Tuesday, August 02, 2011

शिवामूठ - शिवामुठीची कहाणी

आषाढातल्या झिम्माड पावसानंतर ऊनसावलीचा खेळ मांडत श्रावण महिना डोकावतो. या महिन्यात चैतन्यमय वातारवणाबरोबरच सण-उत्सवांची मांदियाळी असते. स्त्रियांसाठी श्रावण महिना वैशिष्ट्यपूर्ण असतो. या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी नवविवाहित स्त्रियांनी शंकराच्या पिंडीवर शिवामूठ सोडण्याची प्रथा आहे. यामागे उमेने भोळ्या सांबाला प्रसन्न करून त्याच्याशी लग्न केलं आणि गिरिजात ती सुखासमाधानाने नांदू लागली, अशी धारणा आहे. यामुळे दर सोमवारी श्रावण महिन्यात नवविवाहिता पिंडीवर शिवामूठ सोडतात.


चूल आणि मूल या पूर्वापार चाललेल्या परंपरेमुळे स्त्रियांचा कल व्रतवैकल्ये करण्याकडे होता. हल्ली अर्थार्जनासाठी स्त्रिया बाहेर पडत असल्याने नाइलाजाने केलेल्या व्रतांमध्ये कित्येकदा शॉर्टकट मारला जातो. मात्र तरीही लग्नानंतर किमान पाच वर्षे शिवामूठ सोडण्याचे व्रत केले पाहिजे. श्रावण महिन्यात येणारे मंगळागौर पूजन व शिवामूठ पूजन ही स्त्रियांची महत्त्वाची व्रते आहेत. दर सोमवारी शिवामूठ सोडण्यात येते. प्रत्येक सोमवारी त्यासाठी वेगवेगळे धान्य वापरले जाते. आज पहिल्या सोमवारी शिवामूठ ही तांदळाची आहे.

ऑगस्ट महिन्यात पाच सोमवार येत असल्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी करण्यात येणारे शिवामूठ पूजन यावेळी पाच वेळा करण्याचा योग आहे. प्रत्येक सोमवारी नवविवाहित स्त्रिया सकाळी शंकर मंदिरातील पिंडीवर गंध, अक्षता, बेल, फूल वाहून त्यावर ही शिवामूठ सोडतात. तांदळानंतर तीळ, मूग, जवस, सातू अशा शिवामूठ क्रमाने पुढील प्रत्येक सोमवारी सोडायच्या आहेेत. या व्रताने घरात शांती, सुख, समृद्धी दीर्घायुष्य, आरोग्य चांगले राहावे ही संकल्पना आहे.

हिंदू धर्मातील प्रत्येक व्रतामागे एक कहाणी आहे. अशीच एक कहाणी शिवामूठ व्रताचीही सांगितली जाते. एक राजा होता. त्याला चार सुना होत्या. त्यापैकी तीन आवडत्या तर चौथी नावडती होती. नावडत्या सुनेला अत्यंत वाईट व अपमानास्पद वागणूक मिळत असे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी ती रानात गेली. येथे तिची नागकन्या व देवकन्यांची भेट झाली. त्या नियमित महादेवाच्या देवळात जाऊन शिवामूठ वाहत असत. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी असे केल्याने शंकरदेव प्रसन्न होऊन मनोस्थित कार्ये होतात. त्या नावडत्या राणीने तसे केल्याने शिवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित झाले. ही कहाणी पुराण काळातील असली तरीही त्यामागील श्रद्धाभाव, मेहनत, तपश्‍चर्येनंतर फलप्राप्ती होणे हे या काळातही तंतोतंत दिसते.

महत्त्व तांंदळाचे

आपल्या पूजापाठ कार्यात अक्षतांना अर्थात तांदळाला फार महत्त्व आहे. ‘अक्षता’ म्हणजे न तुटलेले म्हणजेच अखंड स्वरूपातील तांदूळ. या अखंड तांदळात थोडे पाणी व पिंजर घालून केलेले मिश्रण म्हणजे अक्षता. पूजेतील प्रत्येक कार्यात अक्षतांना महत्त्वाचे स्थान आहे. देवतांना अलंकार अर्पण करते वेळी म्हणायचा

मंत्र :

अक्षताश्‍च सुरश्रेष्ठ कुंकुमापता सुशोभित:।

मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्‍वर॥

...देवताभ्यो नम:। अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी।

असे असले तरी काही कारणाने एखादी गोष्ट उपलब्ध झाली नाही तर त्यावेळी अक्षता वाहून भक्तिभाव व्यक्त करता येतो. त्यासाठी अडून राहायचे नसते, अशी त्यामागे धारणा आहे. आपला देश हा शेतीप्रधान असल्याने तांदळाचे पीक बहुतांशी प्रामुख्याने घेतले जाते. तांदळाची सहज उपलब्धता होत असल्यानेही तांदूळ पूजेत अधिकांशी वापरला जात असावा.

- रामकृष्ण वि. अभ्यंकर
सौजन्य :- देव्हारा, सामना ०१०८२०११.

No comments: