसणे-रडणे कळते. इतकेच काय तर आपल्या मनातली गोष्टही ते समजून घेऊ शकतात. हे डॉक्टरांचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ तुम्ही आजारी असाल तर तुमचा कुत्रा किंवा कुत्री तुमच्या पलंगाशेजारीच ठाण मांडून बसेल. तुम्ही रडत असाल तर तो जिभेने तुमचे पाय गोंजारेल किंवा अश्रू पुसेल. फक्त कुत्राच नव्हे तर कोणताही पाळीव प्राणी मनुष्याचा चांगला मित्र बनू शकतो. या मैत्रीचा उपयोग आपण आपले आरोग्य सुधारण्यासाठीही करू शकतो.

व्याधी आणि प्राणी

* उच्च रक्तदाब, हृदयरोग असणार्‍या व्यक्तींनी काचेच्या टँकमध्ये ठेवलेल्या माशांच्या मनमोहक हालचाली पहाव्यात किंवा कुत्रा-मांजराच्या सान्निध्यात २०-२५ मिनिटे राहावे. मनावरचा ताण आपोआप कमी होऊ लागतो. उत्साह वाढतो.

* मुलांचे बौद्धिक कौशल्य वाढविण्यासाठी त्यांना लॅब्रेडॉर, गोल्डन, रिट्रीव्हर, कॉकर स्पॅनियल यांसारख्या शांत स्वभावाच्या कुत्र्यांसोबत खेळायला द्यावे.

* मांजर, ससा यांसारखे प्राणीही मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देतात.

* भावनिक समस्येच्या गर्तेत सापडलेल्या व्यक्तींना जीवनाची नवी दिशा शोधायची असेल तर त्यांनी कबुतर, लव्ह बर्डस्, फुलपाखरे यांच्या सान्निध्यात वेळ घालवावा.

* उच्चार दोष असलेल्या व्यक्तींनी पोपट, काकाकुवा यांसारख्या पक्ष्यांशी संवाद साधावा.


* ऍनिमल एंजल

प्राण्यांच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार करण्याची पद्धत जगात सर्वत्र अवलंबिली जात आहे. यासाठी खास प्रशिक्षित प्राण्यांचा वापर केला जातो. पण हिंदुस्थानात अजूनही अशा संस्था फारच कमी आहेत. मात्र रोहिणी फर्नांडीस यांनी ऍनिमल एंजल फाऊंडेशन ही संस्था मुंबईत सुरू करून ऍनिमल थेरपीची मुंबईकरांना नव्याने ओळख करून दिली. ज्यांना घरी प्राणी पाळणे शक्य नाही त्यांना या संस्थेचा आधार मिळत आहे. ही संस्था त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या प्राण्यांमार्फत रुग्णांवर उपचार करते. अधिक माहितीसाठी www.animalangelsfoundation.com या वेबसाईटवर भेट द्या.

सौजन्य :- एक मराठी दैनिक वृत्तपत्र.

No comments: