Monday, February 28, 2011

मी आहे!

मी हा शब्द फार छोटा आहे, पण त्याचा अर्थ फार मोठा आहे. अनेक मोठ्या शब्दांचा, विचारांचा, भावनांचा बाप म्हणजे ‘मी’. या शब्दाचा अर्थही परिस्थिती आणि काळानुसार बदलत राहतो. तो कधी स्वाभिमान असतो, कधी त्याग असतो, तर कधी अहंकार. आपण कुणाशी व कुणाबद्दल बोलत आहोत यावरही हा अर्थ वेगळे वळण घेतो. आयुष्यात येणार्‍या प्रत्येक क्षणात ‘मी’ असतोच. तो असावाही, पण तो हवा तेवढाच असावा. आपण आपल्यात गुरफटून राहिलो तर त्या ‘मी’ला काहीच अर्थ राहत नाही. स्वार्थ आणि त्याग हे खरेच, पण दुसर्‍यांसाठी ठेवलेल्या स्वार्थाची रंगत वेगळीच असते. तसेच दुसर्‍यांसाठी ‘मी’ जोपासला तर त्या ‘मी’चे नकळत ‘आपण’ होते. ज्या लोकांसोबत ‘मी’ म्हणजे ‘आपण’ असे वाटते त्यालाच नाती म्हणतात. बाकी सगळे वरवरचे बुडबुडे. स्वत:वर प्रेम करा, आपल्या असण्याचा स्वाभिमान बाळगा, पण त्या स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात होता कामा नये. आपण आपल्या मोठेपणाचे पोस्टर जगभर लावणे याला स्वाभिमान म्हणत नाहीत. मोठ्या माणसाला ‘मी मोठा आहे’ असे सांगावे लागत नाही. आचारांनी आणि विचारांनी मोठे व्हा. अहंकाराच्या सागरात सर्वच बुडून मरतात. त्यात वाचणे कठीण असते. त्यामुळे या सागरात उडी टाकण्याचा विचार सोडा. स्वाभिमानाच्या संथ नदीचा अनुभव घ्या. त्यात ‘मी’ असतो. आपल्या जगाबाहेर थोडेसे डोकावा आणि आपल्या जगातही आपल्यांना जागा द्या. ऑफिसमध्ये, घरी, समाजात वावरताना स्वत:तला मी जिवंत ठेवून सर्वांसोबत आपण व्हा! स्वत: बदलू नका, दुसर्‍यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. ‘आपण’ झालात तर बदल आपोआप घडतील. तुम्हाला कळणारही नाहीत आणि ते सुखदही वाटतील. आता तुम्हीच पहा, या लेखात ‘मी’ किती वेळा आला, पण मी या ‘मी’त तुम्हाला पाहिले. हा लेख संपता संपता माझ्या ‘मी’चा ‘आपण’ झाला तर माझे ‘मी’ सार्थकी लागेल. आजकालचा ‘मी’ म्हणजे ‘इगो’ सोडून द्या. आपलेपणा आणि समजूतदारपणा त्याहून लाखमोलाचा आहे. कुणाला तरी म्हणा, ‘मी आहे’ तेव्हा त्या ‘मी’ला खरा अर्थ येईल.


‘मीच रहा, पण आपण व्हा’ या लेखात किती मी आहेत ते मोजा. जास्त असतील, पण ते कमी वेळा आलेल्या ‘आपण’पुढे फिके पडतील. ‘मी आहे.’

No comments: