Tuesday, February 08, 2011

पती, पत्नी आणि पैसा

माझे तर नाही, काय तुमचे आयुष्य या लेखानुसार झाले आहे ? वाचा आणि विचार करा.
पूर्वी बायकोने नवर्‍याला पगार विचारला तर नवर्‍याला राग यायचा, पण आता तर वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. बायकासुद्धा नवर्‍याइतकाच किंवा काही घरांमध्ये तर नवर्‍यापेक्षा जास्त पगार घरी आणू लागल्या आहेत. त्यामुळे पूर्वीचं बायकोचं जोड उत्पन्न आता एक स्वतंत्र उत्पन्न झालंय. इतकं की एकमेकांना पगार विचारणं, आपल्या खर्चांबाबत किंवा गुंतवणुकीबाबत आपल्याच जोडीदाराला माहिती देणंसुद्धा डाऊन मार्केट किंबहुना वैयक्तिक स्वातंत्र्यावरील अतिक्रमण मानलं जातंय.


बँकेत नोकरी करणार्‍या श्रीमान काळेंचा पगार सौभाग्यवती काळेंना लग्न होऊन १९ वर्षे झाली तरी माहीत नव्हता. तशी कधी आवश्यकताच पडली नाही. घरखर्चाला आपण सौभाग्यवतीला दर महिन्याला सहा-सात हजार रुपये देतो बाकी माझं मीच बघतो, असं बोलण्यात श्रीमान काळेंना मोठा अभिमान वाटे. पण चुकीच्या ठिकाणी गुंतवलेले चार लाख रुपये बुडाले तेव्हा हेच काळे आपल्या बायकोसमोर ओक्साबोक्सी रडले. अखेर सौभाग्यवतीचं स्त्रीधन अर्थात सोन्याचे दागिने विकून त्यांनी मुलाच्या महाविद्यालय प्रवेशासाठी पैसा उभा केला.


अशा अनेक घटना, अनेक श्रीमान व सौभाग्यवती काळे आपल्या सभोवताली असतात. पूर्वीच्या काळी म्हणजे काही वर्षांपर्यंत तर बायकोने नवर्‍याला पगार विचारला तर नवर्‍याला राग यायचा, पण आता तर वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. बायकासुद्धा नवर्‍याइतकाच किंवा काही घरांमध्ये तर नवर्‍यापेक्षा जास्त पगार घरी आणू लागल्या आहेत. त्यामुळे पूर्वीचं जोड उत्पन्न आता एक स्वतंत्र उत्पन्न झालंय. इतकं की एकमेकांना पगार विचारणं, आपल्या खर्चांबाबत किंवा गुंतवणुकीबाबत आपल्याच जोडीदाराला माहिती देणंसुद्धा डाऊन मार्केट किंबहुना वैयक्तिक स्वातंत्र्यावरील अतिक्रमण मानलं जातंय. व्यक्तिवादी विचारसरणीतून जन्माला आलेल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या संकल्पनेला या कौटुंबिक स्थित्यंतराचं श्रेय जातं.

आजच्या काळात आर्थिक स्वातंत्र्य ही एक गरज बनत चालली आहे. नवरा आणि बायको जरी आपल्या घरासाठी, मुलांसाठी एकत्र येऊन खूप गोष्टी करत असले तरी एक व्यक्ती म्हणून त्यांना आपले आर्थिक स्वातंत्र्य जपावेसे वाटते. जगातल्या सर्व विषयांवर ते मनमोकळेपणे गप्पा मारतील, पण स्वत:च्या पगारात झालेली वाढ, केलेली एखादी नवीन गुंतवणूक, बोनस याबाबत मात्र त्यांच्यामध्ये चर्चा होईलच याची खात्री देता येत नाही.

आर्थिक स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांच्या मते आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे नवरा व बायको दोघेही जबाबदारीने वागतात मग योग्य निर्णयच घेतात. तर काहींच्या मते, जेव्हा आपल्याला आपल्या साथीदाराच्या कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीची किंवा उत्पन्नाची माहिती नसते तेव्हा आपण त्याला कधीही गृहीत धरत नाही. आपण नेहमी सतर्क व सबळ राहतो आणि जेव्हा अगदीच गरज पडते तेव्हाच आपल्या साथीदाराची मदत घेतो.

असं हे आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यातून होणारी आर्थिक विभागणी अनेक जोडप्यांना आजकाल आवडत असली तरी आर्थिक सल्लागारांना मात्र हे मत पटणारं नाही. जोपर्यंत एखादं जोडपं एकत्र येऊन आर्थिक नियोजन करत नाही तोपर्यंत त्यांच्या नियोजनाचा फायदा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला होत नाही, असं या क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे.

खरंतर आर्थिक स्वातंत्र्याच्या या संकल्पनेला एक नकारात्मक असा मानसिक पैलूही आहे. उदाहरणार्थ जोडप्यातील एकाने एखादं मोठं कर्ज घेतलं असेल, अवास्तव खर्च केला असेल किंवा त्याला स्वत:च्या आर्थिक व्यवहारांची लाज वाटत असेल किंवा कमीपणा वाटत असेल तर अशा व्यक्ती त्यांच्या जोडीदारापासून स्वत:चे आर्थिक व्यवहार गुप्त ठेवतात. आर्थिक स्वातंत्र्याच्या मुखवट्याखाली अशा अनेक गोष्टी लपवता येतात, पण अशा पळवाटा शोधण्यापेक्षा एकमेकांशी व्यवस्थित बोलल्याने आर्थिक गुतंवणुकीबाबतचे प्रश्‍न सहज सुटू शकतील.

नवरा आणि बायको दोघांनीही जर एकमेकांशी चर्चा-विनिमय करून घरातले तसंच गुंतवणुकींबाबतचे निर्णय घेतल्यास अवास्तव गुंतवणूक, अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतात. इतकच नव्हे तर, घरखर्चासाठी कुठलंही पाऊल उचलताना उदाहरणार्थ, घर किंवा एखादं वाहन किंवा अगदी टीव्ही-एसी विकत घेतानाही कुणा एकावर फार भार येत नाही ना, याची काळजी घेता येऊ शकते. अर्थातच कुणा एकाकडून आर्थिक निर्णय घेताना चूक होत असेल तर ती चूक जोडीदाराकडून सुधारली जाऊ शकते. शेवटी चूकभूल द्यावी-घ्यावी. यालाच तर लग्न म्हणतात ना?

* स्वत:लाच विचारा...

१. तुमचा नेमका पगार तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगितला आहे का?

२. तुम्ही कुठे किती गुंतवणूक केली आहे ते जोडीदाराला ठाऊक आहे का?

३. तुमच्या चुकीच्या निर्णयांमुळे उदाहरणार्थ अयोग्य गुंतवणूक किंवा उधारी यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानाबाबत तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद साधता का?

सौजन्य :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

No comments: