आतापर्यंत आपण मानसिक ताणतणावांचे विविध प्रकार, त्यांची विविध कारणे तसेच तणाव निवारणाचे विविध उपाय या सार्यांची तपशीलवार माहिती घेतली.
पण तणावाचा सर्वात मोठा तापदायक काळ हा नोकरी/ व्यवसायाच्या सुरुवातीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचा ३०-४० वर्षांचा असा प्रदीर्घ असतो. या काळात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊन त्याद्वारे निर्माण होणारे तणाव आणि त्याचे दूरगामी परिणाम पाहावयास मिळतात. त्याची कारणे पुढीलप्रमाणे-
- नोकरी/व्यवसायाची सुरुवात.
- नोकरी/व्यवसायातील स्पर्धा आणि स्थैर्य.
- नोकरी/व्यवसायातील प्रगती/बदल.
- घरकुलासाठी कर्ज व परतफेड.
- संसारातील वाढत्या जबाबदार्या आणि वाढते खर्च.
- आई-वडील, पती/पत्नी, मुलांची आजारपणे व त्यांचा खर्च.
- मुलांच्या शिक्षणाचा खर्च.
वरील घटकांचा विचार करताना दैनंदिन जीवनात यापैकी अनेक घटक ताणतणाव निर्मितीला पोषक ठरू शकतात. परंतु आपण किती मनावर घ्यायचे हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार ठरत असते.
या सर्वांपेक्षा महत्त्वाचा घटक म्हणजे जोडीदाराशी होणारे मतभेद, त्यातून उद्भवणारा घटस्फोट किंवा जोडीदाराचे अकस्मात निधन म्हणजे तणावाचा उच्चांक असतो.
तणावाच्या प्रत्येक वेळी रक्तदाब वाढणे, छातीत धडधडणे, अनिद्रा, चक्कर येणे अशा अनेकविध शारीरिक लक्षणांपैकी एक वा अनेक लक्षणांचे प्रकटीकरण होते.
रामाला, पांडवांना वनवास भोगावा लागला. संतांनाही जीवनात त्रास सहन करावा लागला, पण कुणीही व्यसनाधीन किंवा वेडे झाले नाही किंवा त्यांनी आत्महत्यादेखील केली नाही.
उपाय आणि मार्ग अनेक आहेत, फक्त तुमची तयारी हवी तणावमुक्त राहण्याची, आनंदाने जगण्याची... तुमच्या मदतीसाठी माझ्यासारखे अनेक जण आहेत, फक्त तुम्ही हाक मारा. चारी दिशांनी प्रतिसाद मिळेल.
आपणास खालील पर्यायांचा विचार नक्कीच फायदेशीर ठरू शकतो-
- इतरांचे वागणे आणि स्वभाव याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करूया.
- अपघात, नैसर्गिक/ मानवनिर्मित आपत्तींवरसुद्धा आपले नियंत्रण असू शकत नाही. तेव्हा त्यावर उपाययोजना शोधून अमलात आणण्याचा प्रयत्न करूया.
- घरासाठी किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी कर्ज घेताना आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा तपशीलवार हिशेब लिहून नंतरच पाऊल पुढे टाका.
- मतभेद मग ते कुणाशीही असोत (सहकारी, वरिष्ठ, जोडीदार) वेळीच मिटवले नाहीत तर काट्याचा नायटा निश्चित होतो.
- आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता सर्वप्रथम ओळखावी. त्यानंतर मिळालेल्या संधीचे सोने करावे.
- दुसर्यांविषयी ईर्षा, मत्सर, कट-कारस्थान यांऐवजी सहकार्य, मदत केल्यास विरोधकांची/ शत्रूंची संख्या वाढत नाही. उलट संकटकाळी इतर लोक आपल्या मदतीसाठी पुढे येतात.
- पैसा, प्रसिद्धी यापेक्षा समाधान महत्त्वाचे असते. ते पैशाने विकत घेता येत नाही. रात्री अंथरुणावर पडल्यावर कोणत्याही औषधाशिवाय लगेच झोप येणारा माणूस अधिक श्रीमंत असतो.
- सात्त्विक चौरस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप ही आरोग्याची त्रिसूत्री आहे, तिचा स्वीकार करा.
- योग आणि ध्यानसाधनेमुळे आत्मविश्वास, आरोग्य आणि आत्मबल वाढते जे तणावाला हाताळण्यासाठी समर्थ असते.
- तणावमुक्तीसाठी व्यसनाची कास धरणे म्हणजे आपणच स्वत:ला गळफास लावण्यासारखे आहे.
- जोडीदारापेक्षा नि:स्वार्थी क्वचितच दुसरा मित्र/मैत्रीण मिळतो/मिळते, त्यामुळे जोडीदाराला नि:संकोचपणे तणावाविषयी सांगा.
- आवश्यकता असल्यास मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक किंवा संमोहनतज्ज्ञाला अवश्य भेटा. ‘वेडा’ होण्याची वाट पाहू नका.
समाप्त!
- मिस्टर योगी
SAUJANYA:- CHIRAYU, SAMANA 07072011
No comments:
Post a Comment