Sunday, June 15, 2014

सर्दी - आयुर्वेद आरोग्य

ऍलर्जिक सायनायटीस नावाचं भूत समाजात जिकडेतिकडे पाहायला मिळतं. काही खाल्लं, कोणता वास घेतला, कुणाला स्पर्श केला, अहो एवढंच काय घरात साफसफाई केली की सुरू होते सर्दी. याला साधीसुधी नाही ऍलर्जीची सर्दी म्हणतात. खालावलेल्या रोगप्रतिकार शक्तीचं जिवंत उदाहरण म्हणावं लागेल.
पटेल नावाचे सद्गृहस्थ वसईला राहणारे. शहरी लाइफस्टाइल दिसायला मोहमाया असते. अडकलात तर फसलातच म्हणून समजा. असेच काही पटेल यांच्या बाबतीत झाले. काही विचित्र खाण्यामध्ये आले, कोणी आजूबाजूला साफसफाई केली, कामावर कोणाला सर्दी झाली की यांना सर्दी झाली म्हणून समजा. शिंका आणि नाकातून पाणी यायला काही प्रमाणच नाही. यांना शोधन व बृहन नस्य लगेच सुरू केले. सोबत रक्तशुद्ध करणारी औषधे व आहार योजना सांगितली. दीड महिन्यात त्रास कमी झाला. त्यानंतर विरेचन (जुलाब) देऊन शरीरशुद्धी केली आणि दरवर्षी शरीरशुद्धी करण्याचा सल्ला दिला.
तोंडाने श्‍वास घेणारे आणि रात्री तोंड उघडे करून झोपणारे बहुतेक लोक पाहायला मिळतात. काय करणार बिचारे? सर्दीने नाक ब्लॉक असल्याने तोंडाने श्‍वास घेणं भाग असतं. असेच देसाई. दिवसभरात त्यांचे नाक कधी ब्लॉक होईल याचा काही नेम नाही. नाडी तपासताना त्यांना यकृतासंबंधी आणि हृदयासंंबंधी बिघाड जाणवला. त्याप्रमाणे त्यांना कफ-वात दोषावर कार्य करणारी औषध दिली. सोबत गोमूत्रसिद्ध चित्रकादी तेलाने नस्याचा सात दिवसांचा कोर्स केला. गोमूत्राच्या तीव्रतेने व वासाने ब्लॉक तर सुटलाच आणि त्याने डोके हलके वाटायला लागले. पूर्वीपेक्षा ७० टक्के फरक जाणवायला लागला.
सर्दी नावाचं भूत घालवण्याचे तंत्र
- रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी रोज मोकळ्या हवेत प्राणायाम, सूर्यनमस्कार यासारखे सर्वांगिण व्यायाम करा.
- बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळा.
- (सुंठ हळकुंड आंबेहळद पुनर्नवा वचा शृंगी) उगाळून कपाळ, नाक, गालावर पातळ लेप करावा. एक चमचा हळद, अर्धा चमचा आलं, दोन कप पाणी उकळताच चार-पाच तुळसीची पाने उकळवून एक कप शिल्लक उरलेलेे गाळून दोन चमचे मध टाकून घेणे.
- आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुसार शरीरशुद्धी करा. रोगप्रतिकार शक्ती आपोआप वाढेल.


- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य :- फुलोरा, सामना १५०६१४

No comments: