Tuesday, July 19, 2011

चातुर्मास

आषाढ शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा चार महिन्यांच्या कालावधीत आजही अनेक जण ‘चातुर्मास’ पाळतात. पिझ्झा, बर्गर, नॉनव्हेजच्या काळात आजची पिढी खूप चंगळवादी बनत चालल्यामुळे व्रतवैकल्यांचा त्यांना विसर पडला आहे. नुसता श्रावण पाळायचा ठरवला तरी पंधरा दिवसांनी अनेकांचा धीर सुटतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण खरंतर असा चातुर्मास पाळायला हवा. सोमवारपासून चातुर्मासाला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने...


हिंदुस्थानी संस्कृती आणि आरोग्य याची सांगड ठिकठिकाणी पाहायला मिळते. पावसाळ्याच्या दरम्यान हा ‘चातुर्मास’ येतो. पावसाळ्यात आपल्या शरीरातील जठराग्नी मंदावत असतो. यामुळे पोटाला आराम मिळावा या हेतूने हा ‘चातुर्मास’ खूप आवश्यक आहे. चातुर्मासात मांसाहार, कांदा लसुणयुक्त पदार्थ वर्ज्य असतात. हे पदार्थ पचण्यास जड असल्यामुळे हा प्रघात पडला असवा. तसेच एकवेळ भोजन, एका दिवसाआड भोजन अशी जेवणाशी संबंधित व्रतवैकल्ये या काळात जास्त आहेत.

धार्मिक महत्त्व

आषाढातील देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून ही ‘शयनी’ एकादशीही समजली जाते. याच काळात ब्रह्मदेवाचे सृजनाचे काम जोरात चालू असते. पावसामुळे धरती हिरवीगार झालेली असते. शेतामध्ये पिकं बहरायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे हा काळ सृजनाचा म्हणून ओळखला जातो.

वर्ज्यावर्ज्य
अ. वर्ज्य : १) प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळूंग, वैश्‍वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पन न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निंबीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ. २) मंचकावर शयन : ३) विवाह किंवा अन्य तत्सम शुभ कार्य ४) चातुर्मास्यात वपन वर्ज्य सांगितले आहे. म्हणजेच चार महिने, निदान दोन महिने तरी एकाच ठिकाणी राहावे.


आ. अवर्ज्य : चातुर्मास्यात हविष्यान्न सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातले मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी, इत्यादी पदार्थ हविश्ये मानतात. (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)


वैशिष्ट्यपूर्ण व्रते


* पर्णभोजन व्रत : पानावर जेवण करणे.


* एकभोजन : एकावेळेस जेवणे.

* अयाचित : न मागता मिळेल तेवढेच जेवणे. एकदा जेवण वाढल्यानंतर पुन्हा मागून न घेण्याच्या या व्रातामध्ये मोजकं खाण्यावर भर दिलेला आहे.

* मिश्रभोजन : सर्व पदार्थ एकदाच वाढून घेऊन त्याचा काला करून खाणे.

* धरणे-पारणे : यात एक दिवस भोजन व दुसर्‍या दिवशी उपवास.

दिवशी उपवास.

* एकधान्य : कित्येकजण या काळात एक किंवा दोन धान्यांपासून बनवलेले जेवण जेवतात.

सौजन्य:- देव्हारा, सामना १८०७२०११.

No comments: