Tuesday, March 15, 2011

कॉर्पोरेट मंत्र - पिंपळ व्हा!

 माझे आयुष्य पण या लेखातील पिंपळाप्रमाणेच होते. पण सध्या खंड पडला आहे. तरी पण मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन पिंपळ बनण्याचा.

सध्या सर्वांनाच वेळ कमी पडतो. सकाळ होते. कामांना सुरुवात होते. गर्दी, दगदग, धावपळ, शोधाशोध, प्रवास, आदेश, कर्तव्य, प्रगती, ओढाताण, चढ-उतार सगळं काही दिनचर्येप्रमाणे घडत-उलगडत राहते. तेवढ्यात रात्र होते. दिवस संपतो. तो संपला पण आपल्यालाच संपल्यासारखे वाटते. दुसरा दिवस येणार हे माहीत असते, पण तो असाच जाणार हेही माहीत असते. ही जाणीव घेऊन येते चीडचीड, ऑफिसचे काम संपत नाही, घरातली कर्तव्य संपत नाहीत. आपल्याकडे काय नाही याचा हिशेब सुरू होतो. काय आहे यावर लक्ष द्यायची आपली सवय नसतेच म्हणून अर्धवट हिशेब लावून डोक्याला हात लावतो, पापण्या भिजवतो. बॉस, नवरा, बायको, नातेवाईक, सहकारी कसे आपल्याला समजत नाहीत याचा जाप करतो. उरला सुरलेला वेळही राग, रुसवे, द्वेष आणि वैताग करण्यात घालवतो. जे नाही त्यासाठी सगळेच रडतात पण जे आहे त्यात सुखी राहणारे कमी असतात. पिंपळाचा आदर्श ठेवा. त्याला कुठेही टाकले तरी तो रूजून येतो आणि मिळेल त्या हवा-पाण्याचा आधार घेत फोफावतो. याचा अर्थ पिंपळ फक्त ‘ऍडजेस्टमेंट’ करतो असे नाही. त्याला कळते फक्त फोफावणे, तेच त्याचे ध्येय असते. जे हवा पाणी असेल त्याच्याशी दोस्ती करून मोठे व्हायचे, फोफवायचे एवढेच त्याच्या मनात असते. बघता बघता पिंपळ सारा आकाश व्यापून टाकतो. मोठा होतो. भरपूर सावली देतो. कधी काळी त्याला उपटून टाकायचा विचार करणार्‍यांनाही तितकीच सावली देतो. पिंपळाचे आयुष्य फोफावणे आणि सावली देणे हेच आहे. तसे पाहिले तर मनुष्याचे आयुष्यही तसेच हवे. मोठे होऊन इतरांना मोठे करणार्‍या पिंपळासारखे जगा. येणार्‍या प्रत्येक परिस्थितीशी मैत्री करा. त्यातूनच मोठे व्हाल यावर विश्‍वास ठेवा. सर्वांना आपल्या समजूतदारपणाची व मायेची सावली द्या. पिंपळ होऊन पाहा. कधी एखाद्या नर्तकीप्रमाणे सळसळ करीत डोलणारा, कधी शंकराच्या तांडव नृत्याप्रमाणे आसमंत घुमवून टाकणारा, आवाज करीत आपल्या बाहूंनी सर्व जगाला कवेत घेणारा तो कधी स्वत:शीच मस्तीत शीळ घालत बसल्या जागी हसत हसत बोलणारा. कधी एखाद्या सर्वसंग परित्याग केलेल्या योग्याप्रमाणे निश्‍चल होऊन स्वत:ची सर्व जाणीव हरपून बसलेला. पिंपळाची पानं पुस्तकात ठेवली जातात. पिंपळाचा आदर्श ठेवलात तर तुमची आठवण ही जपली जाईल. मोठे व्हा, मोठे करा, पिंपळ व्हा.

सौजन्य:- dr.swapnapatker@gmail.com थर्ड जनरेशन, सामना. 

No comments: