Sunday, February 20, 2011

कोलेस्टेरॉल

आपण सर्वजण जाणतोच की आज उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाघात, स्ट्रोक (मेंदू आघात) या व्याधी अचानकपणे व तरुणांनाही होत आहेत. वरवर पाहता या व्याधी अचानकपणे होत आहेत असे वाटले तरी याची कारणे शरीरात खूप आधीच खोलवर रुजलेली असतात. केवळ त्या व्यक्तीस स्वत:स काहीही त्रास होत नसतो म्हणून त्या कारणांकडे दुर्लक्ष केले जाते. यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल हे होय.


कोलेस्टेरॉल हे त्याच्या घनतेनुसार उच्च घनतेचे, कमी घनतेचे व अत्यंत कमी घनतेचे असे तीन प्रकारचे असते. यापैकी उच्च घनतेचे कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल समजले जाते. कारण हे आपले हृदयविकाराच्या झटक्यापासून संरक्षण करीत असते. म्हणून याचे रक्तातील प्रमाण वाढवणे आवश्यक असते.

याउलट इतर प्रकारचे कोलेस्टेरॉल हे रक्तवाहिन्यांत अडथळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे त्याचे वाढलेले प्रमाण नकळतपणे हृदयविकार उत्पन्न करू शकते. याचे रक्तातील प्रमाण वाढू नये यासाठी यकृत अहोरात्र कार्य करीत असते.

साधारणत: दहा टक्के व्यक्तींतील कोलेस्टेरॉल हे अनुवंशिकतेमुळे वाढलेले असते. तसेच काही व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉल हे मधुमेह किंवा हायपोथायरॉईडीझममुळे वाढलेले असते. परंतु बहुतेक व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉल हे एक तर आहारातील चुकांमुळे वाढलेले असते किंवा धूम्रपानामुळे वाढलेले असते. यासोबतच उच्च रक्तदाबासाठी वापरली जाणारी काही औषधे, तसेच हार्मोन्सची औषधे यामुळे देखील रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्यास सुरुवात होते.

बहुतांशी शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याची कोणतीही लक्षणे रुग्णास जाणवत नाहीत. तरीही काही रुग्णास चक्कर येणे, चालताना तोल जाणे, बोलताना अडखळणे, अशक्तपणा जाणवणे, हातापायांना मुंग्या येणे, छातीमध्ये दुखणे, काही वेळ अंधूक दिसणे, चालताना पोटर्‍या दुखणे, भोजनानंतर पोटात दुखणे अशी लक्षणे जाणवतात.

रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी धूम्रपानावर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. यासोबतच आहारात अक्रोड व जवस यांचा समावेश केल्याने चांगले कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकाराच्या आघातापासून आपला बचाव होतो. यासोबत आहारातून शरीरात जाणारे कोलेस्टेरॉल थांबविण्यासाठी संपूर्ण आवश्यक कॅलरीजपैकी 30 टक्क्यांपेक्षा कमी कॅलरीज या स्निग्ध पदार्थातून घेणे आवश्यक आहे. यासाठी तज्ज्ञ आयुर्वेदीय डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ज्या व्यक्तींचे अनुवंशिकतेमुळे कोलेस्टेरॉल वाढले आहे, अशा व्यक्तींना केवळ आहारावरील नियंत्रण पुरेसे नसते अशा व्यक्तींनी लसूण, लॉकी व हळद एकत्रितपणे दररोज घेणे हितकर आहे. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो, म्हणून रक्तातील कोलेस्टेरॉल हे 150 एम.जी./ डीएलपेक्षा कमी असणे हितकर असते. ज्या व्यक्ती मद्य सेवन करतात त्यांनी हा नियम अधिक कटाक्षाने पाळणे क्रमप्राप्त आहे.

ज्याप्रमाणे आपण आपला रक्तदाब व रक्तातील साखर यांच्या नियंत्रणाच्या बाबतीत जागरूक असतो, तितकेच आपण कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याविषयी जागरूक असले पाहिजे.

ज्या व्यक्तींनी वयाची चाळीशी ओलांडली आहे अशा प्रत्येकाने व ज्या व्यक्तींना अनुवंशिकतेमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता आहे त्यांनी वयाची 25 वर्षे उलटली असता कोलेस्टेरॉल तपासून ते नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. या छोट्याशा उपचारामुळे भविष्यातील मोठे आजार प्रतिबंधित होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी डॉ. ओंकार शहापूरकर, शिवनेरी सेवा मंडळ, दादासाहेब फाळके रोड, गोल्डमोहर मिल कंपाऊंडसमोर, जुनी शिंदेवाडी, दादर-पूर्व, 9823311375, 9823185552 येथे संपर्क साधावा. आयुर्वेदात अनेक गुंतागुंतीच्या आजारांवर आणि रोगांवर प्रभावी उपाय आहेत पण त्याकडे आपण गंभीरपणे बघणे जरुरीचे आहे.

सौजन्य  :- एक मराठी माणसाचे स्वताचे वृत्तपत्र.

No comments: