काहीच कसे होत नाही? काहीच कसे सुचत नाही? काहीच का नाही मिळत किंवा देता येत? काहीच नाही? असे का? हा आपल्यासाठी काही नवीन प्रश्न नाही. आयुष्याच्या गदारोळीत गधामजुरी करून-करून माणसाला तणावाचे शिखर गाठायची वेळ आली की तो होतो ‘ब्लँक’ अगदी कोरा. पुढे मागे काहीच नसल्यासारखा, शून्यपूर्ण, तल्लीन वाटणार्या गृहस्थाला विचारले, ‘‘अरे काय विचार करीत आहेस?’’ तेव्हा तो म्हणतो ‘काहीच’ नाही. या काहीच नाहीचा अर्थ खरं तर ‘खूप काही’ असा असतो आणि ते एवढे जास्त असल्यामुळे काहीच कळत नसते. आपण आपल्या जगण्याला ‘सिनेमा’सारखे जगण्याचा प्रयत्न करतो. पहिला भाग म्हणजे जन्म, दुसरा भाग म्हणजे मृत्यू. खर्या जगण्याला मात्र मध्यांतर समजून आपण धावपळीत काढतो. पिक्चरच्या मध्यांतरात कुणी कुणी थंड, समोसा, चहा आणायच्या गडबडीत असतो तर कुणी शौचालयाच्या लाईनीत उभे राहून दर २ मिनिटाला घड्याळाकडे पाहत असतो. प्रत्येकाला घाई असते दुसरा भाग सुरू होण्यापूर्वी जागेवर बसण्याची. तसेच मरण येण्याआधी खूप काही करायचे असते म्हणून जीव आटवून आपण पार सुकून जातो. आपल्याला असलेल्या शांततेची गरज जेव्हा आपल्याला जाणवत नाही तेव्हा नैसर्गिकरीत्या ती शांतता आपल्या जीवनात येते. त्यालाच ‘‘ब्लँक’’ होणे असे म्हणतात. ब्लँक होणे वाईट नसून फायद्याचे आहे. कधी कधी याच अवस्थेत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. बरीच कोडी सुटतात. मन कोर्या पाटीसारखे होते. त्यावर नव्याने आपण हवे ते लिहू शकतो. पुढल्यावेळी ‘‘ब्लँक’’ झालात तर घाबरू नका. त्या अवस्थेचाही आनंद घ्या. मनाला थोडे आराम करू द्या.
एखादा ‘ब्लँक कॉल’ घरच्या फोनवर आला की, आपण जसे ‘हॅलो हॅलो’ ओरडत असतो. तसे या बाबतीत होऊ देऊ नका. शांत व्हा व शांततेचा उपभोग घ्या. कधीतरी होऊन पाहा ‘ब्लँक’.
- dr.swapnapatker@gmail.com
सौजन्य :- थर्ड जनरेशन, सामना २३०७२०११.
No comments:
Post a Comment