Tuesday, July 19, 2011

निसर्गाचे आव्हान


महाराष्ट्राला एक अशी दिव्य भूमी लाभलेली आहे, जी परशुरामांच्या परशु मुळे निर्माण झाली आहे. परशुरामांनी (श्री विष्णू अवतार) आपल्या  परशु ने समुद्राला मागे ढकलून एका निसर्ग रम्य भूमीची निर्मिती केली जिचे नाव आहे 'कोंकण'.

पुराणा नुसार भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी हि कोंकण भूमी म्हणून ओळखली जाते. आणि हो, मुंबई पण कोकणचाच भाग आहे. तर असे हे कोकण डोंगर दर्यांमध्ये वसलेले.


मी लहान असताना आम्ही एक दोनदा कोकणात गेलो होतो. अर्थात ते वय अजाण होत. त्यानंतर १९९४ पासून आम्ही सतत पाच वर्षे कोकणात (गावी) जात होतो. तोपर्यंत कोकणात जाण्यासाठी फक्त एस. टी. चीच सोय होती, व त्या सर्व रात्री सुटत असत. पण त्या प्रवासाची मजा काही औरच असायची. मी गावी जाताना रात्रभर जागा राहून घाट रस्त्यावरील वाहनांची जुगलबंदी बघत बसायचो.
त्यानंतर अशक्य वाटणाऱ्या अश्या डोंगर दर्यातून कोंकण रेल्वेचा मार्ग बनविण्याची संकल्पना प्रशासनाने पुढे आणली होती. ते काम तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आले. मग फक्त रोह्या पर्यंत असणारी मध्य रेल्वे प्रथम रत्नागिरी, नंतर मडगाव व अखेर मंगलोर पर्यंत धावू लागली. अर्थात, तो पर्यंत कोंकण रेल्वे ने बांधलेल्या बोगद्यांचा व पुलांचा बराच गाजावाजा झाला होता. ते बोगदे व पूल बांधताना बरेच मजूर पण गतप्राण झाले होते.
कोंकण रेल्वे सुरु झाल्यावर बरेचसे लोक जे पूर्वी कोंकणात जाण्यास टाळत असत ते हि निसर्ग  दर्शन घेण्यासाठी कोंकणात जाऊ लागले. एक मात्र आहे रेल्वे जिथे जाईल तिथे प्रगती बरोबर प्रदूषण हि जाते.

कोंकणातील डोंगर जे पूर्वी स्वातंत्र्य अनुभवत होते त्यांचा पोटातून आता धूर ओकत रेल्वे धाऊ लागली. कोकणातील जमिनींना अचानक मागणी वाढू लागली. कोकणातील जनता (तो पर्यंत सर्व मराठीच होते), जी आपसा आपसातल्या दुही मुळे कोकणात होणार्या प्रगतीचा फायदा उचलू शकली नाहीत, तिथे आता परप्रांतीय येऊन आपला धंदा करू लागले.

तर कोंकण रेल्वे सुरु झाल्या पासून एक गोष्ट मात्र सातत्याने घडत आहे. दर पावसाळ्यात को. रे.  मार्गावर दरडी कोसळणे व भूस्खलन होत आहे.

दरडी कोसळल्या मुळे झालेला सर्वात प्रथम अपघात झाला होता तो बांद्रा - मडगाव या सुट्टी विशेष गाडीला. खरे तर तो पर्यंत को. रे. पावसाळी वेळापत्रक बनवत नव्हती व सर्व गाड्यांचा वेग जास्तच होता. त्या रात्री हि गाडी कोंकण कन्या गाडीच्या मागे पंधरा मिनिटांनी धावत होती, व ढिली झालेली दरड या गाडीवर कोसळली होती. त्या गाडीची ती सुट्टी विशेष शेवटची फेरी होती. पण अशी दरड कोसळल्या वर सर्वात जास्त धसका घेतला तो पश्चिम रेल्वने, त्यांनी परत अशी गाडी आता सोडली आहे, बऱ्याच वर्षांनी .

तर मुद्दा असा कि, त्या नंतर को. रे. ने पावसाळी वेळापत्रक बनवण्या पासून ते सुरक्षा धागा, चेक इंजिने फिरवणे, संरक्षक भिंत बांधणे असे बरेच उपाय योजले, तरी पण माणूस निसर्गाचे आव्हान थोपवू शकत नाही हीच आजची सत्य परिस्थिती आहे.
निसर्ग दर पावसाळ्यात को. रे. पुढे आव्हान उभे करत आहे. अर्थात हे सर्व आता आपल्याला समजत आहे. पण इतकी वर्ष तिथे भूस्खलन होतच असणार व त्या मध्ये बऱ्याच गावांचा संपर्क तुटला असणार, काही गाव नष्ट हि झाली असतील. त्यामुळे इतके वर्ष कोंकण दुर्लक्षित का होते याचा हि विचार व्हायला हवा.
निसर्गाची कृपा दृष्टी अजूनही कोकणावर आहे, तिथे आजही महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो, पण आज पर्यंत ना प्रशासनाने ना तिथल्या लोकांनी अश्या काही उपाय योजना केल्या ज्यामुळे पाणी जतन करून ठेवता आले असते.

तर यातून एकच गोष्ट दिसून येते कि, जरी मानवाने तंत्रज्ञानाच्या जोरावर कितीही प्रगती केली व कितीही शक्ती मिळवली, तरी तो निसर्गाच्या शक्ती पुढे, निसर्गाच्या आव्हान पुढे थीटाच  राहणार.

No comments: