Sunday, August 21, 2011

परदेशातील कृप्णभक्ती

न्यूझीलंडमध्ये ‘हरे कृष्ण’चा गजर, कॅनडामध्ये बाळकृष्णाचा पाळणा, पॅरिसमध्ये गंगाजल घालून दूध-मधाचा प्रसाद.... आश्चर्यकारक आणि तितकंच अद्भुत... हिंदुस्थानात मनोभावे साजरा होणारा कृष्णजन्माचा सोहळा इतरही अनेक देशांत उत्साहाने साजरा केला जातो. आज आपण कृष्णभक्तीने रंगलेल्या अशाच काही देशांची सफर करणार आहोत.


हिंदुस्थानी सण आणि परंपरा जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली आहे. सण, उत्सव यांच्या निमित्ताने होणारी उत्साही वातावरण निर्मिती अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. उद्यापासून सुरू होणार्‍या कृष्णजन्माच्या सोहळ्याचंही हेच वैशिष्ट्य आहे. हा सोहळा हिंदुस्थानात जितका भक्तिपूर्वक साजरा होतो, तसाच प्रयत्न इतर देशांतही केला जातो.

एसएमधली कृष्णभक्ती
कृष्णजन्माचा सोहळा अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियापासून ऑरलॅण्डोपर्यंत आणि मॅसेच्युसेट्सपासून न्यूयॉर्कपर्यंत सर्वत्र पहायला मिळतो. जन्मसोहळा मध्यरात्री होत असला, तरी त्या पहाटेपासून अमेरिकन भाविक एकत्र येतात. कृष्णजन्माचा आनंद अमेरिकन वातावरणात कधी पूजेच्या रूपात तर कधी मेजवानीच्या रूपात एकमेकांमध्ये शेअर केला जातो. यात हिंदुस्थानींप्रमाणेच अमेरिकन आणि युरोपीयनसुद्धा सहभागी होतात हे विशेष. बाळकृष्णाचा पाळणा बांधून गाणी आणि आरत्यांमध्ये रंगून जाणं हे दृश्य अमेरिकेच्या कृष्णाच्या मंदिरांमध्ये बघण्यासारखं असतं.


कॅनडामध्ये जन्माष्टमी

टोरोण्टोच्या राधाकृष्ण मंदिरात श्‍लोक आणि मंत्रांचा आवाज जन्माष्टमीचा उत्साह दर्शवून देत असतो. कृष्णभक्तीत जास्तीत जास्त भाविकांना रंगून जाता यावं यासाठी कॅनडातील काही संस्था विविध उपक्रम राबवत असतात. म्हणूनच जन्माष्टमीच्या दिवशी खास संगीत कार्यक्रम आयोजित करण्याकडे त्यांचा कल असतो. कॅनडातील भक्त कृष्णाचा पाळणाही राजेशाही पद्धतीने तयार करतात. फुलांच्या पाकळ्यांइतकेच लक्षवेधक असतात ते बाळकृष्णाचे दागिने आणि भरजरी कपडे. मॉण्ट्रिअलमध्ये कार्यरत असणार्‍या काही संस्था विविध कार्यक्रम आयोजित करून कृष्णाची गाथा सादर करण्यावर भर देतात. नाम संकीर्तनाच्या रूपात ही मंडळं जन्माष्टमीच्या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करतात.

पॅरिसमध्ये कृष्णलीला

पॅरिससारख्या फुलपंखी शहरातही कृष्णाची लीला पोहोचली आहे. इथल्या हिंदुस्थानींनी जन्माष्टमीच्या रूपात खर्‍या अर्थाने हिंदुस्थानी सणांची परंपरा जपल्याचं दिसून येतं. कृष्णजन्माच्या वेळी बाळकृष्णाला स्नान घालण्यासाठी खास हिंदुस्थानातून आणलेलं गंगाजल उपयोगात आणलं जातं. या गंगाजलामध्ये दूध, मध घालून त्याचा प्रसाद केला जातो. मोठ्या संख्येने भक्त या सोहळ्यासाठी हजर असतात.

सिंगापूरचा सोहळा

सिंगापूरमध्ये लक्ष्मी नारायणसारखी अनेक मंदिरं आहेत. त्यामुळे इथला जन्माष्टमीचा सोहळा अवर्णनीय असतो. सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक यांची इथे रेलचेल असते. मंदिरांना भक्तीचा रंग चढतो आणि त्याचे पडसाद रस्त्यारस्त्यावर उमटतात.

मलेशियाचा कृष्णमहिमा

भजन, पूजा, नाट्य, संगीत असा सुसज्ज बेत घेऊन मलेशियावासी कृष्णजन्मासाठी दरवर्षी सज्ज असतात. बाळकृष्णाचं स्नान असो, दर्शन असो किंवा प्रसादाची रेलचेल, मलेशियामध्ये सगळ्याच बाबतीत विशेष उत्साह दिसून येतो. इथे जन्माष्टमीचा घरगुती सोहळादेखील असतो आणि दर्शन, प्रसाद, जागरणासाठी एकमेकांच्या घरी जाण्याची पद्धतही आहे.

न्यूझीलंडचं कृष्णप्रेम

खणखणीत आवाजात शुद्ध संस्कृत मंत्रोच्चार यांनी कृष्णजन्माचा सोहळा न्यूझीलंडमध्ये सुरू होतो. पूजाअर्चा, नैवेद्य, प्रसाद यांमध्ये मग्न असणारे भक्त महाभारतातील प्रसंगांचं सादरीकरणही आवर्जून करतात. या सगळ्यात तरुणाईचा सहभाग विशेष असतो.

- सुरेखा घोगळे

No comments: