Tuesday, July 05, 2011

सोशल नेटवर्किंगच्या जाळ्यात

याहू मेसेंजर, आर्कुट, फेसबुक, लिंकेडीन यांसारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सच्या जाळ्यात अडकणार्‍यांंची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. विवाहविषयक नोंदणी तसेच नोकरीविषयक माहिती या सोशल नेटवर्किंगमुळेच मिळत असते. परंतु, गेल्या काही वर्षांत या नेटवर्किंगमुळे अनेकांची फसवणूकही झाली आहे. अनेक सायबर गुन्हेगार याच नेटवर्किंगचा वापर करून लोकांना फसवतात. म्हणूनच फेसबुक, आर्कुटवर स्वत:चे अकाऊंट बनवताना या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.


गेल्या काही दिवसांत लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे फेसबुक अनेक प्रकारे विविध सायबर गुन्ह्याच्या विळख्यात सापडले आहे. अगदी फेसबुकवरील पासवर्ड किंवा फेसबुकवरून तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी होण्यापर्यंत असे एक ना अनेक सायबर गुन्हे ‘सोशल नेटवर्किंग’च्या माध्यमातून घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंगमध्ये आपण आपली महत्त्वाची माहिती त्या संकेतस्थळावर ठेवतो व त्यानंतर या संकेतस्थळावर भेट देणारे इतर त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीशी संपर्क करतात. बहुतांशी वेळेस अनेक लोक आपली सर्व खरी माहिती अगदी आपल्या फोटोसहित या संकेतस्थळावर ठेवतात. त्यामुळे सराईत गुन्हेगार या माहितीचा गैरवापर करून अनेक फसवणुकीचे गुन्हे करतात. ‘आर्कुट’ या संकेतस्थळावर बदनामीकारक मजकूर छापून एकमेकांची बदनामी करणारे अनेक गुन्हे आज दाखल आहेत. विशेषत: महिलांच्या बदनामीचे याहू मेसेंजरवरील चॅटिंगचा वापर करून अनेक गुन्हेगार विविध प्रकारचे ई-फ्रॉडस् (हॅकिंग) गुन्हे तर करतातच, त्याचबरोबर ते समोरील व्यक्तीचे आर्थिक नुकसानदेखील करतात.

‘सोशल नेटवर्किंग’ हे खरे तर आजच्या संगणक युगाला मिळालेले एक वरदान आहे. परंतु त्याचा अयोग्य व बेजबाबदार पद्धतीने वापर केल्यास मात्र आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. ‘सोशल नेटवर्किंग’च्या संकेतस्थळांचा वापर करताना खालील काळजी घ्यावी.

- ‘सोशल नेटवर्किंग’च्या माध्यमातून आलेल्या ई-मेलला उत्तर देताना काळजीपूर्वक उत्तर द्यावे. जर तो ईमेल तुमच्या ओळखीचा असेल तरच उत्तर द्यावे. ई-मेलमधील लिंकवरील संकेतस्थळावर क्लिक करू नये.

- अनोळखी व्यक्तींना तुमच्या मित्र-मैत्रिणींचे ई-मेल ऍड्रेस देणे सहसा टाळावे.

- जर एखादे संकेतस्थळ तुमच्या ईमेल ऍड्रेस बुकला स्कॅन करण्याची मागणी करीत असेल तर ते टाळावे.

- ‘सोशल नेटवर्किंग’ अथवा चॅटिंग करताना समोरील व्यक्तीची पूर्ण माहिती मिळाल्यावरच त्याच्याशी कोणत्याही माहितीची देवाणघेवाण करावी.

- ‘सोशल नेटवर्किंग’च्या संकेतस्थळावर आपली संपूर्ण माहिती देणे टाळावे. तसेच कमीत कमी संकेतस्थळांचा वापर करावा. आपला फोटो अगदी गरज असेल तरच अपलोड करावा.

- आपल्या कार्यालयात ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळाचा तसेच ऑनलाइन चॅटिंगचा वापर शक्यतो टाळावा.

- सर्वात महत्त्वाचे पालकांनी आपली मुले ‘सोशल नेटवर्किंग’ व ‘ऑनलाइन चॅटिंग’चा व्यवस्थित वापर करीत आहेत का हे बघितले पाहिजे.

- आपला सोशल नेटवर्किंगचा ‘युजर आयडी’ व पासवर्ड चुकूनही कोणालाही शेअर करू नये.

- सोशल नेटवर्किंग स्थळावरील आपली प्रोफाईल शक्यतो आपल्या ओळखीच्या किंवा मित्रमैत्रिणींनाच व्हिजीबल ठेवावी व तिला पब्लिक अर्थात सर्वांसाठी ओपन ठेवू नये.

- फेसबुक किंवा ऑर्कुटवरील जाहिरातीवर काळजीपूर्वक वाचूनच क्लिक करावे. अगदी फेसबुक किंवा ऑर्कुटचा लोगो असलेली एखादी जाहिरातदेखील न विचार करता उघडू नये.

Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना ०५०७२०११.

No comments: