Tuesday, August 16, 2011

कॉर्पोरेट मंत्र - त्याग ृ स्वार्थ

माणसाला अनेक छंद असतात. त्यातलाच एक म्हणजे त्याग. त्याला महान बनायला फार आवडते. ‘मी याच्यासाठी हे सोडले, त्याच्यासाठी ते केले, त्यांच्यासाठी असं नाही केले, यांच्यासाठी तसे केले’ असे पोस्टर लावत फिरण्यात माणसाला मजा येते. आपण कसा त्याग केला, बलिदान केले व किती नुकसान आणि त्रास सोसला याचा जप करून कुढणे हा अगदी ‘हॉट फेवरेट’ खेळ झालाय सध्या. असे करून प्रत्येक जण आपापल्या अहंकाराला खत-पाणी घालत असतो. आपल्यातल्या ‘मी’चे पालनपोषण करीत असतो. पण हे सारे व्यर्थ आहे. त्याग म्हणजे स्वार्थ. आता तुम्ही विचार कराल स्वार्थ म्हणजे काय तर पहा. स्व अर्थ ृ स्वार्थ. एखाद्या भावनेला, कृतीला, परिस्थितीला आपण स्वत:चा अर्थ लावून पाहतो त्याला स्वार्थ म्हणतात. ‘काय करायला हवे?’ हा प्रश्‍न न विचारता ‘मला काय करायचे आहे?’ हा प्रश्‍न विचारता हाच स्वार्थ. आणि ते काही वाईट नाही. उलट आयुष्याच्या पहिल्या श्‍वासापासून ते शेवटच्या श्‍वासापर्यंत आपण प्रत्येक घडीला आपले अर्थ लावूनच हे जग पाहत असतो. स्वार्थापासून कुणाचीही सुटका नाही. मग महानपणाचे नाटक कशाला. ‘मी जे केले ते आनंदाने, स्वखुशीने आणि मनापासून केले’ हे म्हणायला जीभ जड होता कामा नये. तासभर चुलीसमोर उभे राहून आपल्या बाळराजाला आवडणारा खाऊ बनवणारी आई त्याग म्हणून ते करीत नसते. प्रेम हाच तिचा स्वार्थ असतो. तो खाऊ पाहून तिच्या तान्ह्याच्या गालावर पडणारी खळी पाहण्यासाठी ती एवढे श्रम घेते. याला त्याग म्हणून त्या भावनेतला जिवंतपणा व रस मारू नका. भगतसिंग फासावर चढला. त्यामागे त्याचा देशवेडाचा ‘स्व अर्थ’च होता. देशप्रेम आणि स्वातंत्र्य या स्वार्थापायी त्याने जीव देण्याचा विचार धरला. त्याच्या या देशवेडाच्या ‘स्वार्था’त कोणतेही दान नव्हते. त्यागाची पाटी गळ्यात लटकवून फिरणारे कधी भगतसिंग होऊ नाही शकणार. त्यासाठी विचार लागतात. स्वत:चे अर्थ लागतात व त्या अर्थाला आयुष्याशी जोडण्याची अक्कल लागते.जगात ‘त्याग’ असे काहीच नसते. जे काहीच करू शकत नाहीत ते आपले दु:ख त्याग म्हणून कुरवाळत बसतात. ही लोकं नेहमीच बिचारी राहतात. जी कर्तृत्ववान असतात ती जगण्याला, त्रासाला, वेदनेला, अनुभवांना स्वत:चे अर्थ लावून आपल्या आयुष्याच्या चित्रात स्वत: रंग भरतात. जीवनात जे करता ते आनंदाने करा. त्यागाचे लेबल लावून बिचार्‍यांच्या रांगेत उभे नका राहू. कदाचित पटले असेल, कदाचित पटणार नाही, पण एक मात्र करा, तुम्हाला त्याग वाटत असलेल्या एखाद्या प्रसंगाला परत एकदा आठवा व विचार करा. त्यात तुम्हाला तुमचा स्वार्थ (स्वत:चा ते करण्याचा अर्थ) नक्कीच सापडेल.

- स्वप्ना पाटकर
dr.swapnapatker@gmail.com


सौजन्य :- एक मराठी ज्वलंत दैनिक वृत्तपत्र.

No comments: