Tuesday, March 22, 2016

श्री भावई देवी मंदिर



श्री भावई देवी मंदिर
मालडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, भारत

शिवाजी महाराजांच्या काळात तारू म्हणजेच नौका किंवा बोट चालवणाऱ्या लोकांना "तारी" हि उपाधी मिळाली होती. आणि त्यावेळचे तारी म्हणजेच आजचे "पराडकर". तारू चालवणे हा मुख्य उद्योग धंदा असल्यामुळे तेव्हा तारींचे वास्तव्य जास्त करून आपल्या मूळ गाव "पराड" ऐवजी वेग वेगळ्या बंदरांजवळ असायचे. त्या मुळे तेव्हा महाराजांनी "मालडी" हे गाव तारीणा दान दिले होते.  

नंतर जस जसा काळ पुढे सरकत होता तसे पराडकरांचे वास्तव्य पराड गावातून कमी होऊन मालडी गावात वाढू लागले. त्या मुळे अशी आख्यायिका सांगितली जाते कि पराड गावात असलेली ग्रामदेवता श्री भावई देवी सुद्धा एका रात्री मालडी गावात येउन स्थाईक झाली. मात्र पराडकरांची कुळदेवता श्री दुर्गा देवी मात्र पराड या गावीच राहिली. आजही पराडकरांची जेवढी श्रद्धा त्यांच्या कुळदेवते वर आहे त्या पेक्षा कैक पटीने जास्त श्रद्धा त्यांच्या ग्रामदेवते वर आहे. 


बदलत्या काळानुसार श्री भावई देवी मंदिर चा जिर्णोधार करण्यात आला व त्या साठी "मालडी ग्रामोत्कर्ष मंडळ " ची स्थापना झाली. त्या नंतर दरवर्षी २६ मे रोजी श्री भावई देवी मंदिर जिर्णोधार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्या साठी पराडकर व इतर सासुरवाशी कुटुंबीय सुद्धा मोठ्या उत्साहाने ह्या उत्सवात न चुकता सहभागी होऊ लागले. अर्थात मंडळ स्थापन केल्या नंतर आर्थिक उलाढाल हि वाढली. ह्या उत्सवात दरवर्षी कोणी न कोणी सधन भाविक स्व खर्चाने पूर्ण महाप्रसादाचा व इतर सामान जसे खुर्च्या, टेबल वगैरे खर्च उचलतो, त्या मुळे हा भर मंडळावर पडत नाही.   

तसेच ह्या मंडळावर आता पर्यंत असलेले पदाधिकारी हे वेग वेगळ्या शाशकीय क्षेत्रात कामाला आहेत, उदा. पोलिस, सर्वेयर, वकील वगैरे. पण हल्ली एक धक्का दायक बाब सर्व पराडकर कुटुंबीय समोर आली ती अशी कि, बाजूच्या आडवली गावातील लोकांनी श्री भावी देवी मंदिर व परिसर वर आपला ताबा असल्याचे सिद्ध करण्या साठी गेली तेरा वर्ष कोर्टात खटला दाखल केला होता व त्या खटल्यात वरील मंडळातील एकही पदाधिकारी हजर राहिला नाही.  


जे पदाधिकारी मंडळ स्थापन झाल्यावर ग्रामस्थांच्या मुंबईतली घरांकडे वर्गणी गोळा करण्या साठी फेऱ्या मारायचे त्यांना ह्या खटल्यात जाण्यासाठी वेळ न मिळणे हे देखील न उलगडणारे कोडे आहे. आता ह्या खटल्यातील मुख्य मुद्दा असा आहे कि श्री भावई देवी मंदिर परिसर चे जे कागद पत्र आहेत ते अडवली च्या घाडींच्या नावे आहेत.  मग मंडळ स्थापन करण्या पूर्वी व जिर्णोधार करण्या पूर्वी जी आवश्यक कागद पत्रे हवी आहेत त्यांची शहानिशा का करण्यात आली नाही. तसेच गावच्या नियमांप्रमाणे जर आपण घर दुरुस्ती साठी काढले तर ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागते, मग ग्रामपंचायत ने तेव्हा मालडी च्या मंडळाला मंदिर जीर्णोधाराची परवानगी कशी दिली हा हि प्रश्न अनुत्तरितच आहे.
आता तर अशी परिस्तिथी झाली आहे कि कोर्टाने निकाल हा Ex-party लावला व पोलिसांना आदेश दिले आहेत, कलम १४४ नुसार कुणीही पराडकर वा मालडी ग्रामस्थ दि २२, २३, २४ मार्च २०१६, जेव्हा होळी व रंगपंचमी आहे त्या दिवशी श्री भावई देवी मंदिर परिसरात म्हणजेच १९ घुन्टे जागेत दिसले तर अटक करा.
त्या मुळे मुंबईकर पराडकरांना विनंती आहे कि त्यांनी ह्या दरम्यान गावी जाऊ नये. अडवलीचे घाडी ह्या वर्षी होळी उत्सव भावई मंदिर परिसरात साजरा करणार आहेत.
त्या मुळे ह्या वर्षी होणार्या १३ मे च्या उत्सवावर पण भीतीचे सावट पसरले आहे. त्या मुळे ह्या मंडळावरील आजी व माजी पदाधिकारी आता अंग काढून घेऊ शकत नाही. सर्व पराडकर व मालडी ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.
ह्या सर्व घडामोडी मुळे पुन्हा एकदा तोच सर्व सामान्य अनुत्तरीत प्रश्न आ वासून उभा राहतो, कि हि देवांच्या नावावर स्थापन होणारी मंडळे खरच सेवाभावी असतात कि फक्त त्यातील लपलेल्या आर्थिक सेवेसाठी भाव घेतात?  

सौजन्य :- मनलेख