Thursday, May 01, 2014

संधीवात

संधी भेटताच वाढणारा वात असं म्हटलं तर काही खोटं नाही. ‘अभी तो मैं जवान हूं।’ हे आजोबांनाच शोभून दिसतं, परंतु आता पंचविसाव्या वर्षांतच हाडांचा खुळखुळा झालाय.
असाच बत्तीस वर्षांचा तरुण, पण अगदी म्हातारपण आलेला सुधीर. कोणत्या सांध्यातून आवाज येत नसेल तर शपथ! सर्व सांधे तर दुखत होते, सोबत गंजलेल्या बिजागरासारखा करकर आवाज येत होता. त्याचा दोनदा अपघातसुद्धा झाला होता आणि भरीस भर कामाला पिझ्झा बॉय म्हणून. त्यामुळे खाण्याचीसुद्धा बोंबाबोंब, शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अंगाला सहचरादी तेल लावायला दिले. सोबत वात कमी करणारी, हाडांना बळकटी देणारी औषधं सुरू केली. खराब वात बाहेर काढेल आणि हाडांचे पोषण करील असे २१ दिवस दुधाचे बस्ती केले. तेल लावल्यामुळे सांध्यांना वंगण तर मिळालेच त्याचप्रमाणे बस्तीमुळे हाडांना मजबुती मिळाली. त्याला पहिल्या बारा दिवसांतच बरं वाटायला लागलं. साडेतीन महिन्यांनंतर तो संधीवाताचे दुखणे विसरला.
आजकाल आईवडील लहान मुलांच्या वजनाकडे जास्त लक्ष देताना जाणवतात. टीव्हीवर दाखवणार्‍या बंद डब्यातील खाद्यपदार्थांमुळे मुलांचे वजन तर वाढतंच, परंतु नुसता मेद (फॅट) वाढून पुढे हाडांचे पोषण होत नाही. असाच अनुभव पवार कुटुंबाला आला. सात वर्षांचा मुलगा. पहिल्या तीन वर्षांमध्ये डबाबंद खाद्यपदार्थ. वजन वाढलं, पण ते वजन सहन करणारी हाडं मात्र पोकळ राहिली. या सर्वांमुळे त्याला संध्याकाळी ताप येऊन अंग दुखायचं. त्याला शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मेद पचवणारी औषधं दिली. तेल लावून घाम काढला व सात दिवस काढ्याचे बस्ती दिले. आठव्या दिवशी अडीच किलो वजन कमी झाले. मेद पचून हाडांना मजबुती मिळाल्याने ८० टक्के फरक पडला.
अनुभवाचे बोल
चाळीतल्या कुलकर्णी आजोबांची नुकतीच पंचाहत्तरी साजरी केली. सगळ्यांच्या आग्रहाखार त्यांनी सांगितलेले गुपित तुम्हाला सांगतो :
- आंघोळीपूर्वी अंगाला तिळाचे तेल लावणे.
- आठवड्यातून एकदा रात्री झोपताना दुधातून २ चमचे एरंडेल घेणे.
- संध्याकाळी भूक नसल्यास जेवण न करता दूध पिणे.
- दररोज सकाळी १५ मिनिटे दीर्घश्‍वसन.
यालाच म्हणतात,
‘ओल्ड इज गोल्ड’.
- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य :- फुलोरा, सामना ०१०५१४

No comments: