Wednesday, March 02, 2011

शक्ती! भक्ती!! युक्ती!!!

तानाजीराव मालुसरे, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर सावरकर हे शक्ती, भक्ती आणि युक्तीचे खंदे पुरस्कर्ते. या तीन पुरुषोत्तमांना मराठी राजभाषा दिनी स्मरणांजली!

महाराष्ट्र पराक्रमी योध्यांचे, महान संतांचे आणि श्रेष्ठ स्वातंत्र्यवीरांचे महान राष्ट्र! ३५० वर्षांपूर्वी शक्ती, भक्ती आणि युक्ती या त्रिसूत्रींचा योग्यरीत्या वापर करून महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्यावर हिंदुस्थानातील हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. २६ फेब्रुवारीला नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी, रामदास नवमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुण्यदिन असा शक्ती, भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी योग जुळून आला होता! त्या तीन पुरुषोत्तमांना ही छोटीशी आदरांजली!


तानाजी मालुसरे मूठभर मिश्यांचा आणि परातीएवढ्या छातीचा महाराजांचा खेळगडी. महाडजवळील उमरठ हे तानाजीरावांचं गाव. उमरठचा मारुती आणि ग्रामदैवते मालुसर्‍यांना प्रसन्न होती. म्हणून तानाजीराव महाराजांचे खास मर्जीतील उमराव होते. तानाजीराव आरंभापासून स्वराज्याच्या कार्यात महाराजांसोबत होते. अफझलखान मोहीम, संगमेश्‍वरातील सूर्यराव सुर्व्यांची नाकाबंदी अशा महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या तानाजीरावांनी लीलया पेलल्या होत्या. कोकणातील रस्तेबांधणीच्या कामातही त्यांचा सहभाग होता. असे हे तानाजीराव आपल्या मुलाचं लगीन सोडून सिंहगडाचं लगीन लावण्याकरिता मोहिमेवर निघाले. (इतिहासतज्ज्ञांच्या मते कोंढाण्याचे नाव सिंहगड हे तानाजीरावांना वीरगती मिळण्यापूर्वीपासूनचे आहे) तर हा सिंहगड सर करून स्वराज्यात सामील करण्याकरिता तानाजीराव, सूर्याजीराव, शेलारमामा, पाचशे मावळ्यांनिशी नवमीच्या काळ्याकभिन्न रात्री डोणागिरीच्या कड्याला भिडले. दोन तरबेज मावळे प्रथम कडा येंगून वर गेले. वर पोहोचताक्षणी त्यांनी खाली दोर सोडले. तानाजीराव, सूर्याजी, शेलारमामा व इतर मावळे वर चढू लागले. स्वा. सावरकर तानाजीरावांच्या पोवाड्यात लिहितात, ‘तानाजी चढू लागले, स्वातंत्र्य चढू लागले!’ वर पोहोचताच क्षणी हर हर महादेवच्या आरोळ्या ठोकत मावळे, तानाजीराव उदयभान व मुघलांवर तुटून पडले. एकच रणकंदन माजले. शिवशाहीर म्हणतात, ‘तुटून पडली वीज विजेवर, वादळ-वणवा पिसाटला।’ आणि घात झाला उदयभानचा वार वर्मी लागून तानाजीराव धारातीर्थी पडले. संयम सुटलेल्या, घाबरलेल्या मावळ्यांना एकत्र करून विस्कटलेला डाव सूर्याजी आणि शेलारमामांनी जिंकला! सिंहगडावर भगवा फडकला. तानाजीरावांनी आणि मावळच्या पोरांनी आपल्या शक्तीच्या सामर्थ्यावर दिल्लीवाल्यांवर जरब बसवली आणि दिल्लीवाल्यांना बजावले, ‘मराठ्यांची पोरे आम्ही भिणार नाही मरणाला’ स्वत: महाराज तानाजीरावांना श्रद्धांजली अर्पण करण्यास जातीने उमरठ्यास आले. चितेवर शांतपणे पहुडलेले तानाजीराव महाराजांना म्हणत होते, ‘येतो महाराज, राग-लोभ नसावा, आपल्या भगव्या झेंड्याचा शिलेदार तानाजी मालुसरे! (दि. ४ फेब्रु. १६७०) तानाजी मालुसर्‍यांच्या शक्तीला त्यांचा पुण्यदिनी मानाचा मुजरा!

भक्तीपंथातील श्री समर्थ रामदास केवळ एक व्यक्ती नव्हती, ती एक सामाजिक आणि राजकीय चळवळ होती. भक्तिमार्ग आचरताना शुद्ध उपासना, विमळज्ञान, वैराग्य, ब्राह्मरक्षण व गुरुपरंपरा ही पाच आध्यात्मिक लक्षणे समर्थांनी सांगितली. भिक्षेच्या माध्यमातून १० ते २० वयोगटातील अनेक मुलांना समर्थांनी दीक्षा देऊन राष्ट्रीय पातळीवर एक संघटना उभारली. अकराशे मठ व चौदाशे महंतांचे जाळे हिंदुस्थानभर विणले व भक्तिमार्गाने हिंदुत्वाच्या वाढीचा ध्यास घेतला. भक्तीबरोबर रामदासांचा थोडाफार राजकारणाशीही संबंध आला. शिवाजी महाराजांना आदराने संबोधून समर्थ लिहितात, ‘देव ब्राह्मण आचारविचार। कित्येक जनासी आधार। सदा घडे परोपकार। देणे ईश्‍वराचे॥

क्षात्रधर्माविषयी लिहितात, ‘देव मस्तकी धरावा। अवघा हलकल्लोळ करावा। अशा आकंठ रामभक्तीत बुडालेल्या समर्थांस रामदासनवमीनिमित्त साष्टांग दंडवत।

विश्‍वात फक्त आहेत,

विख्यात बहाद्दर दोन,

जे आईकरता गेले,

सागरास पालांडून हनुमंतानंतर आहे या ‘विनायकाचा’ मान.

आपल्या युक्तीने ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या स्वा. वि. दा. सावरकरांना त्यांच्या पुण्यदिनी (२६ फेब्रुवारी १९६६) शतश: प्रणाम.

स्वाभिमान ठेवा, सैनिक व्हा, विज्ञाननिष्ठेने राहा, हिंदुस्थान अखंड करून जगात एक मोठे राष्ट्र म्हणून त्यास सन्मान प्राप्त करून द्या, हा त्यांचा संदेश कृतीत आणणे हीच त्यांना खरी आदरांजली.

सौजन्य - संदीप विचारे, (दै. सामना मधील लेख)

No comments: