Saturday, February 19, 2011

एक क्षण-एक आयुष्य

‘टाईम इज मनी’ म्हणजेच ‘वेळ हा पैशासारखा’ ही म्हण प्रत्येकालाच पटते. प्रत्येक जण जीव आटवून वेळ आणि पैसा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठेही वेळ मोडायला नको म्हणून एक काम संपत नाही तेवढ्यात दुसर्‍या कामाच्या तयारीला आपण लागतो. घड्याळाचे काटे फिरतात तसे आपणही फिरतो. सगळे काही वेळेत झाले तर सर्व काही नीट असे समजून आपण ‘वेळेतच सगळं’ हवे या अट्टहासाचा डोंगर खांद्यावर घेऊन वणवण फिरतो. इथून सुरू होतो वेळ घालवण्याचा प्रवास. वेळ वाचवणे ही इच्छा व सवय म्हणून चांगले. पण ओझे झाले की वेळ जास्त वाया जातो. अनेकदा कुठेतरी पोहचायचे असताना ट्रॅफिक लागला की आपला पारा चढतो. वैताग,चीडचीड आपला ताबा घेते. घाईत चालताना चुकून एखाद्याचा धक्का लागला तरी मानहानी झाल्यासारखे आपण समोरच्या वर तुटून पडतो. या अशा चीडचिडीत अपशब्दांचा गोळीबार करून आपण आपलाच स्तर खाली पाडतो. तसेच बॉसने काहीतरी चूक दाखवली, आईवडिलांनी प्रश्‍न विचारले, सहकार्‍यांनी सल्ला दिला किंवा काहीही मनाला न पटणारे वाटले की आपण शोलेतला गब्बरसिंग होण्यात अजिबात वेळ घालवत नाही. विचार, मन आणि जिभेचे नाते तोडून जे तोंडी येईल ते बोलतो. आपण आपला विचार सोडून देतो या परिस्थितीत. खरं तर बर्‍याचदा ज्यांच्यावर आपण रोषाचा पाऊस पाडत असतो त्यांना त्याची कल्पनाही नसते. प्रचंड त्रासाच्या भट्टीत जळतो फक्त आपणच. चांगले काही घडले की आयुष्य फार वेगात असल्यासारखे वाटते आणि जड प्रसंगात जीवन अगदी कासवपावलांनी सरते असे भासते. या सर्वाचा अर्थ एकच, आयुष्य तेवढेच. ते आपण कसे घालवायचे ते आपणच ठरवतो. येणारा प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा ठरवला तर या जीवनाचे नंदनवनच होईल. छोटे क्षण जेव्हा अनुभवांच्या धाग्यात गुंफले जातात तेव्हा आयुष्याचा हार तयार होतो. प्रत्येक येणार्‍या अनुभवाला चांगल्या नजरेने पहा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुम्ही चीडून घालवलेला एखादा क्षण तुमच्या प्रिय व्यक्तीचा, आईवडिलांचा, मुलांचा, कामाचा नक्कीच असेल. प्रत्येक क्षण जगा. जळू नका. रागात, द्वेषात घालवू नका.


‘‘कारण टाईम इज मनी.’’

एक क्षण पुरे मला आयुष्य पाहण्यासाठी

एक क्षण पुरे मला आयुष्य जगण्यासाठी

एक क्षण पुरे मला आयुष्य समजण्यासाठी

पण एक पूर्ण आयुष्य हवे मला ‘‘एका क्षणासाठी’’

‘‘प्रत्येक क्षणात आयुष्य जगा.’’


सौजन्य - लेखक स्वप्ना पाटकर

No comments: