Saturday, March 19, 2011

पी पाणी

उन्हाच्या झळा जाणवू लागल्यामुळे सरबताच्या गाड्यांवरची गर्दी चांगलीच वाढू लागली आहे. पण या सरबतापेक्षाही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे अधिक आवश्यक आणि योग्य आहे. सरबतांमुळे नाहक वजन वाढते. त्यापेक्षा पाणी प्यायल्यामुळे शरीराची स्वच्छता होते. पाणी बेचव वाटत असले तरी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घेतली पाहिजे.


पाणी पिण्याची सवय कशी लावायची

आठ बाय आठचा नियम लक्षात ठेवा :

दररोज आठ औंस मापाचे आठ पेले पाणी प्या. पण प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असलेले पाण्याचे प्रमाण तिच्या दैनिक कामकाजावर आणि वजनावर अवलंबून असते. यासाठी सोपी पद्धत अशी की तुमच्या वजनाला ३० ने भागा. जे उत्तर येईल तितके (उदा. तुमचे वजन ७० असेल तर तुम्ही दररोज २.३ लीटर) पाणी प्यायलेच पाहिजे.

पाण्याची बाटली सतत सोबत ठेवा :

तुम्ही जिथे जाल तिथे स्वत: सोबत पाण्याची बाटली घेऊन जा. पाणी साठवण्यासाठी एकतर काचेची बाटली किंवा चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिकची बाटली वापरा. यूज ऍण्ड थ्रो बाटल्या पुन:पुन्हा वापरल्यामुळे पाणी विषाक्त होण्याची भीती असते.

गजर लावा :

अनेकांना पाणी पिण्याची आठवणच होत नाही. तहान लागत नाही तोपर्यंत ही मंडळी पाणीच पीत नाहीत. अशांनी दर तासाला चक्क गजर लावावा. गजर वाजला की एक पेला पाणी प्यायचे अशी सवय लावा.

पाण्याची चव बदला :

अनेकांना पाण्याची चव आवडत नाही. अशा वेळी प्युरिफायर केलेले पाणी प्या किंवा किंचित गार पाणी प्या. अशा पाण्याची चव चांगली लागते किंवा पाण्यात लिंबू पिळा किंवा फळांच्या फोडी पाण्यात घालून ते पाणी प्या. वाळा, पुदिन्याची पाने यांचाही तुम्ही पाण्याची चव बदलण्यासाठी वापर करू शकता.

जलप्रचूर आहार घ्या :

पाणी पिण्यासोबतच अशी फळे जरूर खा ज्यात पाणी भरपूर प्रमाणात आहे. टरबूज, कलिंगड, काकडी अशी फळे या मोसमात खूप येतात. त्यांचा आपल्या खाण्यात समावेश करा.

अतिरेक नको :

जास्त पाणी प्यायल्याने सतत मूत्रविसर्जनास जावे लागते. त्यामुळे दिवसभरात खूप पाणी प्या. पण झोपण्यापूर्वी काही तास पाणी पिणे थांबवावे.

उच्च रक्तदाब किंवा पाय सुजणे आणि काही हृदय विकार असलेल्या लोकांनी जास्त पाणी पिऊ नये. किडनीच्या त्रासाचा इतिहास असेल, किंवा तुम्ही ट्रान्सप्लान्ट केले असेल तर पाण्याच्या सेवनाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सौजन्य:- चिरायू, सामना.

No comments: