Saturday, March 05, 2011

कॉर्पोरेट मंत्र - आधार

आपण कुठेही उभे राहिलो की टेकतो. गरज नसतानाही नकळत आधाराची ओढ मनाला असतेच. आपण श्‍वास घेताना विचार करत नाही. आपण श्‍वास घेत आहोत ही क्रिया आपल्या विचारांवर अवलंबून नसते. तसेच स्वत:ला न सांगता आपण आधार शोधत असतो. घरात, कार्यालयात, गर्दीत, एकटेपणात, सगळ्यात. बाजूला बसून अश्रू पुसणे हाच फक्त ‘आधार’ आहे हे समजणार्‍यांनी जरा आपल्याच मनाशी संवाद साधावा. आधाराची व्याख्या काय? आधार म्हणजे दगड होणे. देवळातली देवाची मूर्ती होता आले तर तुम्ही आधाराचा खरा अर्थ समजाल. प्रत्येक देवळात येणारा भक्त आपल्या सुख-दु:खाचा हिशोब मांडत असतो. कधी हात जोडून रडतो तर कधी हसतमुखाने सुखाचे क्षण वाटतो. कधी जड मनाने माफीही मागतो, तर कधी रागरागाने आपले हक्क मागतो. आधार त्या भक्ताची गरज व अट्टहास दोन्ही असते. खरं तर आधार द्यायचा की नाही हा पर्याय त्या देवाकडे नसतोच कारण आधार देण्याची गोष्ट नाही, ती घेण्याची गोष्ट आहे. ज्याला गरज भासते तो ‘आधार’ घेतोच. कुटुंबात, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये अनेकदा लोक तेच तेच विषय आणि तीच तीच रडगाणी घेऊन येतात. ते काय सांगणार ते आपण आधीच हजार वेळा ऐकलेले असते. त्यांचा त्रास फार असला तरी त्या त्रासाचे मोल आपल्या मनात उतरत जाते. पण तसा विचार का करावा? जर तुम्ही त्या देवळातला दगड वाटत असाल तर ते तुमच्याकडून आधार घेणारच. अगदी तुमच्या समंतीशिवाय अशावेळी न वैतागता व न त्रागा करता थोड्या वेळासाठी देवळातला दगड व्हा. ऐकून घ्या. तुम्ही काही बोलला नाहीत तरी चालेल. देवळातील दगडाची मूर्तीही काहीच बोलत नाही. ती फक्त असते. तुम्हीही असा. कुणी आपला आधार घेत असेल तर घेऊ द्या. काही क्षणांसाठी दगडी का होईना पण देव होण्याची संधी सोडू नका. फक्त मोठेच छोट्यांना आधार देतात असे नाही. जगात कुणीही कुणाचाही आधार होऊ शकते. मिर्जा गालीबने त्यांच्या एका शायरीत म्हटले आहे.


‘‘एक पत्थर होना चाहिये सर पटकने के लिये’’ तसेच, कुणाचा तरी दगड व्हा. देव नका होऊ, आधार व्हा.

No comments: