Thursday, March 24, 2011

नो टेन्शन - स्वसंमोहन चिकित्सा

संमोहन चिकित्सा - मनात खोलवर शिरून आतील नकारात्मक विचारांचा, भीतीचा कचरा साफ करून सकारात्मक विचारांच्या सुगंधाने मनाला स्वच्छ आणि ताजेतवाने करणारी अशी ही संमोहन चिकित्सा पद्धती.



या उपचार पद्धतीतील एक अंग ‘स्वसंमोहन’ शास्त्रोक्त पद्धतीने तज्ज्ञ संमोहन चिकित्सकाकडून स्वसंमोहनाचे एकदा परिपूर्ण प्रशिक्षण घेतले की, कुणीही व्यक्ती स्वत:भोवती एक संरक्षक कवच बनवून मानसिक ताण तणावापासून स्वत:चा बचाव स्वत:च करू शकते.

ताण-तणाव हा काही काल-परवा ज्वालामुखी किंवा धूमकेतूसारखा अचानक उद्भवलेला नाही. इतिहासामध्ये त्यासंबंधी आपल्याला अनेक उदाहरणे सापडतात. महाभारतामध्ये ऐन युद्धाच्या वेळी अर्जुनाला प्रचंड मानसिक ताण जाणवत होता. नीती-अनीती, सत्य-असत्य अशा विविध प्रकारच्या द्वंद्वामध्ये त्याचे मन अडकले होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला जो बोधपर उपदेश केला तोच मानसिक ताण-तणाव मुक्तीसाठी जगातला पहिला ग्रंथ ठरला ‘श्रीमद् भगवद्गीता.’

अतिशय समर्पक भाषेत असलेली भगवद्गीता कुणीही वाचावी. तणावमुक्तीचा मार्ग निश्‍चितच सापडतो, कारण त्यामध्ये श्रेष्ठ असा कर्माचा सिद्धांत श्रीकृष्णाने सांगितला आहे. तोच सिद्धांत आजदेखील लागू पडतो. त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले ‘मनाचे श्‍लोक’देखील आजही कुणालाही मनाची देखभाल आणि मशागत करायला समर्थ आहेत.

त्वरित लागू पडणार्‍या उपायांविषयी ...

* तणावग्रस्त वाटू लागल्यावर एखाद्या निवांताच्या ठिकाणी जा.

* डोळे मिटून सावकाश पूर्ण छाती भरून जाईपर्यंत हळूहळू श्‍वास घ्या.

* छाती पूर्णपणे भरल्यानंतर हळूहळू श्‍वास सोडून छाती रिकामी करा.

* श्‍वास घेताना आणि सोडताना ‘मी रिलॅक्स होत आहे.’ ‘माझे मन शांत होत आहे’, ‘मनावरचा ताण नाहीसा होत आहे’ अशा सूचना स्वत:ला देत रहा.

* संपूर्ण लक्ष श्‍वास-प्रश्‍वास प्रक्रिया, मनाला देणार्‍या सूचना, शारीरिक स्थिती यावर ठेवा.

* संपूर्ण शरीर सैल ठेवा.

* शक्यतो हवेशीर आणि शांत जागेची निवड करा. (एखादे मंदिर, तुमचे देवघर, ऑफिसातली केबिन अशा प्रकारची ठिकाणे उत्तम) वरील प्रयोगानंतर शांत, सामान्य (नॉर्मल) वाटल्यास आपल्याला तणाव कशामुळे जाणवला याची एका डायरीत नोंद करा. ज्या ज्या वेळी तुम्हाला तणाव जाणवेल, त्या प्रत्येक वेळेची नोंद सविस्तर तपशिलासहित करायला विसरू नका. असे केल्याने तुम्हीच पोलीस बनून गुन्हेगाररूपी ताण-तणावाला अटक करू शकता आणि त्याच्यावर विजय मिळवू शकता, अर्थातच दीर्घकाळ सातत्याने त्यावर लक्ष ठेवूनच.तणाव एकाच परिस्थितीमुळे निर्माण होतो असे नाही.

* ऑफिसमधील राजकारण, वाढत्या जबाबदार्‍या, कामाचे वाढीव तास

* स्वत:चे किंवा कुटुंबातील सदस्याचे दीर्घ आजारपण

* मुलांचे करीयर किंवा विवाह यासंबंधी समस्या

* घरातील किंवा ऑफिसातील मतभेद यापैकी ‘मेरा वाला कौनसा?’ यांची नोंद करा.
सौजन्य:- मानिनी, सामना
misteryogi1@yahoo.com

No comments: