Saturday, February 12, 2011

कॉर्पोरेट मंत्र - उगाच

माणूस आणि मशीन यात फारसे अंतर राहिलेले नाही. मशीनला हातपाय लावून माणसाने रोबो तयार केला, पण आज तोच माणूस एक रोबो होऊन बसलाय. सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्व काही तांत्रिक. पक्ष्यांचे आवाज, कोंबड्याचे आरवणे, सूर्योदय, समुद्राचा खळखळाट, रखरखीत ऊन, फुलांचा सुवास, पाऊलवाटेचा प्रवास, हाताने लिहिलेले पत्र या सर्व गोष्टींशी या पिढीचा अजिबात संबंध नाही. कवितांच्या जुन्या पुस्तकात किंवा साहित्य संमेलनाच्या ४-५ दिवसांतच या गोष्टींचा उल्लेख आढळतो. परीक्षेत ‘कारण सांगा’ या प्रश्‍नाचे उत्तर दिले की, खूप मार्क मिळायचे, पण आज आपण याच प्रश्‍नाचे उत्तर देऊन देऊन आयुष्याची प्रयोगशाळा बनवली आहे. प्रत्येक जण प्रत्येकावर प्रयोग करून कारणे शोधत असतो. जीवन ही ‘विज्ञान लॅब’ झाली की, माणूस हा फक्त एक शरीर म्हणून जाणला जातो. पैसा, फायदा, बँकेचे हफ्ते, विमा, संसाराचे गाडे हा गदारोळ अनुभवताना माणसाचे तांत्रिक वागणे अगदी सहजपणे दिसून येते. जगात जागतिकीकरणामुळे जग जवळ आले, पण माणसाच्या तांत्रिकीकरणामुळे माणूस माणसांपासून दुरावला. बोलण्यासाठी, चालण्यासाठी, उठण्यासाठी, बसण्यासाठी, मागण्यासाठी, भेटण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आपण कारण मागतो आणि सांगतो. कुटुंब, सहकारी, बॉस, नातेवाईक कुणालाही आपण ‘‘का?’’ या गळफासातून सोडत नाही. हल्लीच एका मैत्रिणीचा फोन आला. कुठे चाललीस? या प्रश्‍नाचे उत्तर मी फार साधेपणाने दिले. मी म्हणाले, ‘‘जवळ एक देऊळ आहे तिथे चालले.’’ त्यावर तिने मला विचारले ‘‘का?’’ या ‘का’चे उत्तर मी काय द्यावे हे तेव्हाही कळले नाही आणि आजही कळत नाही. जरा चिमटा काढून पहा, ‘‘मी जगत आहे ना?’’ हा प्रश्‍न विचारा जरा स्वत:ला. मशीन होऊ नका. जेव्हा तुमच्या जीवनात तुम्ही स्वत:ला विचारलेल्या प्रत्येक ‘‘का?’’चे उत्तर मिळेल तेव्हा समजा तुम्ही ‘मशीन’ झाला आहात. जगण्याची सामग्री जमवताना जगणेच राहून गेले तर देवाच्या आयुष्यनामक देणगीचे लोणचे घातले असेच होईल ना. काहीतरी उगाच करा. मित्रांना भेटायला, कुणाला मदत करायला, थोडे हसायला, शांत झोपायला, गाणे येत नसले तरी गुणगुणायला, जवळच्या व्यक्तीची आठवण काढायला, ऑफिस सुधारण्याचा विचार करायला, शून्यात जायला कारण लागत नाही. हे सगळं उगाच करू शकतो आपण. भजी खायला पाऊस पडलाच पाहिजे असे नाही. तसेच जगण्यासाठी कारण लागत नाही. प्रेम करा, उगाच. स्वप्न पहा, उगाच. कधीतरी ई-मेल न करता हाताने पत्र लिहून पहा. थोडा वेळ जाईल, पण करून पहा हे, उगाच. कारणे शोधणारे मशीन नका होऊ.


‘‘जरा जगून पहा, उगाच’’.

- स्वप्ना पाटकर
dr.swapnapatker@gmail.com
सौजन्य : एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

No comments: